वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सचिनने शेअर केला कांबळीसोबतचा बालपणीचा फोटो; लिहिले, 'हॅप्पी बड्डे कांबल्या.'

18 Jan 2022 15:20:40
माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी आज १८ जानेवारी आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिनी चाहत्यांपासून आजी-माजी क्रिकेटपटूंपर्यंत सर्वांनी कांबळींवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Sachin Tendulkar-Vinod Kambli 
 
अशात कांबळींचा जिवलग मित्र आणि माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यानेही त्याला गमतीशीर पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
 
सचिनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून कांबळीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्याने कांबळीसोबतचा आपला एक बालपणीचा फोटो शेअर केला आहे आणि एक सध्याचा फोटो जोडला आहे. या फोटोंवर कॅप्शन देत त्यावे लिहिले आहे की, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा कांबल्या! तुझ्यासोबतच्या मैदानावरील आणि मैदानाबाहेरील असंख्य आठवणी मी आयुष्यभर जपत राहीन. वयाच्या पन्नाशीत पोहोचल्यानंतर तुला कसे वाटते आहे, हे ऐकण्यास मी उत्सुक आहे.'
 
विश्वविक्रमी सचिन-कांबळीची भागिदारी
 
कांबळी आणि सचिनने अगदी शालेय स्तरापासून एकत्र क्रिकेट खेळले आहे. आजही या जोडीच्या विश्वविक्रमी ६६४ धावांच्या भागिदारीची आठवण काढली जाते. फेब्रुवारी १९८८ मध्ये हॅरिस शिल्ड या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत शारदाश्रम विद्यामंदिर संघाकडून त्यांनी ही मॅरेथॉम भागिदारी रचली होती. सेंट झेवियर हायस्कूलविरोधात स्पर्धेतील उपांत्य सामना खेळताना त्यांनी ही भागिदारी केली होती.
Powered By Sangraha 9.0