गलवान खोऱ्यातील 'जवान' चीनचा ऑलिम्पिक मशालवाहक

चीनची नवीन कुरापत

    दिनांक : 03-Feb-2022
Total Views |
नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात झालेल्या भारत - चीन संघर्षात जखमी झालेल्या जवानास बीजिंग ऑलिम्पिक २०२२ साठी मशालवाहक निवडला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. क्वी फाबाओ असे या जवानाचे नाव आहे. हा चीनच्या लिबरेशन आर्मीचा जवान आहे. जून २०२० मध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. मागच्याच वर्षी त्याला ' हिरो रेजिमेंट कमांडर ' या पदवीने सन्मानित केले गेले होते.
 

Chinese-soldier-as-torchbeare 
 
४ फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेच्या ऑलिम्पिक ज्योत समारंभात तो चीनचा मशालवाहक म्हणून सामील झाला होता. जून २०२० मध्ये झालेल्या या गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर दोन्ही देशांकडून शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चेने तोडगा काढण्यासाठी विविध पातळ्यांवर चर्चा सुरु आहेत, पण चीन मात्र या घटनेचा वापर करून आपले वर्चस्व प्रस्थापित करू पाहत आहे. सातत्याने या मुद्यावरून त्याने कुरापती काढण्याचे धोरण अजून चालूच ठेवले आहे.
 
अमेरिकेच्या परराष्ट्र समितीच्या एका वरिष्ठ सभासदाने या घटनेबद्दल चीनचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. " गलवान खोऱ्यातील जवानास ऑलिम्पिक मशालवाहक म्हणून निवडण्याचे चीनचे हे कृत्य अतिशय निदनीय आहे. ह्या घटनेचा तसेच उघूर लोकांच्या नरसंहाराचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. उघूर स्वातंत्र्याचा आणि भारताच्या सार्वभौमत्वाचा अमेरिका कायमच पुरस्कार करत राहील" असे या वरिष्ठ सभासदांनी ट्विट करून म्हटले आहे.