पडळकर की पवार?

    दिनांक : 01-Jun-2022
Total Views |

आता गोपीचंद पडळकरांंमुळे मात्र या सगळ्यांचेच बुरखे टराटरा फाटत आहेत. भारतीय जनता पक्षाने धनगर समाजातून अनेक नेते दिले. त्यांना पक्षात सन्मानजनक वागणूकही दिली. पवारांनी मात्र रोहित पवारांनाच मारुन-मुटकून धनगर नेता बनविण्याचा प्रयत्न चालविला आहे. वडाची साळ पिंपळाला लावण्याचे आणि त्यातून वांग्याची शेती उगविण्याचे साहेबांचे हे प्रयोग आता उघडकीला येऊ लागले आहेत. 
 

pawar 
 
                                                              
चौराहे पे लुटता चीर 
प्यादे से पिट गया वजीर
 
चीर म्हणजे सन्मान. बाकी कविता बोलकी आहे. कविराय अटल बिहारी वाजपेयी यांची ही कविता. पण, ती पुन्हा आठवण्याचे कारण म्हणजे चौंडीला झालेला ‘हायव्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा.’ भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबाचे आद्य राजकीय पुरुष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवारांना त्यांच्या जातीय राजकारणाच्या चक्रव्युहात ज्याप्रकारे अडकविले आहे, त्याला महाराष्ट्राच्या राजकारणात दुसरी उपमा नाही.
 
अठरापगड जातीत लावालावी करायची, मग त्यात काही रचनात्मक करण्यापेक्षा कागाळ्या करून लोकप्रिय राहणार्‍या, इतर जातीच्या लोकांना, त्यांच्या चालीरितींना जातीच्या नेत्याला आपल्या पक्षाचे तुटपुंजे पाठबळ द्यायचे, त्यांच्या जातीची मते आणि यांचे पाठबळ असा तो मेळ बसवून मग सत्तेची गणिते जुळवायची. शरद पवारांचे हेच ते राजकारण! मात्र, आजघडीला धनगर समाजाचा जातीचा मक्ता पवारांकडे नसून समाजाकडेच आहे, हे दाखवून देण्याचे काम गोपीचंद पडळकर यांनी बखुबी केले आहे. या सगळ्या नाट्यमय घटनाक्रमाला अनेक पदर आहेत आणि त्यात पात्रेही आहेत. तसा धनगर समाज हा ना कुणाच्या अध्यात ना मध्यात. बाजीराव पेशव्यांना त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढायला लावणारे लढवय्ये राजकीय कुटुंब म्हणजे होळकर. मूळातच होळकरांच्या राजकारणाला एक राष्ट्रीय भान होते.
 
जेव्हा होळकर घराण्याच्या राजकारणाची, त्यांच्या साम्राज्याची सूत्रे पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या हाती आली, तेव्हा त्यांनी राज्यकर्त्याने कसे असावे, याचा वस्तुपाठच घालून दिला. जलसंधारण, घाटबांधणी, पुरातन मंदिरांचे पुनर्निर्माण करून त्यांनी अस्मिता जागरणाचेही मोठे काम केले. साहजिक धनगर समाजामध्ये अहिल्याबाईंविषयी भरपूर आदर आणि अभिमान आहे. धनगर समाज त्यांना परमेश्वराप्रमाणे पूजतो. हातात शिवलिंग धारण केलेली त्यांची शुभ्र वस्त्रातील प्रतिमा अत्यंत लोकप्रिय आहे. खरंतर अशा अहिल्याबाई शरद पवारांसारख्या तथाकथित सेक्युलर तत्वाच्या माणसांना चालताच कामा नये. मात्र, एकदा मतांची बेगमी दिसली की, मग गीतरामायण ऐकू यायाला लागते.
 
सावरकरांवर भाषण सुचते, पुण्यातला दगडूशेठ हलवाई गणपती दिसायला लागतो. आता पवारांनी वारी किंवा नर्मदा परिक्रमा केली तरी आश्चर्य वाटायचे कारण नाही. मात्र, या सगळ्या नाटकांमध्ये गोपीचंद पडळकर एखाद्या भिंतीप्रमाणे उभे राहिले आहेत. बहुजन समाजातील मंडळींसमोर अस्मितेच्या नावाखाली राजकारणाचे ताबूत नाचवायचे आणि सत्ता मात्र स्वत:च्या कुटुंबातच राखून ठेवायची हे पवारांचे राजकारण. रोहित पवार अहिल्यांबाईंचा वारसा चालवित आहेत, अहिल्याबाईंच्या कामाची झलक त्यांच्या कार्यपद्धतीत दिसते, असेही ते म्हणाले. आता अहिल्याबाईंचा वकुब आणि कर्तृत्व इतके मोठे होते की, पांढरे केस करून प्रौढ दिसण्याच्या प्रयत्नांत असलेल्या रोहित पवारांना हे सगळे कसे जमते, हा प्रश्नच आहे. त्यांचे वय काय?त्यांचा वकुब काय? महाराष्ट्राच्या राजकारणातली त्यांची कारकिर्द तरी किती मोठी? मात्र, पवारांनी रोहित पवारांची तुलना थेट अहिल्याबाईंशीच करून टाकली. खरंतर हा पुण्यश्लोक अहिल्याबाईंचा अपमानच! मात्र, यावर महाराष्ट्रात कुणीही चकार शब्द काढणार नाही. कारण, पवार करतील ते धोरणात्मक राजकारण आणि अन्य कुणी केला, तर तो जातीयवाद! रोहित पवारांचे ढोल बडवतानाचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर पाहायला मिळाले.
 
मात्र, गोपीचंद पडळकरांना आणि सदाभाऊ खोतांना त्या ठिकाणी जाण्यापासून पोलिसांनी का रोखले, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. पवार कुटुंबीयांचा मक्तेदारी कायम राखण्याचाच हा एक प्रकार होता. ‘मराठा नेता’ म्हणून ओळखले जाणारे पवार व त्यांचे राजकारण किती हीन दर्जाचे आहे, हे अमोल मिटकरींनी दाखवून दिले. एरवी याला अटक करा, त्याला अटक करा, अशी पोपटपंची करणारे राष्ट्रवादीचे नेते व त्यांचे नवे प्रवक्ते संजय राऊतही या मुद्द्यावर गप्प राहिले. आता गोपीचंद पडळकरांंमुळे मात्र या सगळ्यांचेच बुरखे टराटरा फाटत आहेत. भारतीय जनता पक्षाने धनगर समाजातून अनेक नेते दिले. त्यांना पक्षात सन्मानजनक वागणूकही दिली. पवारांनी मात्र रोहित पवारांनाच मारुन-मुटकून धनगर नेता बनविण्याचा प्रयत्न चालविला आहे. वडाची साळ पिंपळाला लावण्याचे आणि त्यातून वांग्याची शेती उगविण्याचे साहेबांचे हे प्रयोग आता उघडकीला येऊ लागले आहेत.
 
पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या बाबतीत जे सत्य आहे, ते प्रखरपणे समोर आहे. त्या धर्मनिष्ठ होत्या, सश्रद्ध होत्या व एखादी सम्राज्ञी जितकी कर्तृत्ववान असावी, तितक्याच त्या कर्तृत्वानही होत्या. आपली सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर ज्ञानवापी मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला व मूळ मंदिरासमोरचा नंदी तसाच ठेवला. या कृतीमागे खरोखरच काही अर्थ होता. मात्र, हा अर्थ पुरोगामी पाखंड्यांना समजणे शक्य नाही. या ज्ञानवापी मंदिराबाबत पवार, त्यांचा जुना कंपू व त्यांचे नव्याने बाटलेले शिवसेनेसारखे सहकारी यांची भूमिका काय आहे, हे एकदा पवारांनी स्पष्ट केलेले बरे. म्हणजे, अहिल्याबाईंच्या नावाने त्यांनी कितीही अभिवादनाचे कार्यक्रम केले, तरी त्यांचे खरे स्वरुप काय आहे, हे सगळ्यांना कळेल!