जमियत’च्या भूमिकेचे स्वागतच, पण...

    दिनांक : 15-Jun-2022
Total Views |
धर्मांध मुस्लिमांनी दोन आठवड्यापर्यंत देशभरात यथेच्छ धुडगूस घातल्यानंतर मुस्लिमांतल्याच ‘जमियत उलेमा-ए-हिंद संघटने’ला जाग आली आणि तिच्या अध्यक्षांनी हिंसाचाराचा विरोध केला, नुपूर शर्मांना माफ केले पाहिजे, देशात कायद्याचे राज्य असल्याचे विधान त्यांनी केले. तसेच, दंगलखोरांसह ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि मौलाना मोहम्मद मदनीविरोधात फतवा काढणार असल्याचे म्हटले.
 
 

nupur 
 
 
 
मोहम्मद पैगंबरांच्या नावाखाली देशात चाललेला हिंसक निषेध सहन करणार नाही,” असे सांगत ‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष मौलाना सुहैब कासमी यांनी नुपूर शर्मांना माफ केले पाहिजे, असे म्हटले. धर्मांध मुस्लिमांच्या हिंसाचाराविरोधात प्रथमच मुस्लीम समुदायातल्या सदसद्विवेक शाबूत असलेल्यांनी उघडपणे घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले पाहिजे. कारण, ‘मुस्लीम पॉलिटिकल काऊन्सिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. तस्लीम रहमानी यांनी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान सातत्याने शिवलिंगासह हिंदू देवदेवतांबाबत घाणेरडी विधाने करत चिथावणी दिली आणि त्याला प्रत्युत्तर देताना नुपूर शर्मांनी मोहम्मद पैगंबरांबद्दल विधान केले. नुपूर शर्मांच्या विधानावरुन साधारणतः एका आठवड्यानंतर इस्लामी कट्टरपंथीयांनी देशभरात धिंगाणा घालायला सुरुवात केली. पण, त्यावेळी ‘मिशन भारत’चे डॉ. सय्यद रिझवान अहमद, ‘होप ह्युमनिटी’च्या सहसंस्थापक अंबर झैदी, ‘राष्ट्र जागरण अभियान’च्या संयोजक सुबुही खान यांसारखे अपवाद वगळता मुस्लिमांतल्या फारशा कोणीही नुपूर शर्मांना भडकावण्याची सुरुवात नेमकी कोणी केली, हा प्रश्न विचारला नाही वा प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे काम केले नाही वा धर्मांध मुस्लिमांना आरसा दाखवण्याचे काम केले नाही, तर इस्लामी कट्टरपंथीयांकडून समाजमाध्यमांसह रस्त्यावर उतरुन फक्त दंगली घडवण्याच्या, हिंसाचार पसरवण्याच्या उद्योगासह ‘सर तन से जुदा’ची घोषणाबाजीच सुरू होती. आता मात्र धर्मांध मुस्लिमांनी दोन आठवड्यापर्यंत देशभरात यथेच्छ धुडगूस घातल्यानंतर मुस्लिमांतल्याच ‘जमियत उलेमा-ए-हिंद संघटने’ला जाग आली आणि तिच्या अध्यक्षांनी हिंसाचाराचा विरोध केला, नुपूर शर्मांना माफ केले पाहिजे, देशात कायद्याचे राज्य असल्याचे विधान त्यांनी केले. तसेच, दंगलखोरांसह ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि मौलाना मोहम्मद मदनीविरोधात फतवा काढणार असल्याचे म्हटले.
 
मात्र, इथे आणखीही काही प्रश्न उपस्थित होतात. नुपूर शर्मा असे काय वेगळे बोलल्या जे ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’चा अध्यक्ष झाकीर नाईक वा इतरही कित्येक मुल्ला-मौलवी वर्षानुवर्षांपासून बोलत नाहीत वा ‘सही बुखारी’ हदीसमध्ये लिहिलेले नाही? तशा अनेक ध्वनिचित्रफिती आजही कित्येक मौलानांच्या युट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहेत. तथापि, नुपूर शर्मांच्या विधानानंतरच्या इस्लामी कट्टरपंथीयांच्या हैदोसाने अधिकाधिक लोक मोहम्मद पैगंबर व इस्लामविषयी जाणून घेऊ लागले, त्यांच्यात कुतूहल-उत्सुकता निर्माण झाली. याचमुळे ‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे अध्यक्ष मौलाना सुहैब कासमी पुढे येऊन मोहम्मद पैगंबरांच्या नावाखाली चाललेला हिंसाचार सहन करणार नाही, असे म्हणताहेत का? जेणेकरुन ज्या बाबी मुस्लिमांव्यतिरिक्त इतरांना फार माहिती नव्हत्या, त्या सार्वजनिक होऊ नयेत व प्रकरण मिटावे. पुढचा मुद्दा, भारतीय राज्यघटनेने ‘कलम १९ (१) (अ)’ नुसार प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. नुपूर शर्मांनीही तोच अधिकार वापरला, आता त्या चुकीचे बोलल्या की बरोबर, हे धर्मांध मुस्लिमांनीच त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी दाखल केलेल्या गुन्ह्यावरील खटल्यातून स्पष्ट होईल, तसेच त्यांची सुटका वा अटक होईल. पण, यामुळे त्यांना माफ केले पाहिजे, हे विधान राज्यघटना व न्यायालयीन अधिकार आपल्याकडे घेण्यासारखे होत नाही का? तरीही त्यातून इस्लामी कट्टरपंथीय शांततेच्या मार्गावर येत असतील तर उत्तमच!
 
यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हिंसाचाराच्या दुष्परिणामांचा आहे. बळी द्यायची वेळ येते तेव्हा नेहमी शिपायाचाच बळी दिला जातो, म्होरक्या आणि म्होरक्याचे कुटुंब मात्र जीवंतच राहतात, असे म्हटले जाते. आताही देशभरात तसाच प्रकार सुरू आहे. देशात अराजकता पसरवणार, जाळपोळ-दगडफेक करणार आणि स्वतःची वेळ आली की, आपल्या शिपायांचा बळी देणार, असा प्रकार धर्मांध मुस्लीम संघटनांच्या शीर्ष नेतृत्वाकडून केला जात आहे. दिशाभूल केलेले मुस्लीम तरुण या नेत्यांच्या आवाहनावरुन रस्त्यावर उतरत दगडफेक करतात अन् त्याबदल्यात आपलीच घरे बुलडोझरने तोडून घेतात, पकडले गेले, तर पोलिसांचे फटकेही खातात. पण, दाढीवाले मौलाना, इमाम आणि त्यांचे माध्यमांतले निवडक सहकारी यांना कधी साधे खरचटतही नाही. मौलाना हिंसाचारासाठी चिथावणी देतील, ‘सर तन से जुदा’चे नारे देतील आणि आरफा खानम, राणा अय्युब, मोहम्मद झुबैरसारखे लोक ‘इस्लाम खतरे में’च्या नावाखाली परदेशातून निधी ओरबाडण्यासाठी तर्हेतर्हेचे कथानक पसरवतील. पण, यातून सर्वसामान्य मुस्लिमांचेच सर्वाधिक नुकसान होते. परवाच्या हिंसाचारात रांचीतील मुस्लीम तरुणाचा मृत्यू झाला व त्याचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. आता त्याची आई माध्यमांसमोर येऊन रडारड करताना, धमक्या देताना दिसते. पण, तिने याआधीच आपल्या मुलाला अशा कोणत्याही घटनांत सहभाग न घेण्याची तंबी दिली असती, तर तिच्यावर वाईट वेळ आलीच नसती. या ठिकाणी मौलाना सुहैब कासमी यांचे विधान उपयुक्त ठरु शकते.
 
महत्त्वाचे म्हणजे, हिंदूंनी अनादिकालापासून सहिष्णुतेचे दर्शन घडवत आपल्यावर आक्रमण करणार्‍यांनाही इथल्या संस्कृतीत सामावून घेतले. आजही इस्लामी कट्टरपंथीयांकडून ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने, समाजमाध्यमांतून ‘गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा’, ‘सर तन से जुदा, सर तन से जुदा; बोलो बोलो क्या चाहिए’, ‘गुस्ताख-ए-नबी का सर चाहिए; गुस्ताख-ए-नबी तेरी खैर नहीं’, ‘खैर नहीं, तेरी खैर नहीं; काश्मीर में चलेगा निजाम-ए-मुस्तफा’, ‘गुस्ताख-ए-रसूल की एक ही सजा’, ‘सर तन से जुदा, सर तनसे जुदा’ यासारख्या ठार मारण्याच्या घोषणा दिल्या जाताहेत, कोणी हिंदूंनाच हिंदूंचा देश सोडून जाण्याच्या धमक्या देताहेत, तरी हिंदू शांत, सहिष्णुच राहिला. पण, असे किती दिवस चालणार? क्रियेला प्रतिक्रिया येणारच आणि तसेच झारखंडमध्ये झाल्याचे दिसते. तसे आणखी इतर ठिकाणी होऊ नये, असे सुहैब कासमींना वाटते का आणि म्हणूनच, ‘आता आवरा’ असे ते आपल्याच धर्मांध बांधवांना सांगताहेत का? त्या उद्देशाने का होईना इस्लामी कट्टरपंथी सुधारत असतील, तर चांगलेच!