ही आहे आमदारांची भावना...

    दिनांक : 23-Jun-2022
Total Views |
एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना खुले पत्र
 
मुंबई : शिवसेनेमध्ये उठलेल्या बंडखोरीचे वादळ वाढतच चालले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणाऱ्या आणि शिवसेनेपासून बंडखोरी करणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. दरम्यान गुवाहाटी येथील एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर एक पत्र शेअर केले आहे. यात ही आहे आमदारांची भावना...असे लिहत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत आमदारांच्या भावना पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली आहे. हे पत्र संजय शिरसाट यांनी लिहिले असून तेही सध्या शिंदेंसोबत गुवाहाटीमध्ये आहेत.
 
 Uddhav _ Eknath 
 
 
पत्रात उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत, आम्हा आमदारांसाठी मुख्यमंत्र्यांच्या घराचे म्हणजेच वर्षा या निवास्थानाचे दरवाजे पहिल्यांदाच उघडे असल्याचे लिहिले आहे. गेल्या अडीच वर्षांपासून हे बंद होते. पुढे लिहिले आहे की, आमदार झाल्यानंतरही आजूबाजूच्या लोकांची विनवणी करूनच येथे प्रवेश मिळायचा. राज्यसभा आणि विधानपरिषदेचे सदस्य असलेल्यांची परवानगी मिळाल्यावर आत प्रवेश मिळायचा. पत्रात पुढे लिहिले आहे की, 'हे कथित चाणक्यरुपी कारकून तुमच्याभोवती जमले आहेत, आम्हाला दूर ठेवून त्यांनी विधानपरिषद निवडणुका आणि राज्यसभा निवडणुकांसाठी रणनीती आखली आणि त्याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. राज्यसभा निवडणुकीत एकाही आमदाराने क्रॉस व्होट केले नसल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी विधान परिषद निवडणुकीपूर्वी आमदारांवर अविश्वास व्यक्त करण्यात आला.
  
भेटण्यासाठी करावी लागे प्रतीक्षा
 
पत्रात संजय शिरसाट यांनी लिहिलं आहे की, तुम्हाला भेटायचंच असेल तर आम्हाला अनेक तास पावसात बाहेर रस्त्यावर उभे करण्यात आले. आम्ही फोन केला असता आजूबाजूच्या लोकांनी फोनही उचलला नाही. मग इतका वेळ थांबून आम्ही तिथून निघून जायचो. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या आमदारांचा अपमान होत असताना एकनाथ शिंदे हेच त्या शिवसैनिकच आमदारांचे ऐकायचे, असे या पत्रात म्हटले आहे. पत्रात पुढे लिहिले आहे की, आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेव्हा आमदारांनाही त्यांच्यासोबत जायचे होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना आमदारांना अयोध्येला जाण्यापासून रोखण्यास सांगितले होते. पत्रात लिहिले आहे की, आम्हाला रामललाला भेटायला जायचे होते, पण मुख्यमंत्र्यांनी थांबवले.