पिओके मधील गँगरेप पिडीतेचे मोदींकडे मदतीचे आवाहन

14 May 2022 14:00:27
नवी दिल्ली : भारतानं आश्रय द्यावा यासाठी पाकव्याप्त काश्मीरातील सामूहिक बलात्कार पीडित महिला मारिया ताहिर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे याचना केली आहे. मला आणि माझ्या मुलाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. इथे मला आणि माझ्या कुटुंबाच्या जीवितास धोका आहे. कधीही आम्हास संपवलं जाऊ शकत. त्यामुळे मला भारतात आश्रय देण्यात यावा, सुरक्षा दिली जावी, अशी विनंती मी पंतप्रधान मोदींकडे करत आहे, असं मारिया यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
 
 
 
mari
 
 
२०१५ मध्ये मारिया यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला. या प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी मारिया यांचे प्रयत्न सुरू असून त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. हारुन रशीद, ममून रशीद, जमील शफी, वकास अशरफ, सनम हारुन आणि अन्य तिघांनी माझ्यावर अत्याचार केले. त्यानंतर मी स्थानिक पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यासाठी गेले. मात्र त्यांच्याकडून कोणतंही सहकार्य मिळालं नाही.
 
पीओकेमधील सरन्यायाधीशांना पत्र लिहूनही मारिया यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता मारिया यांनी मोदींकडे विनवणी केली आहे आणि भारतात आश्रय देण्याची मागणी केली आहे. मारिया ताहिर म्हटल्या की मी सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडिता असून गेल्या ७ वर्षांपासून आम्ही न्यायासाठी लढत आहोत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये मला न्याय मिळत नसल्याने मी तुमच्याकडे मदत मागत आहे, अशा शब्दांत मारिया यांनी पंतप्रधान मोदींकडे मदतीची विनंती केली आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी मदतीचं आवाहन केलं आहे.
Powered By Sangraha 9.0