मोदी सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेला विरोध, बिहारमध्ये ट्रेन पेटवली ; विद्यार्थी आक्रमक

    दिनांक : 16-Jun-2022
Total Views |
नवी दिल्ली : केंद्र सरकारने लष्करी सेवेसाठी लागू केलेल्या अग्निपथ योजनेला मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू झाला आहे. हजारो तरुण आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन करत आहेत. बुधवारी बिहारमध्ये या योजनेविरोधातील आंदोलनाची ठिणगी पडली होती. त्यानंतर आज अनेक जिल्ह्यात आंदोलनाचा वणवा पेटला आहे. हरियाणातही अग्निपथ विरोधात आंदोलन करण्यात आलं. आंदोलक विद्यार्थी-तरुणांनी गुरुग्राममध्ये दिल्ली-जयपूर महामार्गावर रास्ता रोको केले. दरम्यान, बिहारमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून बऱ्याच ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. (Agneepath Yojana Protest In Bihar Latest Marathi News)

bihar
 
 
 
 
 
 
काय आहे अग्निपथ योजना?
 
- दर वर्षी जवळपास ४५ हजार तरुणांना सैन्यात सहभागी करण्यात येईल
 
- साडे सतरा ते साडे एकवीस वर्ष वयोगटातील तरुणांनाच योजनेला लाभ मिळेल
 
- मेरिट आणि मेडिकल टेस्टच्या आधारावर भरती होईल
 
- निवड झालेल्या तरुणांना चार वर्षे सैन्यात सेवा देता येईल
 
- चार वर्षांत अग्निवीरांना ६ महिन्यांचं बेसिक प्रशिक्षण देण्यात येईल
 
- अग्निवीरांना महिन्याला ३० ते ४० हजार रुपये पगार आणि अन्य फायदे मिळतील
 
- या कालावधीत अग्निवीरांना स्थायी सैनिकांप्रमाणेच पदकं, पुरस्कार आणि विमा संरक्षण मिळेल
 
- चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर २५ टक्के अग्निवीरांना स्थायी केडरमध्ये भरती करण्यात येईल
 
- चार वर्षे सेवा दिल्यावर ज्या अग्निवीरांना पुढे संधी मिळणार नाही, त्यांना सेवा निधी पॅकेजच्या अंतर्गत जवळपास १२ लाख रुपये एकरकमी मिळतील
 
अग्निपथ योजनेविरोधात बिहारचे तरुण रस्त्यावर उतरले आहे. बक्सरपासून मुंगेरपर्यंत आणि सहरसा ते नवादापर्यंत हिंसक निदर्शने केली जात आहेत. विशेषत: भारतीय रेल्वे संतप्त आंदोलकांच्या निशाण्यावर आहे. अनेक ठिकाणी रेल्वे डब्यांना आग लावण्याच्या घटना घडल्या आहेत. या आंदोलनाचा रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं आहे
.
सुरुवातीला आंदोलक विद्यार्थी आणि तरुणांनी रुळांवर उतरून अग्निपथ योजनेला विरोध सुरू केला होता. काही वेळातच आंदोलकांनी हिंसक वळण घेतले आणि पॅसेंजर ट्रेनचे डबे पेटवले. त्यामुळे घटनास्थळी घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त तरुणांनी सिवान जंक्शनजवळ सिसवान धाला रेल्वे ट्रॅक अडवला. त्याचवेळी गोपालगंजमधील सिधवालिया स्थानकावर पॅसेंजर ट्रेन थांबवण्यात आली. जाळपोळ करून हिंसक निदर्शने करण्यात आली.
 
बिहारमध्ये संतप्त झालेल्या आंदोलक विद्यार्थ्यांनी सहरसा रेल्वे स्थानकाजवळ सहरसा-मानसी रेल्वे मार्ग पूर्णपणे विस्कळीत केला. त्यामुळे सहरसा येथून निघणाऱ्या सहरसा-नवी दिल्ली वैशाली सुपरफास्ट एक्स्प्रेस, सहरसा-पाटणा राज्यराणी यासह अन्य प्रवासी गाड्या स्टेशनवरच उभ्या आहेत. याव्यतिरिक्त इतरही गाड्यांची वाहतूकही विस्कळीत झाली आहे