एमआयएमच्या 'ऑफर'ने सेनेचे पितळ उघडे!

    दिनांक : 20-Mar-2022
Total Views |

प्रहार


ओवैसी यांचा पक्ष मजलिसे इत्तेहादूल मुसलमीन म्हणजे एमआयएमचे खासदार इम्तियाझ Imtiaz Jalil जलील यांनी एक जबरदस्त डाव खेळला.


pawar 

 

त्यांनी एक विधान केले. ते म्हणाले की प्रत्येक निवडणुकीत एमआयएममुळे भाजपविरोधी मतांचे विभाजन होते आणि त्याचा फायदा भाजपला होऊन भाजप विजयी होतो असा आरोप केला जातो. अगदी एमआयएमला भाजपची बी टीम असे हिणवले जाते. मग आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार आहोत. महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढविण्याचा आमचा प्रस्ताव आम्ही देत आहोत.

खासदार जलील Imtiaz Jalil यांनी हा प्रस्ताव देताच महाविकास आघाडीत तोंड लपविण्याची धावपळ सुरू झाली आहे. अंगावर पाल पडावी तशी पहिली प्रतिक्रिया आली आहे ती शिवसेनेचे विश्वप्रवक्ते संजय राऊत यांची! काहीही झालं तरी लगेच तोंडपाटीलकी करायला तयार असणारे राऊत मागे कसे राहतील? उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रचंड विजय झाला आणि शिवसेनेचा प्रचंड डिपॉझिट जप्त पराभव झाला तेव्हा राऊत अगदी महापराक्रम केल्यासारखे माध्यमांसमोर येऊन म्हणाले होते की ओवैसी आणि मायावती यांनी भाजपला विजय मिळविण्यास मदत केली त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण असे पुरस्कार दिले पाहिजेत. आता ते पुरस्कार सोडा, इम्तियाझ जलील फक्त युती करून महाविकास आघाडीला मदत करू इच्छित आहेत तरीही राऊत यांना मिरची लागली आहे. राऊत यांनी म्हटलं की, जे औरंगजेबच्या कबरीवर डोकं टेकतात त्यांच्याशी आमची आघाडी होऊ शकत नाही. राऊत एमआयएमला पद्मभूषण द्यायला निघाले होते, आता आघाडी करण्याच्या कल्पनेवर त्यांना लगेच नकार सुचतो आहे.

इम्तियाझ जलील Imtiaz Jalil यांनी एमआयएमकडून शिवसेना सहभागी असलेल्या आघाडीला एकत्रित निवडणूक लढविण्याची ऑफर देणे यातच शिवसेनेचे वस्त्रहरण आहे. भाजपसोबतची युती तोडून शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मोहापायी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करून सत्तेत गेली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि कथित सेक्युलर माध्यमे शिवसेनेच्या भलतीच प्रेमात पडलेली आहेत. शिवसेना सेक्युलर झाल्याचा साक्षात्कार त्यांना झाला आहे. मात्र शिवसेनेच्या मनात हिंदुत्त्ववादी मतदार दूर होईल याची चांगलीच भीती आहे. त्यामुळे शिवसेना अधूनमधून सावरकर, शिवाजी महाराज, किल्ले, संभाजीनगर असे विषय घेत असते. जलील यांनी आघाडीची ऑफर देऊन शिवसेना सेक्युलर झाल्याचा आरोपच जणू करून टाकला. इतका झोंबणारा की तातडीने शिवसेनेच्या विश्वप्रवक्त्यांना त्याचा इन्कार करत समोर यावे लागले.

शिवसेना जरी जोरात इन्कार करत असली तरी तितक्या जोरात राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यावर बोलायला तयार नाहीत. शिवसेनेला सेक्युलॅरिजमचा शिक्का बसला तर त्यांना ते हवेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर बोलताना गोलमाल विधान केले आहे. राष्ट्रवादीचे राजेश टोपे हे जलील Imtiaz Jalil यांना सांत्वनपर भेटायला गेले होते. अशा भेटीत राजकीय चर्चा करायची नसते. त्यामुळे त्यावेळी आघाडीविषयी काही चर्चा झाली असेल असे आपल्याला वाटत नाही. तथापि नेमकी काय चर्चा झाली ते माहिती नाही, त्यामुळे आपण त्यावर बोलणार नाही वगैरे वगैरे... याचा अर्थ एमआयएमशी आघाडी करण्याला त्यांचा नकार नाही. मात्र, नेमकी काय बोलणी झाली आणि कोणत्या प्रसंगात झाली त्यावर त्यांचं दुमत आहे. काँग्रेसचे यावर काय मत आहे ते अजून अधिकृतरीत्या माध्यमांसमोर आलेले नाही. मोदींविरोधात जे जे कोणी जगात कोठेही बोलत असेल तर त्याला नाना पटोले यांचा पाठिंबा असतोच. त्यामुळे त्यांना संधी मिळाली तर ते लगेच इम्तियाझ जलील यांचा प्रस्ताव विचारार्थ पक्षासमोर मांडण्यास तयार होतील. फक्त शिवसेनेने अंग झटकले आहे. इम्तियाझ जलील यांनी संजय राऊत यांच्या विधानाला सडेतोड उत्तर दिले आहे. ते म्हणतात की औरंगजेबाच्या कबरीवर डोके टेकवणारे अब्दुल सत्तार शिवसेनेला चालतात तर मग एमआयएम का चालत नाही?

राजकारणात एकदा भूमिका चुकली की नंतर कितीही सारवासारव केली तरी गाडी घसरत कशी जाते त्याचे शिवसेना हे उदाहरण ठरली आहे. अब्दुल सत्तार हे विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवसेनेत गेले. भाजपमध्ये मेगाभरती चालू असल्याने शिवसेना अस्वस्थ होती. त्या अस्वस्थतेचा परिणाम म्हणजे काहीही विचार न करता अब्दुल सत्तार यांच्या मनगटावर शिवबंधन बांधण्यात आले. येनकेन प्रकारेण निवडणुका जिंकण्याचे तंत्र अब्दुल सत्तार यांनी अवगत केलेले असल्याने ते शिवसेनेचे आमदार म्हणून विजयी झाले आणि त्यांना शिवसेनेने मंत्रीपदही दिले. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि अब्दुल सत्तार यांचे सूर अजून जुळलेले नाहीत. आता जलील Imtiaz Jalil यांनी तर सत्तार चालतात मग एमआयएम का नको, असे विचारत शिवसेनेच्या हिंदुत्त्वाचे रंग किती बेगडी आहेत हे उघडे पाडले आहे. इतकेच नाही, तर त्यांनी शिवसेनेला एक खोचक प्रश्न विचारला आहे. तो केवळ शिवसेनेला नाही तर महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांना विचार करायला लावणारा आहे. जलील म्हणतात की तुम्हाला मुसलमानांची मते नको आहेत काय? तसे असेल तर स्पष्ट सांगा. महाराष्ट्रात वैचारिक भेसळ करून महाविकास आघाडी झालेली असल्याने शिवसेनेसारख्या पक्षाला ही भीती सतत वाटत आहे की प्रत्यक्षात मतदानाची वेळ जेव्हा येईल तेव्हा शिवसेनेचा हिंदुत्त्वामुळे बांधील जो मतदार आहे तो शिवसेनेपासून दूर गेला तर सेनेचे मोठे नुकसान होणार आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा सेक्युलर मतदार सेनेला हिंग लावून विचारणार नाही. अशी स्थिती झाली तर दोन्हीकडून सेनेची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी होईल. त्यासाठी जलील यांनी नेमका प्रश्न विचारला आहे की मुस्लिम मते नको असतील तर तसे स्पष्ट सांगा. तत्त्व म्हणूनही जलील यांनी कसली उधारी ठेेेेेेेेवलेली नाही. ते म्हणतात की कबरीवर डोके टेकवण्याचा विषय म्हणाल तर आम्ही फक्त अल्लापुढे डोके टेकवतो, अन्य कोठेही नाही. अशा स्थितीत शिवसेनेची स्वबळावर लढायची इच्छा (किंवा ताकद) आहे काय? शिवसेनेला तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कुबड्या घेऊन चालायचे आहे. तसे असेल तर मग एमआयएम का नाही चालत, असा जलील Imtiaz Jalil यांचा रोकडा सवाल आहे. एका प्रस्तावातून जलील यांनी सद्यपरिस्थितीत शिवसेनेची झालेली राजकीय कोंडी अगदी उघडी करून मांडली आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचे सगळेच गाडे फसत चालले आहे. खरे पितळ उघडे पडत चालले आहे. केवळ इम्तियाझ जलील Imtiaz Jalil यांच्या प्रस्तावामुळेच नाही तर अनेक विषयात हीच अवस्था आहे. नवाब मलिक प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच कात्रीत सापडली आहे. संजय राठोड यांचा राजीनामा घेतला. अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला गेला. मात्र नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जात नाही. नवाब मलिक यांच्यावर जास्त गंभीर आरोप आहे. मुंबईत बॉम्ब स्फोटांची मालिका घडविणार्‍या दाऊद आणि त्याच्या टोळीच्या आरोपींसोबत मलिक यांनी जमिनीचे आणि पैशाचे व्यवहार केल्याचा आरोप आहे. तरीही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. या एका विषयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांची सगळी अब्रू चव्हाट्यावर आली आहे. या दोन काँग्रेसपेक्षाही मुंबईत हिंदूंचे रक्षण आपणच केले असा दावा सांगणारी शिवसेना जास्तच अडचणीत आली आहे. उरलेसुरले विषय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधिमंडळात रोज एक स्फोट करत लावून धरत आहेत. हे सरकार लीनदीन आणि खिळखिळे झाल्यासारखे दिसत आहे. त्यातल्या त्यात शिवसेनेचे पितळ उघडे पडले आहे. कसलाही आटापिटा न करता निवडणुकीत आघाडी करण्याचा प्रस्ताव देऊन इम्तियाझ जलील यांनी शिवसेनेचे सगळे रंग उघडे पाडले आहेत. शिवसेनेचे बदलेले चित्र आणि चरित्र त्यांनी अगदी शिवसेनेच्या प्रवक्त्यांना बोलते करून उघडे पाडले आहे.

समोर माईक आले की कसलाही विचार न करता भुवया उडवत आणि आकाशाकडे पाहात जे तोंडाला येईल ते बोलत सुटायचे अशी जी तर्‍हा संजय राऊत यांची आहे त्याला जलील Imtiaz Jalil यांनी उघडे पाडत औरंगाबाद जिल्ह्यातील अब्दुल सत्तार यांचेच उदाहरण देत बिनतोड युक्तिवाद मांडला आहे. मुस्लिमांची मते हवीत म्हणून प्रत्येक निवडणुकीत रणनीती करणारे दोन्ही काँग्रेसचे नेते आणि मुस्लिम लांगूलचालनाचा शिक्का लागू नये याची खबरदारी घेत फुंकून फुंकून चाललेली पण, मुळात चुकलेली शिवसेना, हे सगळे एका प्रस्तावाने जलील यांनी जगासमोर आणले आहे. हा सगळा चक्रव्यूह असा आहे की, महाविकास आघाडीचे नेते जेवढी धडपड करतील तेवढे यात फसतच जातील. भाजप-सेना युती करून नरेंद्र मोदी यांचे नेतृत्त्व समोर करून गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने यश मिळवले. निवडून येताच जनादेशाचा एक प्रकारे अवमान करत भाजपशी युती तोडून मुख्यमंत्रिपदासाठी दोन काँग्रेससोबत महाविकास आघाडी केली. आता 'एक नंबर मुख्यमंत्री', हिंदुत्त्ववादी शिवसेना असा कितीही आव आणला तरी ना प्रशासनात, ना लोकांसमोर कल्याणकारी राज्य चालविण्यात, ना हिंदुत्त्वाचा पुरस्कार करण्यात कोठेही शिवसेना यशस्वी नाही. शिवसेनेला कुबड्या लागणारच आहेत. हे जळजळीत सत्य जलील यांनी उघड केले आहे. पितळ उघडे पाडले आहे.

 

 
- दिलीप धारूरकर
   9422202024