- रवींद्र देशपांडे
काही दिवसांपूर्वी एका साखरपुड्याच्या कार्यक्रमाकरिता गेलो होतो. गप्पागोष्टीत एक नातेवाईक त्यांच्या एका मित्राकडील घटना सांगत होते. मुलाचे नुकतेच लग्न झाले होते. दोघेही एका आयटी कंपनीत नोकरीला होते. सहज म्हणून मुलाचे आईवडील मुलाकडे गेले. सकाळी सासू नाष्ट्यात काय चालेल, याची माहिती सुनेला देत होती. सुनेने त्यांना मधेच अडवले व म्हणाली, ‘‘तुम्ही चिंता करू नका. थोड्या वेळेतच बाई येईल. तुम्हाला काय हवे ते करून घ्या. तुम्हाला काहीही खावे वाटले तर मला सांगत जा. उत्तम हॉटेलमधून ऑनलाईन बोलावून देईन आणि अजून एक! मला पंधरा लाखाचे पॅकेज आहे. त्यामुळे किचनमध्ये मी वेळ घालवणार नाही. तुम्हीही तशी अपेक्षा ठेवू नका.'' सासू-सासरे अवाक् झाले.
सासू म्हणाली, ‘‘तू लग्नाआधी हे का नाही सांगितले?''
‘‘तुम्ही कुठे विचारले होते?'' सुनेचे उत्तर.
सासू म्हणाली, ‘‘या गोष्टी विचारायच्या असतात का? हे गृहितच असते.''
त्यावर सुनेने फार बाणेदार(?) उद्गार काढले. ती म्हणाली, ‘‘मुलींना गृहित धरण्याचे दिवस आता संपले आहेत.''
पुढे त्या कुटुंबाचे काय झाले, त्यांनी त्यातून कसा मार्ग काढला, हे कळले नाही. पण माझ्या मनात मात्र अनेक गमतीदार कल्पनांनी जन्म घेतला. ‘त्या' सुनेचा युक्तिवाद कुटुंबातील अनेक कामांकरिता वापरता येईल. वृद्ध आईवडिलांची काळजी घेणे, त्यांची शुश्रूषा करणे, दवाखान्यात नेणे अशा कामांचे ‘आऊटसोर्सिंग' करता येईल. बालसंगोपन करणारे तज्ज्ञ प्रशिक्षित करून मुलांना सांभाळण्याचे कामही आऊटसोर्स करता येईल. मुलांनी आई-वडिलांवर प्रेम करावे, म्हणून आम्ही खास प्रयत्न करतो; अशी जाहिरातही काही लोक करतील. अर्थात गमतीचा भाग सोडला तर कुटुंब व्यवस्थेसमोर आज अनेक नवी आव्हानं उभी आहेत, हे मान्यच करावे लागेल. ती गुंतागुंतीचीही आहेत. एकूणच कुटुंबाविषयी आणि मानवी जीवनाविषयी आपली समज किती सखोल आहे, यावर त्याची उत्तरं अवलंबून आहेत.
कुटुंब ही मानवी जीवनाची गरज आहे. कुटुंब हीच सामाजिक जीवनाची पायाभूत व्यवस्था आहे. हा पाया डळमळीत झाला तर त्याचे परिणाम व्यक्ती, समाज व राष्ट्र यांना भोगावे लागतात, हे खरे म्हणजे आज सर्वमान्य झाले आहे. संघटित आणि समृद्ध समाजाकरिता आवश्यक असलेले संस्कार कुटुंबातच होऊ शकतात. ‘अपत्य प्रेम' ही मूलभूत, नैसर्गिक आणि सर्वात प्रबळ प्रेरणा आहे. अन्य अनेक प्रेरणांच्या मुळाशी हीच प्रेरणा असते. त्यातूनच कुटुंब व्यवस्था उभी झाली. विकसित झाली. माणसाच्या विकासाचे आव्हान या व्यवस्थेने समर्थपणे उचलले. म्हणूनच असे म्हणतात, ‘यू कॅन नॉट पे समवन टू डू फॉर अ चाईल्ड व्हॉट पेरेण्टस् डू फॉर फ्री' पालक मुलांकरिता जे नि:शुल्क करतात, ते कोणीही कितीही पैसे दिले तरी करू शकत नाही. तसेच मुलं आई-वडिलांकरिता जे करतात, ते कोणीही करू शकत नाही. या पवित्र कर्तव्याची तुलनाच होऊ शकत नाही. हे फक्त वेळ देणे नसते. जीवनाचा तो आनंद असतो, अनुभव असतो. त्यातूनच जीवन कळत जातं. आई, वडील, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण, पती, पत्नी या जीवनातल्या पर्मनन्ट, स्थायी, शाश्वत भूमिका आहेत. त्यात कधीच बदल होत नाही. जीवनासोबतच त्याचा शेवट असतो. खरे तर त्या भोवतीच जीवनाची मांडणी झाली पाहिजे. त्याचा अर्थ कुटुंबाच्या बेड्या घालून घेणं नव्हे किंवा कुटुंबापुरता विचार करणंही नव्हे. तर आकाशात झेप घेण्यासाठी पंखांना ताकद देणारी आधारभूत व्यवस्था उभी करणं!
दुर्दैवाने आज आपण पैसा आणि प्लेझर या भोवतीच फिरतो आहोत. करीअरचा अर्थही आज तोच झाला. आपण जबाबदारीपासून पळ काढतोय् आणि त्याकरिता कारणंही शोधतो. वैयक्तिक जबाबदारीची जाणीव संपली तर त्याचे परिणाम कुटुंब व्यवस्थेवर होणारच. फक्त पैसा मिळवणं म्हणजे कुटुंब चालविणं नव्हे. आपण प्रवाहासोबत वाहात चाललो आहोत. आर्थिक विकासासोबतच कुटुंबाच्या सामाजिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासाचीही गरज असते. कुटुंब ही आपली प्राथमिकता असली पाहिजे. त्याकरिता वेळ द्यावा लागतो, मनाने जबाबदारी स्वीकारावी लागते. जबाबदारीच्या बाबतीत किंवा घरातल्या कोणत्याच कामात मुलगा-मुलगी qकवा स्त्री-पुरुष असा भेद करणे योग्य नाही. शेवटी घरातली कामे करणे, म्हणजे कमीपणा नव्हे. सर्वांना सर्व कामे करता आली पाहिजेत. कोणी कोणती करायची, हे त्या त्या वेळेवर व समजावर अवलंबून आहे. त्यात ‘माझे तुझे' करण्यात अर्थ नसतो. नोकरी, व्यवसाय, करीअर यासोबतच घर सांभाळणे हाही कौशल्याचा व व्यक्तिगत विकासाचा भाग आहेच. स्वत:च्या पायावर उभे होणे, याचा अर्थ आपण फक्त पैसा मिळविणे असा घेतो.
आनंदी जगण्याच्या सर्व गरजा पूर्ण करता आल्या पाहिजेत. घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडता आल्या पाहिजेत. घरं परावलंबी होता कामा नयेत. ज्या लाईफ स्टाईलचा मोह आज सर्वांना पडला आहे, त्याकरिता पैसा ही मुख्य गरज आहे. या लाईफ स्टाईलने माणसालाच वेठीस धरले आहे. माणसालाच गौण करून टाकले आहे आणि वस्तूंना प्रधान स्थान दिले आहे. त्यामुळे कुटुंबाकरिता कोणालाच वेळ नाही, अशी स्थिती आली आहे. कुटुंबाकरिता वेळ हवा की पैसा? दोन्ही भरपूर मिळतील, ही स्थिती अपवादात्मक आहे. काही लोक वेळेची निवड करतात. कारण, गरजा आणि पैसा याला कधीच अंत नसतो. समतोल विचार करायचा असल्यास काही गोष्टींच्या मर्यादा ठरवाव्याच लागतात. शेवटी कुटुंब एक सहजीवन आहे. सह म्हणजे एकत्र, एकमेकांसाठी, एकमेकांना, एकमेकांनी, असाच त्याचा अर्थ आहे. जीवनाच्या प्रवाहात असे अनेक महत्त्वाचे क्षण असतात, त्यावेळी आपल्या माणसांची सोबत आवश्यक असते. काही महत्त्वाचे टप्पे असतात, त्यावेळी आपली प्रत्यक्ष उपस्थिती किंवा मदत गरजेची असते. पण माणसं कुठल्या तरी नशेत असतात. ‘त्या' वेळा निघून जातात. मग पश्चात्ताप होतो. ‘...असे केले असते तर' असं वाटणं, ही सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे. आपण उत्साहाने यश यश असे म्हणत शिडीने वर चढत जातो. वर गेल्यानंतर लक्षात येते, ‘लॅडर वॉज लीनिंग अगेण्स्ट राँग वॉल' पण त्यावेळी हातातून अनेक गोष्टी निसटून गेलेल्या असतात. आपण आई-वडिलांवर अन्याय केला किंवा मुलांना आवश्यक होता तेव्हा वेळ दिला नाही, अशी खंत बाळगणारे अनेक लोक भेटतात. वेळीच सावध व्हावे लागते. कुटुंबाचं एकूणच आपल्या जगण्यातलं स्थान नक्की केल्याशिवाय ख-या अर्थाने यशस्वी होताच येत नाही. सगळं आपण कुटुंबाकरिताच करतो, असे आपण म्हणत असतो; पण तितकेसे ते खरे नसते. आपल्या करण्यामागे अनेक सुप्त प्रेरणा असतात.
कालपर्यंत टीव्ही कमी पाहावा म्हणून आपण मुलांवर ओरडत होतो. किमान टीव्हीवर काय दाखवतात, याची थोडी तरी कल्पना आपल्याला होती. म्हणूनही चिंता वाटत होती. आता तर चोवीस तास मुलांजवळ मोबाईल असतो. त्यावर ते काय पाहतात, याची कल्पनाही आपण करू शकत नाही. मुलं मित्र आणि मोबाईलच्या संपर्कात किती आणि पालकांच्या सहवासात किती, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. त्यामुळे एक नवीनच आव्हान समोर ठाकले आहे. त्यांच्या डोक्यात नेमके काय जाते, कोणती जीवनदृष्टी त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि कुटुंबातून त्यांना काय मिळते, हे सारे प्रश्न गंभीर होत आहेत.आता कुटुंब म्हणून सर्वांनी किमान काही वेळ रोज एकत्र घालवण्याची गरज तज्ज्ञांना जाणवत आहे. कधी औपचारिक, कधी अनौपचारिक पण कुटुंब म्हणून सर्वांनी एकत्र येणं, गप्पा करणं, एकमेकांना सांगणं, एकमेकांचं ऐकणं, त्यातून शिकणं, समस्यांवर विचार करणं, चर्चा करणं हे आवश्यक आहे. कुटुंबातील सगळे रोज कोणत्यातरी निमित्ताने एकत्र असतात, असे चित्र आज दिसते का? मग जेवण, नाष्टा, प्रार्थना, टीव्ही पाहणे, एकत्र गप्पा करणे असे कोणतेही निमित्त असू शकते. कुटुंब ही आपली प्राथमिकता असेल, तसे संस्कार करायचे असतील तर असा ‘फॅमिली टाईम' जाणीवपूर्वक सुरू करणं गरजेचं झालं आहे.
कुटुंब व्यवस्थेच्या स्वास्थ्याकरिता त्याचा खूप उपयोग आहे, हे सिद्ध झाले आहे. अर्थात त्याकरिता काही किमान शिस्त आणि बांधिलकी आवश्यकच आहे. विनफ्रे हा मानसशास्त्रज्ञ फार परखड शब्दात आपल्याला सुनावतो, ‘इफ यू डोण्ट हॅव अ टाईम फॉर अॅट लीस्ट हाफ अॅन अवर ड्युरिंग द डे व्हेअर एव्हरीबडी कम टुगेदर अॅज अ फॅमिली, देन द फॅमिली इज नॉट युवर प्राइऑरिटी.' कुटुंब म्हणून दिवसातून अर्धा तासही तुम्ही सारे एकत्र येऊ शकत नसाल तर कुटुंब तुमची प्राथमिकता असूच शकत नाही. आपण खरेच वेळेचे विश्लेषण केले, वेळ कशाला दिला, याचा विचार केला तर महत्त्वाच्या गोष्टींना दुय्यम स्थान मिळाले, हे लक्षात येते. आपण कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या मानतो आणि प्रत्यक्षात कोणत्या करतो, याची जाणीव व्हावी लागते. या ‘गॅप' मध्येच अपयश दडलेले असते. कधी आठवड्याला, कधी महिन्याला, थोडा अधिक वेळ देऊन फॅमिली टाईमचे नियोजनही करता येते. खरे तर आपल्याकडे अनेक सणवार असतात. त्यात सर्वांचा सहभाग असला पाहिजे. सर्वांनी मिळून काही कामं केली पाहिजेत. कौटुंबिक भावबंध, नाते अधिक घट्ट व्हावे, हाच त्यामागचा उद्देश असतो. फॅमिली टाईम म्हणजे, यापेक्षा वेगळे काय? पूर्वी या गोष्टी सहज होत असत. आता जाणीवपूर्वक कराव्या लागणार आहेत. कुटुंब मूल्यांची जोपासना करणे, हा या मागचा मुख्य उद्देश आहे, हे मात्र लक्षात ठेवले पाहिजे.
या बाबतीत गरीब आणि श्रीमंत असा भेद करण्याचीही गरज नाही. लाईफ स्टाईलचे भूत सर्वांच्याच डोक्यावर बसले आहे.
सामान्य परिस्थिती असलेले माझे एक परिचित आहेत. दिवस-रात्र कुटुंबाकरिता राबत असतात. वेळ त्यांनाही मिळत नाही. त्यांनी जाणीवपूर्वक कुटुंबातील सर्वांनी रात्री काही स्तोत्र म्हणण्याकरिता एकत्र येणं सुरू केलं. एक दिवस त्यांनी मुलांना व बायकोला प्रश्न विचारला, ‘तुम्हाला मी हवा की पैसा?ङ्क त्या प्रश्नाने सर्व अस्वस्थ झाले. पुढे ते म्हणाले, ‘‘माझा सर्व वेळ पैसा मिळवण्यातच जातो. कितीही प्रयत्न केला तरी सर्व गोष्टी आपल्याला मिळू शकत नाहीत. आपण आहे त्या परिस्थितीत सगळे मिळून आनंदाने राहू या. आपली परिस्थिती आहे तशी ती स्वीकारू या. जे नाही, त्याबद्दल सतत तक्रार करून काय उपयोग? कायम असमाधानाच्या, असंतोषाच्या आगीत आपण धुमसत असतो. झुरत असतो, खंगत असतो. पाडगावकरांची कविता तुम्हाला माहीत आहे ना? सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा.'' त्यांच्या स्पष्ट बोलण्याचा उपयोग झाला. त्या दिवशीपासून कुटुंब म्हणून ख-या अर्थाने त्यांनी जगणं सुरू केलं. कुठे तरी स्पष्ट विचारांची साथ मिळवण्यातच सर्व आव्हानांची उत्तरं दडलेली असतात.
८८८८८०३४११