50 मंत्र्यांनी सोडली इम्रान खान यांची साथ

- सरकार पडेल, विरोधकांचा दावा

    दिनांक : 27-Mar-2022
Total Views |
इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात विरोधकांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावरील मतदानाची वेळ जवळ येत आहे, तसतसे त्यांच्या खासदार आणि मंत्र्यांचे पळ काढण्याचे प्रमाण वाढत आहे.
 

imran-khan
 
आता जवळपास 50 मंत्र्यांनी इम्रान खान यांची साथ सोडल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. सत्ताधारी तेहरिक-ए-इन्साफ पक्षाची अनिश्चितता यामुळे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 50 मंत्र्यांनी साथ सोडल्याने इम्रान सरकारची वाट अधिकच बिकट झाली आहे.
 
इम्रान खान यांची साथ सोडणार्‍यांमध्ये संघीय आणि प्रांतीय सल्लागार तसेच विशेष सहकारी व राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. सत्ताधारी आघाडीतील इतर सहकारी पक्षांप्रमाणेच हे मंत्रीदेखील अन्य पर्यायांवर विचार करीत आहेत आणि योग्य वेळी आपली भूमिका जाहीर करतील, असे सूत्रांनी सांगितले. मात्र, परराष्ट्र व्यवहार मंत्री शहा महमूद कुरेशी, माहिती मंत्री फवाद चौधरी, ऊर्जा मंत्री हम्माद अजहर, संरक्षण मंत्री परवेझ खट्टर आणि गृहमंत्री शेख राशिद हे अद्याप इम्रान खान यांच्या पाठीशी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
अर्थसंकल्पानंतर निवडणूक घ्यावी : शेख राशिद
 
संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर इम्रान खान यांनी निवडणूक घ्यावी, असा सल्ला गृहमंत्री शेख राशिद यांनी इम्रान खान यांना दिला आहे. विरोधी पक्षांनी संसदेत अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर इम्रान खान यांची लोकप्रियता वाढली आहे, असा दावा त्यांनी केला. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लवकर निवडणूक घेण्याची कल्पना हे माझे वैयक्तिक मत असून, ती सत्ताधारी पक्षाची अधिकृत भूमिका नाही, असे राशिद यांनी सांगितल्याचे वृत्त डॉन या वृत्तपत्राने दिले आहे. हा अर्थसंकल्प 30 जून रोजी संसदेत सादर केला जाणार आहे.