मुंबई: अभिनेता रजत बेदीच्या वाहनाखाली चिरडून एका व्यक्तीचा सोमवारी मृत्यू झाल्यानंतर त्याच्याविरोधात अंधेरी येथे आज मंगळवारी सायंकाळी एफआयआर दाखल करण्यात आला. हा अपघात सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास झाला, अशी माहिती डीएन नगर पोलिस ठाण्याच्या अधिकार्याने दिली. राजेश दूत असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव असून, तो पश्चिम अंधेरीतील झोपडपट्टीत राहायचा. त्याला गंभीर अवस्थेत कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला.
अपघातानंतर बेदीनेच राजेश दूतला रुग्णालयात दाखल केले. नंतर अपघाताची माहिती देण्यासाठी पोलिस ठाण्यात आला. राजेश दूत मद्यधुंद अवस्थेत अचानक वाहनासमोर आला, असा दावा त्याने केला आहे. आम्ही या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून साक्षीदारांचा शोध घेणार आहोत तसेच अपघाताचे नेमके कारण शोधू, अशी माहिती डीएन नगर पोलिसांनी दिली.