इम्रान खान सरकार संकटात, इम्रान खान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव

19 Mar 2022 15:44:52
मुंबई : पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थैर्य निर्माण झालंय. इम्रान खान सरकारविरोधात (Imran Khan Government) या महिनाअखेरीला अविश्वास प्रस्ताव येत असताना त्यांचा पक्ष फुटल्याचं दिसत आहे. तर लष्करानंही खान यांच्या डोक्यावरचा वरदहस्त काढला आहे.
 

imran 
 
 
 
पाकिस्तानातील इम्रान खान सरकारनं अखेरच्या घटका मोजायला सुरूवात केली आहे. विरोधी पक्षांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. त्यातच खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ या पक्षाच्या 24 खासदारांनी बंडाचं निशाण फडकवल आहे.
 
हे खासदार इस्लामाबादच्या सिंध हाऊसमध्ये असल्याची माहिती समोर आलीये. या बंडखोरीमुळे खान सरकार संकटात सापडलं.
 
पाकिस्तानी सदस्यांच्या 342 सदस्यांच्या लोकसभेत 172 हा जादुई आकडा आहे. खान यांच्या PTIचे 155 खासदार आहेत. त्यांना सरकारस्थापनेवेळी 6 छोट्या पक्षांच्या 23 सदस्यांनी पाठिंबा दिला होता. मात्र आता 5 खासदार असलेला PMLQ, 7 खासदार असलेल्या MQM आणि 5 खासदार असलेल्या बलुचिस्तान आवामी पार्टी यांनीआपले पत्ते उघड केलेले नाहीत.
हे पक्ष दोन्ही दगडांवर पाय ठेवून चांगल्या 'डील'च्या शोधात असल्याची चर्चा आहेत. त्यातच आता खुद्द इम्रान खान यांचे 24 मोहरे विरोधकांच्या गळाला लागल्याचं दिसत आहे. 
 
एकीकडे इस्लामाबादमध्ये घोडेबाजार तेजीत आला असताना सर्वशक्तिमान पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनीही खान यांच्या डोक्यावरचा हात काढलाय. या राजकीय साठमारीमध्ये लष्कर तटस्थ राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. त्यामुळे खान यांच्या बुडत्या सरकारचा भक्कम आधारही हरपला आहे.
 
विरोधी पक्षांची एकी, मित्रपक्षांनी सोडलेली साथ आणि स्वपक्षीयांचं बंड यामुळे इम्रान खान सरकार अडचणीत आलंय. 28 मार्चला अविश्वास प्रस्तावावर मतदान असून त्याच्या एक दिवस आधीच इस्लामाबादच्या डेमोक्रेसी चौकात 10 लाखांचा मोर्चा काढण्याची घोषणा खान यांनी केली.
.
मात्र सरकार वाचवण्यासाठी मोर्चा नव्हे, तर संसदेतील बहुमत उपयोगी पडणार आहे आणि सध्या ते खान यांच्याकडे आहे, असं दिसत नाही. खान सरकारचा अंत जवळपास निश्चित असला तरी त्यानंतर सत्तेच्या साठमारीतून पाकिस्तानात पुन्हा अराजकता माजण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0