येत्या १८ महिन्यात १० लाख तरुणांना सरकारी नोकरी, केंद्र सरकारची घोषणा

    दिनांक : 14-Jun-2022
Total Views |
नवी दिल्ली : सरकारी नोकरीबाबत केंद्रातील मोदी सरकारने देशातील तरुणांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रालये आणि विभागांना येत्या १८ महिन्यांत १० लाख भरती करण्याचे निर्देश दिले आहेत. विरोधी पक्ष सातत्याने देशातील बेरोजगारीचा मुद्दा उचलून धरत आहेत, यातच ही घोषणा झाल्यामुळे तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Modi
 
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करुन याबाबत माहिती दिली. 'पंतप्रधानांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधनाच्या स्थितीचा आढावा घेतला असून, सरकारने पुढील दिड वर्षांत १० लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे निर्देश दिले आहेत,' अशी माहिती ट्विटमधून देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी या वर्षाच्या सुरुवातीला संसदेत सांगितले होते की, १ मार्च २०२० पर्यंत केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये ८.७२ लाख पदे रिक्त आहेत. आता ही देखील पदे भरण्यात येतील, अशी आशा आहे.
 
 
केंद्रातील या विभागांमध्ये बहुतांश पदे रिक्त
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेमध्ये सुमारे १५ लाख मंजूर पदांपैकी सुमारे २.३ लाख पदे रिक्त आहेत. संरक्षण (नागरी) विभागात सुमारे ६.३३ लाख कर्मचाऱ्यांच्या मंजूर संख्येच्या तुलनेत सुमारे २.५ लाख पदे रिक्त आहेत. पोस्ट विभागामध्ये एकूण मंजूर २.६७ लाख कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सुमारे ९०,००० जागा रिक्त आहेत, तर महसूल विभागात, १.७८ लाख कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सुमारे ७४,००० रिक्त पदे आहेत आणि गृह मंत्रालयात मंजूर १०.८ लाख पदांपैकी सुमारे १.३ लाख पदे रिक्त आहेत.