जळगाव : शहरासह जिल्हाभरात अनेक तालुकास्तरावर अमृतख जलवाहीन्या भुयारी गटारी आदींच्या कामांसाठी रस्ते खोदकाम करण्यात आले आहेत. या खोदकाम झालेल्या रस्त्यांची दुरूस्ती वेळेवर न झाल्यामुळे सर्वच ठिकाणी मोठमोठे खड्डे सर्वच परिसरात आहेत. रस्त्यांची पूर्णत: चाळण झाली आहे. रस्त्याच्या कामावरील माती मुरुम रस्त्यावर टाकल्याने पावसामुळे रस्त्यावर पावलोपावली खड्डे पडल्यामुळे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे गणरायांची वाट ‘बिकट’ असल्याने वाजतगाजत नसली तरी गणेश मंडळासमोर असलेल्या खड्ड्यांची समस्या मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते यांना भेडसावणार आहे.
यावर्षी जळगाव शहरातील डिमार्ट असो कि आकाशवाणी चौक असो, टॉवर चौक असो कि साध्या शिवाजीनगरातील गल्लीबोळातील रस्ते असोत सर्वच ठिकाणी भुयारी गटारींचे रस्त्याचे सध्या काम चालू असल्यामुळे अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक काही ठिकाणी दुतर्फा असली तरी खड्डयांमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यातच शुक्रवारी सर्वत्र गणरायाचे आगमन होणार आहे. गणरायाच्या आगमनाची शहरासह जिल्हाभरात जय्यत तयारी सुरू झाली असून शहरात युध्दपातळीवर मंडप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याaने गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात चैतन्य निर्माण झाले आहे. शहरातील मुख्य मार्गांसह अन्य मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे तसेच गणेश मंडळासमोर असलेल्या खड्ड्यांची समस्या मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते यांना भेडसावणार आहे. त्यामुळे खड्ड्यांच्या रस्त्यावरूनच गणरायाचे आगमन भक्तांना करावे लागणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आकाशवाणी चौकासह अन्य ठिकाणी असलेल्या गणराय मूर्ती विक्रीच्या स्टॉलमधून मूर्ती घेऊन गणेश मंडळे वाजतगाजत गणरायांची स्थापना करतात. मात्र शहरात सर्वच मार्गांवर खड्डेच खड्डे असल्याने सावकाशपणे वाहने चालवावी लागत आहेत. या खड्ड्यांची डागडुजी गणेशाच्या आगमनापूर्वी व्हावी अशी मागणी करण्यात आली असली तरी स्थानिक प्रशासनाकडून दूर्लक्षच करण्यात आले आहे. त्यामुळे या खड्ड्यांमधून गणेशभक्तांना मूर्ती स्थापन करण्यासाठी घेऊन जाव्या लागणार आहेत.