MPSCची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

15 Jan 2022 18:15:56
पुणे : राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करणार्‍या एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्यानं पुण्यात खळबळ उडाली आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत आज दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. अमर रामचंद्र मोहिते (वय ३१) असं या तरुणाचं नाव आहे.
 

amar 
 
 
अमर हा मूळचा सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील होता. त्याचा भाऊ पिंपरी चिंचवड पोलिस दलात सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्यानं अभ्यासासाठी अमर पुण्यात आला होता. सदाशिव पेठेतील विठ्ठल मंदिराजवळच्या हॉस्टेलमध्ये तो राहत होता. तिथंच त्यानं गळफास लावून घेतल्याचं समोर आलं आहे.
 
अमर हा पीएसआय फिजिकलची तयारी करत होता. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळं पीएसआयच्या फिजिकलमधून अमर मोहिते हा बाहेर पडला होता. त्याशिवाय, करोना काळात अनेकदा परीक्षा रद्द झाल्यानंही तो सतत तणावात होता. त्याच तणावातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं असावं, असं बोललं जात आहे. या प्रकरणी विश्राम बाग पोलीस अधिक तपास करत आहेत. स्पर्धा परीक्षा सातत्यानं पुढं ढकलल्या जात असल्यानं मागील वर्षी स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यानं पुण्यात आत्महत्या केली होती. त्यानंतर आता पुन्हा तोच प्रकार घडला आहे. त्यामुळं खळबळ उडाली आहे.
 
दरम्यान, यापूर्वीही एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या दौंड तालुक्यातील स्वप्निल लोणकर, मल्हारी नामदेव बारवकर या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती.
Powered By Sangraha 9.0