मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे राज्यांना सतर्कतेचे निर्देश

23 May 2022 15:48:43
नवी दिल्ली : जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरस नंतर अजून एक नवा व्हायरस आढळून आला आहे. मंकीपॉक्स हा विषाणूजन्य जुनोटिक रोग आहे. याचे विषाणू प्राण्यांपासून माणसात पसरतात. भारतात सध्या मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, इतर देशात आढळणारे रुग्ण पाहता भारतात केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. जगभरातील १२ देशात मंकीपॉक्स व्हायरसचे रुग्ण आहेत. त्यामुळे देशात देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे.
 
monkeypox 
 
जागतिक आरोग्य संघटनेने 12 देशांमध्ये मंकीपॉक्सच्या ९२ प्रकरणांची पुष्टी केली आहे. येत्या काही दिवसांत हा विषाणू जगातील इतर देशांमध्येही वाढू शकतो, असा इशारा दिला आहे. त्यामुळे जगभरात मंकीपॉक्सच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाचे गांभीर्य जाणून आंतरराष्ट्रीय विमानतळं, बंदर आणि देशाच्या सीमाभागांत लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.
 
मंकीपॉक्सची लक्षणं काय?
 
तज्ज्ञांच्या मते 'मंकीपॉक्स' हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.
 
कसा वाढतो संसर्गाचा धोका?
 
संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. तसेच, संक्रमित प्राणी देखील या विषाणूचे सक्रिय वाहक असू शकतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्याने, किंवा विषाणू-दूषित वस्तूंद्वारे देखील ‘मंकीपॉक्स’ पसरू शकतो. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये ‘मंकीपॉक्स’ची सर्वाधिक प्रकरणे आढळतात. मुख्यतः आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे किंवा आयात केलेल्या प्राण्यांमुळे हा विषाणू पसरतो.
Powered By Sangraha 9.0