जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी अड्ड्याचा पर्दाफाश, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

04 Apr 2022 12:18:58
Jammu Kashmir : जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (LOC) भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान दहशतवाद्यांच्या एका अड्ड्याचा पर्दाफाश केला. लष्कराने दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणाहून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. सूत्रांनी सांगितले की, लष्कराच्या तुकड्या आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने (SOG) रविवारी पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील नूरकोट भागात संयुक्त कारवाई केली.

jammu 
शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त
 
सूत्रांच्या माहितीनुसार, "गुप्त माहितीच्या आधारे हे ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. या कारवाईदरम्यान दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला. तसेच शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. माहितीनुसार, या कारवाईत दोन मॅगझिनसह दोन एके-47 रायफल आणि 63 राउंड, एक 223 बोअर एके बंदूक, दोन मॅगझिन, 20 राऊंड आणि एक मॅगझिनसह एक चायनीज पिस्तूलाचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे रविवारी संध्याकाळी उशिरा सुरू करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान कोणालाही अटक करण्यात आली नाही.
बॉम्ब फेकणाऱ्या महिलेलाही अटक
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये दररोज चकमक होत आहे. यासोबतच सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्लेही सातत्याने वाढत आहेत. याच दरम्यान काश्मीरमधील एका महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे. या महिलेने सीआरपीएफ चेक पोस्टवर पेट्रोल बॉम्ब फेकला होता. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. त्यानंतर सोपोरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या बंकरवर पेट्रोल बॉम्ब फेकून हल्ला करणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. हल्ल्यानंतर काही तासांतच महिलेची ओळख पटली आणि त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला अटक केल्याचे त्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0