हिंदुत्वद्वेष्ट्यांची पुन्हा नसती उठाठेव!

21 Feb 2022 13:16:39
ओटावा : हिंदू परंपरांच्या बदनामीचा घाट घालणार्‍या हिंदुत्वद्वेष्ट्यांनी पुन्हा एकदा नसती उठाठेव सुरू केल्याचे चित्र आहे. अमेरिकन देश असणार्‍या कॅनडामध्ये ‘स्वस्तिक बंदी’ची मागणी होऊ लागली असून यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. याबाबत सरकारकडून अंतिम निर्णय झालेला नाही. परंतु, याबाबतचे विधेयक सादर झाल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी याला कडाडून विरोध करण्यास सुरुवात केली आहे.
 

Swastik 
 
अमेरिकेत गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात काही हिंदुत्वद्वेष्ट्यांनी ‘डिस्मँटलिंग ग्लोबल हिंदुत्व कॉन्फरन्स’ आयोजित करत हिंदूंच्या परंपरांच्या बदनामीचा घाट घातला होता. या प्रकाराला हिंदुत्ववाद्यांनी कडाडून विरोध केला होता. ऑक्टोबरमध्ये अमेरिकेतील अनेक प्रांतामध्ये ‘हिंदू हेरिटेज मंथ’ आयोजित करत हिंदुत्ववाद्यांनी याला ‘जशास तसे’ प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता जवळपास चार महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर कॅनडामध्ये आता काही हिंदुत्वद्वेष्ट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.
 
कोरोना प्रतिबंधात्मक लस अनिवार्य आणि नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’ला विरोध करण्यासाठी कॅनडामध्ये अनेक ट्रक चालकांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी ‘स्वस्तिक’चे चिन्ह असेलेले आणि काही ‘कॉन्फेडरेट’ झेंडे फडकाविले. या घटनेनंतर ‘न्यू डेमोक्रेटिक’ पक्षाचे नेते जगमीत सिंग यांनी एक ट्विट केले. त्यात म्हटले होते की, “ ‘स्वस्तिक’ चिन्ह असलेल्या आणि ‘कॉन्फेडरेट’ झेंड्याला कॅनडामध्ये काहीही महत्त्व नाही. कॅनडामध्ये तिरस्काराच्या प्रतिकांना प्रतिबंध करण्याची हीच वेळ आहे.” यानंतर यासंदर्भात एक विधेयकही आणण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
 
या प्रकाराला हिंदुत्ववादी संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. येथील ‘हिंदू पॉलिसी रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅडव्होकसी कलेक्टिव्ह’ (हिंदूपॅक्ट) या हिंदुत्ववादी संघटनेने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि सिंग यांच्याकडे आक्षेप नोंदवला आहे. हिंदू, बौद्ध, शीख आणि जगभरातील अनेक स्वदेशी समुदायांसाठी प्राचीन प्रतिक असलेले ‘स्वस्तिक’ हे ‘हकेनक्रेज’सोबत जोडू नये, असे या संघटनेने म्हटले असून ‘स्वस्तिक बंदी’च्या निर्णयाला विरोध केला आहे. टोरंटो येथील भारत सरकारच्या अधिकारी रागिणी शर्मा यांनीही ‘स्वस्तिक बंदी’ची मागणी पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. भारताचे महावाणिज्यदूत अपूर्व श्रीवास्तव याबाबत म्हणाले की, “या मुद्द्यावर औपचारिकपणे कॅनडाशी आपण संवाद साधला आहे. तेथील लिबरल पार्टीचे खासदार चंद्र आर्य हे हा मुद्दा ‘हाऊस ऑफ कॉमन’मध्ये उठवतील,” असे त्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0