खड्डे अन् खडीने वाहनधारक बेहाल; कामगार, उद्योजकांच्या जीवाशी खेळ
जळगाव : महामार्ग म्हणजे दळणवणाचे महत्वाचे साधन. मात्र जळगाव -औरंगाबाद महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या सुरू असलेल्या कामांमुळे रस्ता तयार होईल, तेव्हा सुविधा मिळेल, मात्र मराठवाडा आणि खान्देशला जोडणार्या या रस्त्यामुळे जळगावकर आताच हैराण झाले आहेत. हा रस्ता तयार करण्याचे काम 8-10 महिन्यांपासून सुरु आहे. मात्र रस्त्यांचे काम करतांना संबंधित ठेकेदाराने जळगाव शहरालगतच्या औद्योगिक वसाहतीतील वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेता पर्यायी रस्त्यावर योग्य सुविधा पुरविणे आवश्यक होते. मात्र त्याने सुविधा पुरवणे तर दूरच, पर्यायी वाहतुकीच्या रस्त्यावरच मोठ्या आकाराची खडी टाकून वर्षभरापासून जळगावकरांची असुविधाच केली आहे. या रस्त्यांवर योग्य सुविधाअभावी दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात घसरून दररोज अपघात होतात. त्यामुळे मक्तेदाराला रस्ते तयार करतांना शहरालगत वाहनधारकांना पर्यायी रस्त्यावर सुविधा देण्याचा विसर पडला की काय? असा प्रश्न उपस्थित होतो. मक्तेदाराच्या या बेजबाबदारपणामुळे वाहनधारकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याने जनमानसातून संताप व्यक्त होत आहे. या रस्त्यामुळे एमआयडीसीत जाणार्या व तेथून येणार्या उद्योजक आणि कामगारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
शहरातील उद्योजक व सामाजिक संघटनांशी याबाबत संपर्क साधता रस्त्याचे काम करतांना पर्यायी रस्त्यांच्या सुविधांकडे मक्तेदाराने दुर्लक्ष केल्याने तीव्र रोष व्यक्त होतो. पुढील महिन्यात पावसाळा सुरू होत असल्याने या रस्त्यांची अवस्था आणखी खराब होवून उद्योग, व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केली. वाहतुकीच्या समस्येमुळे उद्योगासाठी लागणारा कच्चा माल आणि तयार केलेला उत्पादित माल यांची ने-आण करण्याची मोठी समस्या निर्माण झाल्याचे उद्योजकांनी सांगितले.
धुळीमुळे बिघडले कामगारांचे आरोग्य
अजिंठा -चौफुली ते रेमंड चौफुली दरम्यान सुरू असलेल्या या रस्त्याच्या कामांमुळे धुळीचे प्रचंड साम्राज्य आहे. धुळीमुळे एमआयडीसीत कामावर जाणार्या तसेच शहरात येणार्या वाहनचालकांचे हाल होत आहे. या रस्त्यावरील दररोजच्या धुळीमुळे कामगारांचे आरोग्य बिघडले असून त्याचा कामगारांच्या कामावर विपरीत परिणाम होत असल्याचे उद्योजकांनी सांगितले.
आठ महिन्यांपासून अपघाताची मालिका
अजिंठा -चौफुली ते रेमंड चौफुली दरम्यानच्या या रस्त्याच्या कामांमुळे अपघाचे सत्र सुुरू आहे. पर्यायी रस्ता काही ठिकाणी अत्यंत अरूंद असल्याने दोन वाहने एकावेळी जाण्यासाठी खूप कसरत करावी लागते. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते. परिणामी, वाहनधारकांना या रस्त्यावरून वाहन चालवितांना भीती वाटते. त्यामुळे इतर लांबच्या मार्गाने एम सेक्टरमधून एमआयडीसीत ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब केला जातो. मात्र या मार्गावरून अवजड वाहने जाऊन शकत नसल्याने वाहतुकीच्या मार्गाला सध्या तरी पर्याय नसल्याचे दिसून येते.
वाहतुकीच्यादृष्टिने सुविधांचा दुष्काळच
जळगाव-औरंगाबाद चौपदरीकरणाचे काम करणारी यंत्रणा आणि मक्तेदार यांचे भान हरपल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागल्या असून शहरालगत पर्यायी रस्त्यावर सुविधा देणे आवश्यक नव्हते काय? असा नागरिकांचा सवाल आहे. मात्र त्याकडे कानाडोळा करीत जनतेस वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याच्या नागरिक आणि उद्योजकांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत. वाहतूक जाम झाल्यास वाहने अडकून पडल्याने कितीही महत्वाचे काम असले तरी वाहनधारकांची तेथून सुटका होत नाही, हे सत्यही नाकारता येणार नाही.
कार्यकारी अभियंत्यांकडून माहिती देण्यास टाळाटाळ
जळगाव-औरंगाबाद महार्गावरील अजिंठा चौफुली ते रेमंड चौफुलीच्या रस्त्यांच्या कामांबाबत कार्यकारी अभियंता महाले यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. मक्तेदारांकडून पर्यायी रस्त्यांवर सुविधा देणे आवश्यक असतांना तेथील पर्यायी रस्त्यांवरच खडी टाकण्यात आल्याने वाहनधारकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. याबाबत त्यांनी माहिती देण्याचे टाळल्याने संबंधित यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या कामांबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
उद्योजकांची अडचण
वर्षभरापासून रस्त्याचे काम सुरू असून लोकप्रतिनिधीकडेही या रस्त्याच्या कामांबाबतचा विषय मांडला. रस्त्यामुळे सर्वच उद्योजकांची अडचण झाली आहे. जळगाव-औरंगाबाद रस्त्यावरील अजिंठा चौफुली ते रेमंड चौफुली दरम्यानच्या रस्त्याचे काम मुंगीच्या गतीने सुरू आहे. रस्त्याचे काम करतांना पर्यायी रस्त्यावरच खडी टाकल्याने वाहनधारकांची अडचण झाली आहे. पावसाळा लवकरच सुरु होणार असल्याने वाहनधारकांच्या अडचणीत अजून भर पडणार आहे. त्यामुळे हा प्रश्न लवकर मार्गी लागावा अशी अपेक्षा आहे.