राहुल गांधींचा राष्ट्रविरोधी फुटीरतावाद

    दिनांक : 30-May-2022
Total Views |
 
राहुल गांधी भारताला राज्यांचा संघ म्हणतात, त्याचा अर्थ त्या त्या राज्यांची भारतात राहण्याची इच्छा नसली, तर ती फुटून निघण्यासाठी स्वतंत्र आहेत, असा होतो. जम्मू-काश्मीरला भारतापासून तोडण्यासाठी कारवाया करणार्‍यांना फुटीरतावादी म्हटले जाते, पण त्यांच्यापेक्षाही मोठा फुटीरतावादी काँग्रेसचा शीर्षस्थ नेता आहे, हेच राहुल गांधींच्या विधानावरुन स्पष्ट होते.
 
 
 
rahul
 
 
 
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर राहुल गांधींना दमदार भारतीय राजकीय नेतृत्व म्हणून सादर करण्याची प्रत्येक खेळी सपशेल अपयशी ठरत असल्याचे सातत्याने पाहायला मिळते. नुकताच सुटाबुटातील राहुल गांधींच्या मुलाखतीचा एक कार्यक्रम ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात पार पडला अन् राहुल गांधींच्या निर्बुद्धपणाचे दर्शन पुन्हा एकदा झाले.
 
मुलाखतकर्तीने विचारलेल्या एका प्रश्नावर राहुल गांधी मौनीबाबा झाल्याची हास्यास्पद ध्वनिचित्रफित तर फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांवर अतिशय वेगाने फिरली. त्याच मुलाखतीत राहुल गांधींनी भारताबाबत राष्ट्र, संघराज्य, राज्यांचा संघ याअनुषंगाने तारे तोडले. मात्र, त्यांची याविषयीची भूमिका हसण्यावारी नेण्यासारखी नव्हे, तर काँग्रेससारख्या भारतातील सर्वात जुन्या राष्ट्रीय पक्षाचा शीर्षस्थ नेता किती विध्वंसक विचार करतो, हे दाखवणारीच आहे. भारत राष्ट्र नसून राज्यांचा संघ असल्याचे विधान त्यांनी या मुलाखतीत केले. मात्र, आपण जे बोलतो, त्याचा नेमका अर्थ काय होतो, हे तरी राहुल गांधींना कळते का?
 
राज्यघटनेतील ‘कलम १’ नुसार भारत राज्यांचा संघ आहे, पण प्रस्तावनेत मात्र भारताचा उल्लेख राष्ट्र असाच केलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे, भारत अनेक राज्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेले राष्ट्र नाही, तर भारताचे अस्तित्व हजारो, लाखो वर्षांपासून आहे. भारतावर राज्य करणारे राज्यकर्ते बदलले, राजधान्या बदलल्या, पण भारताचा सामाजिक, सांस्कृतिक, भावनिक इतिहास मात्र बदलला नाही. वेदकाळापासून ते आचार्य चाणक्य आणि छत्रपती शिवाजी महाराज व नंतरच्या राज्यकर्त्यांनीही भारताला एक राष्ट्र म्हणूनच संबोधले. आधुनिक काळात १९४७ साली भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले ते राष्ट्र म्हणूनच, त्यानंतर इथे वेगवेगळी राज्ये तयार करण्यात आली. त्यानुसारही भारत राज्यांचा संघ ठरत नाही. पण, याची जाणीव राहुल गांधींना नाही. कारण, त्यांची राष्ट्राची संकल्पना भारतीय मातीतली नाही, तर त्यांच्यासाठी राष्ट्राची पाश्चिमात्य संकल्पना प्रमाण आहे. त्यावरुन राहुल गांधी भारताला राज्यांचा संघ म्हणत असतील तर त्याचा व्यवहारातील अर्थ त्या त्या राज्यांची भारतात राहण्याची इच्छा आहे, तोपर्यंतच ती भारतात राहतील, असा होतो. म्हणजेच, त्या त्या राज्यांची भारतात राहण्याची इच्छा नसली, तर ती फुटून निघण्यासाठी स्वतंत्र आहेत, असे राहुल गांधींना म्हणायचे आहे.
 
जम्मू-काश्मीरला भारतापासून तोडण्यासाठी कारवाया करणार्‍यांना फुटीरतावादी म्हटले जाते, पण त्यांच्यापेक्षाही मोठा फुटीरतावादी काँग्रेसचा शीर्षस्थ नेता आहे, हेच राहुल गांधींच्या विधानावरुन स्पष्ट होते. त्याबरोबरच राहुल गांधींच्या मते भारत राज्यांचा संघ असेल तर त्यांच्या पणजोबांनी नागालॅण्ड, मिझोराममधील फुटीरतावाद मोडून काढण्यासाठी लष्कराचा वापर का केला? त्यांच्या आजीने पंजाब भारतात राहण्यासाठी ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ का केले? इतकेच नव्हे, तर त्यांच्या वडिलांनी श्रीलंकेच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी लष्कर का पाठवले? हे प्रश्नही उपस्थित होतील. भारताचा विचार करता संबंधित राज्यांतल्या फुटीरतावाद्यांना भारतापासून वेगळे होण्याचीच इच्छा होती, पण भारतीय राज्यघटनेने देशातील कोणत्याही राज्याला फुटून निघण्याचा अधिकार दिलेला नाही. कारण, भारत राज्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेले राष्ट्र नाही. राहुल गांधींना मात्र ही समज असल्याचे दिसत नाही. म्हणूनच ते ब्रिटन असो वा चालू वर्षातले संसदेतले भाषण असो, त्यात भारताला राष्ट्र नव्हे तर राज्यांचा संघ ठरवण्यावरच जोर देतात. पण, याचे परिणाम अतिशय भयानक होऊ शकतात.
 
राहुल गांधी, ज्यांना देशात प्रादेशिकवाद भडकावून देशाचे तुकडे पाडायचे आहेत, त्यांच्या हातचे बाहुले झाल्याचे दिसते. कारण, त्यांची विधाने सातत्याने देशात फूट पाडणारीच असल्याचे दिसून येत आहे. राहुल गांधी या लोकांचे प्रवक्ते असल्याप्रमाणे काम करत आहेत. प्रादेशिकवादाला फोडणी देणार्‍यांना राष्ट्रापेक्षा स्वतःपुरते पाहायला आवडते. त्यांच्यापुढे राष्ट्राचा विचार नसतो, तर त्यांच्यासाठी भावनिक प्रादेशिक मुद्द्यांना चिथावणी देऊन आपला स्वार्थ साधणे, इतकेच उद्दिष्ट असते. देशात सध्या अशी अनेक उदाहरणे आहेत आणि ज्यांनी ज्यांनी प्रादेशिकवादाला खतपाणी घातले, त्यांचे त्यांचे पक्ष, संघटना एकाच कुटुंबाच्या मालकीच्या झालेल्या दिसतात. काँग्रेसही एकाच कुटुंबाच्या मालकीचा पक्ष आहे, पण त्याचे स्वरुप राष्ट्रीय आहे. पण, राहुल गांधींच्या काळात काँग्रेसही प्रादेशिकवादावरच स्वार होऊन फुटीरतेची भावना वाढीस लावू इच्छितो. यावरुन राहुल गांधींचा विरोध भाजप वा मोदींपुरताच मर्यादित राहिला नसून ते राष्ट्रविरोधक झाले आहेत व काँग्रेसलाही त्या मार्गावर नेऊ पाहत आहेत, असे दिसते.
 
देशाच्या स्वातंत्र्यासाठी एकेकाळी सर्व राजकीय विचारांचे कार्यकर्ते, नेते काँग्रेसबरोबर आले. पण, आज मात्राकाँग्रेस भारताची राष्ट्र म्हणून धुळधाण करण्यासाठीच उभी असल्याचे राहुल गांधींच्या उद्योगावरुन दिसते. त्या पार्श्वभूमीवर जे पक्ष काँग्रेसला पाठिंबा देऊ पाहत आहेत किंवा काँग्रेसच्या साहाय्याने पुन्हा सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहत आहे, त्यांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. कारण, काँग्रेसच्या राहुल गांधींनी आज भारताला राष्ट्र न मानता राज्यांचा संघ म्हटले. त्यातून फुटीरतावादच वाढीस लागू शकतो, फुटीरतावाद्यांना आपल्याबरोबर कोणीतरी आहे, या विचाराने प्रोत्साहन मिळू शकते.

 
त्यातून देशाच्या विविध भागांत अराजकीय, हिंसाचारी तत्त्वे बळावू शकतात व त्याचा परिणाम देशाच्या शांतता, स्थैर्य, सुरक्षा, एकात्मता, अखंडतेवर होऊ शकतो. अशा परिस्थितीत आपल्याला काँग्रेसबरोबर जाऊन राष्ट्राला खंडित करण्याची भावना वाढीस लावायची की राष्ट्राला अक्षुण्ण राखणारा विचार जपायचा, हा महत्त्वाचा प्रश्न राहील. देशातील जनतादेखील तुकडे तुकडे करणार्‍यांच्या मागे नव्हे तर अखंडता अबाधित ठेवणार्‍यांच्याच पाठीशी उभी राहील. त्या परिस्थितीत काँग्रेसची तर दयनीय अवस्था होईलच, पण काँग्रेसबरोबर जाणार्‍यांनाही देशातील जनता उभे करणार नाहीच.