खलिस्तानवर मोदी सरकारचा 'डिजिटल स्ट्राइक'; दहशतवाद रोखण्यासाठी मोठे पाऊल

    दिनांक : 22-Feb-2022
Total Views |
नवी दिल्ली : देशात हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 'सिख फॉर जस्टिस' (एसएफजे) या खलिस्तानी दहशतवादी संघटनेवर केंद्र सरकारने जोरदार कारवाई केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 'एसएफजे'शी संबंधित 'पंजाब पॉलिटिक्स टीव्ही'चे अॅप्स, वेबसाइट, सोशल मीडिया हँडल ब्लॉक करण्याचा आदेश जारी केला आहे. वास्तविक, ही वाहिनी पंजाब विधानसभेत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याची गुप्तचर माहिती सरकारला मिळाली होती.

Modi-Khalisthan
 
केंद्र सरकारने शुक्रवारी (१८ फेब्रुवारी, २०२२) रोजी खलिस्तान समर्थक वाहिनीवर कारवाई केली आहे. यासाठी आयटी कायद्यांतर्गत आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, भारत सरकार देशाची सुरक्षा, एकता आणि अखंडता राखण्यासाठी वचनबद्ध आहे. याआधी, शीख फॉर जस्टिसचे प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यांनी पंजाबचे गायक दीप सिद्धू यांच्या मृत्यूला राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले होते आणि केंद्र सरकारने त्यांची हत्या केल्याचा दावा केला होता. उल्लेखनीय आहे की, १७ फेब्रुवारी रोजी पंजाबमधील लुधियाना येथे अभिनेता दीप सिद्धूच्या अंत्यसंस्काराच्या वेळी खलिस्तानी घोषणाही देण्यात आल्या होत्या.
 

Blocked 
 
'सिख्स फॉर जस्टिस' ही दहशतवादी संघटना पंजाबमधील निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असताना केंद्र सरकारने ही कारवाई केली आहे. सोबतच ही संघटना कर्नाटक बुरखा प्रकरणाचा वापर मुस्लिमांना केंद्र सरकारविरुद्ध बंड करण्यासाठी प्रवृत्त करत होती. अलीकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये शीख फॉर जस्टिसच्या पन्नूने मुस्लिमांना भारत तोडून मुस्लिमांसाठी वेगळे राष्ट्र 'उर्दिस्तान' निर्माण करण्यास सांगितले होते. 'एसएफजे'ने हिजाबवर बंदी घालण्याचा खोटारडेपणा पसरवताना हिजाब चळवळ चालवून देशात सार्वमत घेण्याचे आवाहन केले होते.