कोल्हापुरी 'राजा'चा रुबाब कायम, हापूसला कोल्हापुरात विक्रमी दर

    दिनांक : 10-Feb-2022
Total Views |
कोल्हापूर : आंबा उत्पादनात घट असो की वाढ फळांच्या राजाचे अर्थात हापूस आंब्याचे महत्व कायम राहिलेले आहे. यंदा तर अनेक संकटावर मात करीत हा राजा डौलत कोकणातून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होत आहे.
 
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूसचे आगमन झाले असून मुहूर्ताच्या सौद्यामध्ये 5 डझनाच्या पेटीला तब्बल 40 हजार 599 असा दर मिळालेला आहे. अर्थात एका आंब्यासाठी व्यापाऱ्याला 676 रुपये मोजावे लागले आहेत. वातावरणातील बदलामुळे यंदा देवगडचा हापूस बाजारात उशिराने दाखल होत आहे. मात्र, खवय्यांना त्याचीच प्रतिक्षा असून दराचा विचार न करता खरेदी केली जात आहे.
 

hapus 
चव अन् सुगंधामुळे खवय्येगिरांना भुरळ
 
कोल्हापूरात कोकणासह कर्नाटकातून हापूस आंब्याची आवक होत असते. कोकणातील रत्नागिरी, देवगड, सिंधुदुर्ग, मालवण यासह किनारपट्टीच्या भागातून आवक होत असते. दरवर्षी कोल्हापूरातील खवय्येगिरींना हापूसच्या आगमानाची मोठी उत्सुकता असते. रत्नागिरी हापूस आंबा आकाराने लहान असला तरी त्याचा सुगंध आणि चव अप्रतिम असल्याने ग्राहकांना त्याची प्रतिक्षा असते. यंदा पहिल्या टप्प्यात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूसचे आगमन झाले होते. त्यानंतर आता कोल्हापुरात आगमन झाले आहे.
 
एका आंब्याची किंमत 676 रुपये
 
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 डझनाची एक पेटी दाखल झाली आहे. बाजारात हापूस आंबा दाखल होताच त्याच्या सौद्याला सुरवात झाली होती. मुहूर्ताच्या हापूसला दरवर्षीच विक्रमी दर मिळतो. गतवर्षी 625 रुपयांना एक आंबा पडला होता तर यंदा 676 रुपायांना. 5 डझनाची एक पेटी ही तब्बल 40 हजार 599 रुपायांना विकली गेली आहे. हे मुहूर्ताचे दर असले तरी यंदा घटलेले उत्पादन आणि निसर्गाची अवकृपा यामुळे दर चढेच राहतील असाच अंदाज व्यक्त केला जात आहे.
 
15 जूनपर्यंत सुरु राहणार आवक
 
निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा आवक थोडीफार उशिराने झाली असली तरी 15 जूनपर्यंत हापूस आंब्याची आवक सुरु राहणार आहे. हंगामाच्या सुरवातीला मुंबई येथे आवक सुरु होते. कारण येथील वातावरण आंबा पिकवण्यासाठी पोषक असते. त्यामुळे 4 ते 5 दिवस आगोदर आंबा दाखल झाला तरी काही परिणाम होत नाही. मात्र, कोल्हापूरात एक दिवस आगोदरच हापूस आंबा दाखल होता. आता 15 जूनपर्यंत आवक सुरु राहणार असल्याने खवय्येगिरांना चव चाखता येणार आहे.