स्पार्क इरिगेशन तर्फे गरजू शेतकऱ्याला मदतीचा हात

23 Jun 2022 13:56:38
जळगाव : स्पार्क इरिगेशन प्रा. लि. यांच्यातर्फे १ लाख २५ हजार किंमतीचे ठिबक सिंचन व शेती उपयोगी साहित्य यावल तालुक्यातील दहिगांव येथील शेतकरी अनिल पाटील यांना देण्यात आले. भरारी फाउंडेशन राबवित असलेल्या शेतकरी संवेदना अभियानांतर्गत हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली असून याद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातात व त्यावर उपाययोजना करण्यात येतात.
 
 

spark
 
 
 
या माध्यमातून यावल तालुक्यातील दहिगांव येथील शेतकरी अनिल पाटील यांनी संपर्क केला असता अनिल पाटील अल्पभूधारक शेतकरी असून कर्जबाजारीपणामुळे नैराश्यात असलेल्याचे कळाले. तसेच सिंचनासाठीच्या साहित्याची मागणी त्यांनी केली. त्याची दखल घेत स्पार्क इरिगेशनचे रवींद्र लढ्ढा व रुपम लढ्ढा यांच्यातर्फे ठिबक व पाईप संचाचे शेती उपयोगी साहित्य ह्या शेतकऱ्यास मदत म्हणून देण्यात आले. तसेज कृषी विभागामार्फत शेतकऱ्याला सोयाबीनचे व तुरचे बियाणे देण्यात आले. यावेळी स्पार्क इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र लढ्ढा, जिल्हाधिकारी अभिजीत राउत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, दीपक परदेशी, मोहित पाटिल उपस्थित होते.
 
भरारी फाउंडेशन गेल्या ७ वर्षांपासून शेतकरी संवेदना अभियान राबवित असून शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी विविध उपाययोजना तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी मदतीचा हात देऊन प्रयत्नशील असते, असे फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0