पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची मनसे नेते राज ठाकरेंवर सडकावून टीका ; तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते

04 Apr 2022 12:52:09
पुणे: राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्यावर सडकून टीका केली आहे. गुलाबराव पाटील मीडियाशी बोलत होते. राज ठाकरेंना मी लहानपणापासून ओळखतो. हाफ चड्डीपासून मी शिवसैनिक आहे. तेव्हा पासून ते आमच्या जिल्ह्यात यायचे. चंचल माणूस आहे, चंचल स्वभावामुळे या गोष्टी होत असतात, असा टोला पाटील यांनी लगावला.
 

gulabrao
 
 
उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि राज ठाकरे यांच्यातील फरक मी पाहिला आहे. ज्या प्रमाणे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे तीन ऋतू आहेत. तसे राज ठाकरे तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते आहेत. मनसे स्थापन करताना उत्तर प्रदेशातील लोकांना ठोकलं. पक्ष स्थापन झाल्यावर हम सब भाई आहे. आता काहीच हातात लागत नाही म्हणून हिंदुत्वाकडे टर्न केला.
 
नंतर त्यांना चमत्कार झाला. मोदींकडे गुजरातला गेले. आता मोदींवर टीका केली बारामतीत गेले, शरद पवारांची मुलाखत घेतली. आता शरद पवार वाईट झाले. हा सिझनेबल कार्यक्रम आहे, कोणत्याच ऋतूत काहीच मिळत नाही. पावसाळ्यात पाणी पडत नाही, उन्हाळ्यात ऊन पडत नाही, हिवाळ्यात थंडी वाजत नाही. मूळ त्यांनाच धागा मिळत नाही, मी कोणत्या धाग्याने यशस्वी होऊ शकतो. म्हणून ही धडपड आहे, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली.
 
आता पिक्चर टू सुरू आहे
 
मनसेच्या हनुमान चालिसावरही त्यांनी टीका केली. हनुमान चालिसा लावायला कोणाची मनाई आहे? भोंगा उतरवा म्हणणारे पहिले आपल्या बापाचे बाप बाळासाहेब ठाकरे होते. त्या काळात कोणत्या माईच्या लालची हिंमत होती बोलायची? तेव्हा आमचा एकच बाप बोलायचा. पहिला पिक्चर काढला आता हा पिक्चर टू आहे. बोलणं सोप्पं आहे. करणं कठीण आहे. मला बोलायला लावू नका, त्यांना जितकी मी ओळखतो तितकं तुम्ही ओळखत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपाच्या समोर हनुमान चालिसा लावू, असा टोलाही त्यांनी लगावला.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भेटीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. भेट घेतली पाहिजे, त्यांच्या नावात ठाकरे आहे. काही तरी आरोप करायचे म्हणून करतात. ज्या माणसाला स्वतःचा एक नगरसेवक राखता येत नाही त्याच्या बद्दल काय बोलायचं? असा टोला त्यांनी लगावला.
 
उद्धव ठाकरे आमचं इंजिन
 
महाविकास आघाडीत तिघांचं नेतृत्व आहे. आम्ही तर डब्बा आहे, उद्धव ठाकरे आमचं इंजिन आहे. आम्ही इंजिनच्या मागे चालणारे कार्यकर्ते आहोत. जे निर्णय ते घेतात त्याची अंमलबजावणी आम्ही करत असतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Powered By Sangraha 9.0