हिबतउल्ला अखुंदजादा राहणार तालिबानचा सर्वेसर्वा

    दिनांक : 09-Sep-2021
Total Views |
काबुल : तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला हिबतउल्ला अखुंदजादा अफगाणिस्तानातील नवीन सरकारचे नेतृत्व करेल, असे वृत्त स्थानिक माध्यमांनी तालिबानी प्रवक्त्याच्या हवाल्याने दिले आहे. इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान या नावाने ओळखल्या जाणार्‍या अफगाणिस्तानमधील नवीन सरकारचे नेतृत्व मुल्ला हिबतउल्ला अखुंदजादा करेल, असे तालिबानचा प्रवक्ता जबिउल्ला मुजाहिदने सांगितल्याचे वृत्त टोलो न्यूजने दिले आहे. तालिबानमधील सर्वोच्च पद अखुंदजादाने कायम ठेवले असून, तालिबानमधील राजकीय, धार्मिक आणि लष्करी विभागांवर त्याचे 2016 पासून नियंत्रण होते.
  
Hibatullah-Akhundzada_1&n
 
अखुंद होता बुद्धमूर्तीच्या तोडफोडीचा सूत्रधार
 
अफगाणिस्तानाचा काळजीवाहू पंतप्रधान मुल्ला हसन अखुंद हा 2001 मधील बामियानमधील बुद्धमूर्तींच्या तोडफोडीचा प्रमुख सूत्रधार होता, अशी माहिती समोर आली आहे. पेन स्टेट विद्यापीठात पश्चिम आशिया आणि इस्लाम विषयाचे इतिहासतज्ज्ञ अली ए. ओलोमी यांनी उपरोक्त माहिती दिली.
 
अफगाणिस्तानातील एक अत्यंत कट्टर आणि रहस्यमय व्यक्तिमत्त्व असलेला मुल्ला अखुंद हा नव्वदच्या दशकात तालिबानच्या स्थापनेपासूनच संघटनेमधील प्रभावी व्यक्ती राहिलेला आहे. त्यावेळच्या बहुतांश तालिबानी नेत्यांप्रमाणे तो सोव्हिएत-अफगाणिस्तान युद्धात सहभागी झाला नव्हता. मात्र, धार्मिक बाबतीत त्याचा मोठा प्रभाव तालिबान्यांवर आहे. धार्मिक नेते आणि मुल्लांचा समावेश असलेल्या, निर्णय घेण्याचे अधिकार असलेल्या, शुरा परिषद या पारंपरिक समितीत त्याचा समावेश होता. तालिबानचा नेता मुल्ला मोहम्मद ओमर याचा सुरुवातीला बामियानमध्ये तोडफोड करण्याचा उद्देश नव्हता. मात्र, संयुक्त राष्ट्रसंघाकडून मानवी दृष्टिकोनातून मदतीऐवजी बामियान वारसास्थळ संवर्धनासाठी मदत मिळत असल्याने संतप्त असलेल्या अखुंद याच्यासह शुरा परिषदेने या मूर्ती उद्ध्वस्त करण्याचा सल्ला दिला होता.