मजारी, कबरींचे संरक्षणकर्ते ठाकरे सरकार

    दिनांक : 28-May-2022
Total Views |
ज्ञानवापी मशीद प्रकरणानंतर हिंदूंना शिवसेनेसारख्या खोट्या, बेगडी हिंदुत्वनिष्ठांविरोधात संघर्षाचा निर्णय घ्यावा लागेल. कारण, शिवसेनेचे हिंदुत्व हिंदूंच्या न्याय, हक्कासाठी लढणारे नव्हे, तर हिंदूंच्या न्याय, हक्काचा गळा घोटणारे आहे. त्याचा दाखला औरंगजेब, अफझलखानाच्या कबर, मजारीला संरक्षण देण्यातून अन् ज्ञानवापी संघर्षाला वादग्रस्त ठरवण्यातून मिळाला आहे.
 
 
 
dowanload

 
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी इस्लामी आक्रमकांशी संघर्ष करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली. आज महाराष्ट्रासह देशातला प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारस म्हणवून घेतो. पण, तथाकथित हिंदुत्वनिष्ठ उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी टपलेल्या, चाल करून आलेल्या, दगाबाजी केलेल्या, औरंगजेबापासून ते अफझल खानापर्यंत प्रत्येक स्वराज्यद्रोह्याचीच तळी उचलताना दिसते. ‘एमआयएम’प्रमुख असदुद्दीन ओवेसींचा भाऊ अकबरुद्दीन ओवेसीने औरंगाबादेत येऊन औरंगजेबाच्या कबरीसमोर माथा टेकला. त्याला हिंदुत्वनिष्ठांनी विरोध करताच औरंगजेबाच्या कबरीला पोलीस संरक्षण पुरवण्याचा उद्योग उद्धव ठाकरेंच्या सरकारने करून दाखवला. म्हणजे, उद्धव ठाकरेंना हिंदूद्रोही, स्वराज्यद्रोही औरंगजेब जवळचा झाला अन् छत्रपती शिवाजी महाराज कोणीच नाही. औरंगजेबाच्या कबरीनंतर हिंदुत्वनिष्ठांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी कोथळा काढून गाडलेल्या अफझल खानाच्या मजारीला विरोध केला. ते पाहताच उद्धव ठाकरेंच्या सरकारने अगदी तत्परतेने अफझल खानाच्या मजारीचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात केला. म्हणजे स्वतःच्या पक्षाला नाव छत्रपती शिवाजी महाराजांचे लावायचे, पण कृती मात्र औरंग्याच्या, अफझल खानाच्या औलादीच्या तोडीस तोड करायची, असा प्रकार उद्धव ठाकरेंकडून सुरू असल्याचे स्पष्ट होते. कारण, औरंगजेबाच्या वा अफझल खानाच्या कबरीला, मजारीला संरक्षण दिले ते त्या ठिकाणी समतलीकरण होऊ नये म्हणून. कोणत्याही वारसाला आपल्या पूर्वजांच्या कबरीचे, मजारीचे अस्तित्व टिकून राहावे, त्याचा विध्वंस होऊ नये, असे वाटते.
 
औरंगजेबाच्या, अफझल खानाच्या कबरीला, मजारीला संरक्षण देऊन उद्धव ठाकरे त्या हिंदूद्रोह्यांच्या, स्वराज्यद्रोह्याच्या वारसाची भूमिका निभावताहेत का? हा प्रश्न उपस्थित व्हावा, इतका संतापजनक प्रकार त्यांच्या सरकारकडून सुरू आहे. विशेष म्हणजे, संजय राऊतांनी कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी महाराजांना राज्यसभेची उमेदवारी नाकारताना आपण, आपले सहकारी, आपले कार्यकर्ते छत्रपतींचे मावळे असल्याचा उल्लेख केला होता. आता त्या तथाकथित मावळ्यांनाही औरंगजेबाची कबर, अफझल खानाची मजार प्राणप्रिय झाली असावी, म्हणूनच त्यांच्या तोंडातूनही या सार्‍या प्रकाराला विरोध होताना दिसत नाही. राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार पाच वर्षे अस्तित्वात होते. पण, त्यावेळी मात्र औरंगजेबाच्या कबरीच्या वा अफझल खानाच्या मजारीच्या उदात्तीकरणाचे माकडचाळे करण्याचे धाडस कोणीही केले नाही. कारण, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून खर्‍याखुर्‍या हिंदुत्वनिष्ठांच्या हातात महाराष्ट्राचा कारभार होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव घेण्यासाठी नको ते उद्योग करणार्‍या औरंग्याचे वा अफझलखानाचे महिमामंडन केले, तर आपली काही धडगत राहणार नाही, याची जाणीव आज त्या कबरीवर, मजारीवर माथा टेकवणार्‍यांना होती. नंतर मात्र, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अन् काँग्रेसशी संगत केली अन् औरंगजेबाच्या, अफझल खानाच्या पिलावळींना चेव चढला. ‘बुडाला औरंग्या पापी। म्लेंछसंव्हार जाहाला। मोडलीं मांडली छेत्रें। आनंदवनभुवनीं॥’ असा जयघोष करणार्‍या मराठी मुलखात औरंगजेबाच्या कबरीला, अफझल खानाच्या मजारीला उद्धव ठाकरेंच्या सरकारकडून पोलीस संरक्षण मिळू लागले.
 
औरंगजेब, अफझल खानाने हिंदूंवर अनन्वित अन्याय, अत्याचार केले. मंदिरे तोडली, गायी कापल्या, हिंदूंची धर्मांतरे केली, हिंदू मुली-महिलांवर बलात्कार केले. त्यांच्या या कुकृत्यांमुळेच त्यांच्या मृत्यूनंतरही हिंदूंकडून औरंगजेब, अफझल खानाकडे क्रूरकर्मा, खलनायक म्हणूनच पाहिले जाते. त्यांच्या कबरीला, मजारीला विरोध केला जातो अन् त्या विरोधाकडे हिंदूंंच्या न्याय व हक्कासाठी चाललेला लढा म्हणूनच पाहिले पाहिजे. पण, उद्धव ठाकरेंच्या सरकारला त्याची जाणीव नाही, उलट त्यांचे सरकार जसे औरंगजेबाने, अफझलखानाने हिंदूंचे दमन केले, त्याचप्रकारे हिंदूंच्या दमनासाठी पुढाकार घेताना दिसते. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस अन् काँग्रेसला स्वतःची एकगठ्ठा मुस्लीम मते सुरक्षित ठेवायची आहेत. त्यामुळे त्यांना हिंदूंच्या मागण्यांची कदर वाटत नाही. मुस्लीम मते मिळावीत, म्हणून त्यांच्याकडून वाटेेल ते प्रकार सुरू आहेत अन् त्यांच्या तालावर नाचण्याचा उद्योग तथाकथित हिंदुत्वनिष्ठ उद्धव ठाकरे करताहेत. विशेष म्हणजे, आज एका बाजूला औरंगजेबाने काशिविश्वनाथाचे मूळ मंदिर पाडून त्या अवशेषांवर उभारलेल्या ज्ञानवापी मशिदीला हटवण्यासाठी हिंदूंकडून सनदशीर मार्गाने न्यायालयात संघर्ष सुरू आहे. पण, त्याच्यावर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत, वादग्रस्त विषय बाजूला ठेवले पाहिजे, अशी प्रतिक्रिया देतात. म्हणजे, हिंदूंनी काशिविश्वनाथाचे मूळ मंदिर परत मिळवणे, आपल्या आराध्य दैवताची दुर्दशा दूर करून त्याची पुन्हा प्रतिष्ठापना करण्याचा अधिकार मिळवणे वादग्रस्त, पण औरंगजेबाची कबर, अफझलखानाची मजार पोलिसांचे संरक्षण देण्याइतकी पवित्र, असा हा शिवसेनेचा उफराटा प्रकार. तरीही रोज उठून शिवसेना पक्षप्रमुखाने वा प्रवक्त्याने आम्ही खरे हिंदुत्वानिष्ठाची तोंडपाटीलकीही करायची, हिंदूंना गंडवत राहायचे!
 
ते पाहता, आज हिंदूंनी काशीतील ज्ञानवापी मशिदीचा संघर्ष न्यायालयात नेला आहे, मथुरेतील शाही ईदगाह मशिदीचे प्रकरणही न्यायालयात गेले आहे, सध्या अजून डझनभर तरी मशिदी वा दर्गे-मजारींचा संघर्ष न्यायालयात जाण्याच्या मार्गावर आहे. तो संघर्ष न्यायालयात जाईल तेव्हा जाईल, पण तोपर्यंत ज्ञानवापी मशीद प्रकरणानंतर हिंदूंना शिवसेनेसारख्या खोट्या, बेगडी हिंदुत्वनिष्ठांविरोधात संघर्षाचा निर्णय घ्यावा लागेल. कारण, शिवसेनेचे हिंदुत्व हिंदूंच्या न्याय, हक्कासाठी लढणारे नव्हे, तर हिंदूंच्या न्याय, हक्काचा गळा घोटणारे आहे. त्याचा दाखला औरंगजेब, अफझलखानाच्या कबर, मजारीला संरक्षण देण्यातून अन् ज्ञानवापी संघर्षाला वादग्रस्त ठरवण्यातून मिळाला आहे. त्याला शिवसेनेची राजकीय कबर खोदण्यातूनच उत्तर दिले जाऊ शकते.