बुडत्याचा पाय अधिक खोलात!

    दिनांक : 14-Sep-2021
Total Views |
भारतीय राजकारणात भाजपाविरोधकांची चांगलीच कोंडी झाली असून आता त्यातून बाहेर पडण्यासाठी वा़ट्टेल त्या मार्गाचा अवलंब केला जात आहे. कोणत्याही कारणाने कोणी कोणाचा खून करोत की कोणत्याही कारणाने कोणी आत्महत्या करोत काँग्रेस, डावे आणि सर्व मिळेल त्या मार्गाने त्या प्रकरणाचा राजकारणाशी संबंध जोडून केंद्र सरकारच्या विरोधात गदारोळ माजविण्याच्या प्रयत्नात असतात. एखादी घटना काँग्रेसशासित वा अन्य पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात घडल्यानंतर भाजपाने आवाज उठवला तर राजकारण करू नका, असा सल्ला भाजपाला दिला जातो.
 
मुंबईच्या साकीनाका भागात घडलेल्या घटनेबाबत भाजपाने आवाज उठवला तर शिवसेना, काँग्रेस आणि राकाँला त्यात राजकारण दिसले. हा दुटप्पीपणा थांबायला हवा. कोणत्याही प्रकरणात एकही पुरावा मोदी सरकारच्या विरोधात काहीही सिद्ध करणारा नसतो, हे त्यांना माहिती असते. पण त्यांना गोंधळ घालण्याचा एकच मार्ग दिसतो. संसदेत आणि संसदेबाहेर फक्त गदारोळ माजवून सरकारला अडचणीत आणण्याचे कारस्थान यांनी करायचे आणि सरकारला अडचणीत आणण्यापेक्षा सरकारची प्रतिमा यांना बिघडवून टाकायची असते. कारण नसताना या गैरभाजपा मंडळींनी संसदेचे पावसाळी अधिवेशन धुवून टाकले. या पापाचे फळ त्यांना 2024 सालीही भोगावे लागेल, यात शंका नाही. माध्यमात मोक्याच्या जागेवर बसलेले डावे, जगात विचारवंत म्हणून एकमेकांना लेबलं लावून बसलेले हिंदुत्वविरोधी हे यांच्या या गदारोळातील वाद्यवृन्दासारखे काम करणारे आहेत. कर्कश्य गदारोळ करून लोकांचा एकतर्फी गैरसमज करत भाजपा, हिंदुत्ववादी संघटना यांची बदनामी करण्याचा एककलमी कार्यक्रम या लोकांनी चालविला आहे. गतकाळात हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला याच्या आत्महत्येचे प्रकरण ज्या पद्धतीने गाजविले गेले, ते या गदारोळ तंत्राचे उत्तम उदाहरण होते.
 
modiji_1  H x W 
 
मागे, म्हणजे राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जळगाव जिल्ह्यात जे प्रकरण घडले ते दुर्दैवीच होते. त्याचे समर्थन करण्याचे कारणच नव्हते. आमच्या मातंग बांधवांची मुलं विहिरीत पोहण्यासाठी उतरली म्हणून त्यांना जी मारहाण झाली होती, ती दुर्दैवीच होती. पण, मारहाण करणार्‍याचे आडनाव जोशी होते या एवढ्या एका बाबीवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करण्याचा जो प्रकार घडला होता, तो जास्त दुर्दैवी आणि वेदनादायी होता. घटना घडल्यानंतर काँग्रेस पक्षाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी या प्रकरणात अतिशय बेजबाबदार विधान केले. आताच एक झालो नाही तर इतिहास माफ करणार नाही, असे विधान त्यांनी करून टाकले. एक व्हा, पण कोणाविरुद्ध? जोशी आडनाव आहे म्हणजे तो ब्राम्हणच आहे आणि ब्राम्हण म्हटला म्हणजे तो संघ-भाजपाचाच आहे, असे गृहित धरून संघ-भाजपाला झोडपण्याचा जो कार्यक्रम या वाह्यात मंडळींनी आखला होता, तो साफ उधळला गेला आणि सगळ्यांचे धर्मनिरपेक्षतेचे बुरखेही टराटरा फाटले. जोशी आडनावाचा तो माणूस ब्राम्हण नव्हे, तर भटकेविमुक्त असल्याचे पुढे आले आणि सगळ्यांची बोलतीच बंद झाली होती. सगळी मोहीम अचानक थांबली. खरे तर ज्यांनी ज्यांनी म्हणून त्या जोशीला ब्राम्हण समजून समस्त ब्राम्हणांना झोडपत बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता, त्या सगळ्यांनी बिनशर्त माफी मागायला पाहिजे होती. पण, या लोकांकडे तेवढे औदार्य होते कुठे? अजूनही हे लोक औदार्य दाखवण्याच्या मन:स्थितीत नाहीत. कारण, मुळातच यांच्या मनात एका विशिष्ट जातीबद्दल द्वेष आहे आणि त्या द्वेषातूनच संघाला झोडपण्याचा एककलमी कार्यक‘म राबवत राहुल गांधींसारखे लोक समोरच्याची बदनामी करीत असतात.
         
रोहित वेमुलाच्या प्रकरणात कालांतराने जे तथ्य समोर आले होते, ते तर थक्क करणारेच होते. माजविला गेलेला गदारोळ आणि वेमुला प्रकरणातील तथ्य यात जमीन अस्मानचा फरक होता. रोहित वेमुला याच्या आत्महत्येचे गांभीर्य वाढविण्यासाठी त्याची आत्महत्या ‘एका दलित विद्यार्थ्याची आत्महत्या़,’ असे शीर्षक देऊन हे प्रकरण सुरुवातीपासून रंगविण्यात आले. दलित म्हटले की देशभर संतापाची लाट उसळणार. दलित संघटना, राजकीय शक्ती आयत्याच मोदी सरकारच्या विरोधात किंचाळत उठणार, हा अंदाज करूनच हे प्रकरण दलित विद्यार्थ्याची आत्महत्या, असे रंगविण्यात आले होते. प्रत्यक्षात रोहित वेमुला याचे आई आणि वडील वद्देरा या ओबीसी जातीतील होते. त्यांनी नंतर ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. त्यामुळे ते दलित होते, असे म्हणणे धादांत खोटारडेपणाचा कळस होता. केवळ प्रकरणाचे गांभीर्य वाढविण्यासाठी केलेला हा कांगावखोरपणा होता, हे कालांतराने सिद्ध झाले आहे. त्यामुळेच आता राहुल गांधी आणि त्यांना साथ देणारे चमचे काहीही बरळलेत, तरी जनता त्यावर विश्वास ठेवणार नाही. निवडणुका आल्या की ब्राम्हण होणारे राहुल गांधी अचानक मंदिरांमध्ये जायला लागतात, हे देशाने पाहिले आहे. पुढल्या काळात जम्मू-काश्मिरात निवडणुका होणार असल्याने त्यांनी नुकतेच वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. हे सगळे ढोंग आहे. जनता खुळी आहे, असे समजून राहुल गांधी वागत असतील तर 2024 साली काँग‘ेसचा आणखी दारुण पराभव होईल, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
         
मुंबईच्या बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी याकुब मेमन याला गतकाळात नागपुरात फाशी देण्यात आली होती. त्यावेळीही गैरभाजपा मंडळींनी घातलेला गोंधळ देशाने पाहिला आहे. याकुबला फाशी दिल्यानंतर देशद्रोहीवृत्तीच्या लोकांनी या देशातील लोकशाहीने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा फाजिल फायदा घेत निदर्शने केली होती. निदर्शनात यांनी हातात जे फलक धरले होते त्यावर लिहिले होते की, ‘तुम कितने याकुब मारोगे? हर घर से याकुब निकलेंगे’, ‘याकुब तेरे खून से इन्कलाब आएगा’ कोणाही देशभक्त माणसाच्या तळपायाची आग मस्तकाला जावी असा हा प्रकार होता. पाकिस्तानातील विद्यार्थी संघटनेने करावी, अशी ही निदर्शने होती. उघड उघड हा देशद्रोह होता. यांना घराघरात याकुब तयार करून कुठे बॉम्बस्फोट करायचे होते? कोणाला ठार मारायचे होते? तेव्हा अशा देशद्रोही लोकांविरुद्ध डावे वा काँग्रेसने साधा ‘ब‘’सुद्धा काढला नव्हता. अशा लोकांची साथ देऊनही काँग्रेसला 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत यश मिळालेच नव्हते. आताही यांची अशीच भूमिका राहिली तर 2024 साली मोदींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीला मोठे यश मिळेल, यात शंका नाही. ज्या रोहित वेमुलाच्या आत्महत्येवरून काँग्रेस आणि डाव्यांनी देशभर गदारोळ माजवत संघ परिवाराला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा प्रयत्न केला होता, तो सत्य समोर येताच सपशेल फसला होता. लोकशाहीवर राहुल गांधी आणि डाव्यांचा विश्वास नाही. त्यांना काहीही करून सत्ता हवी आहे आणि मोदींना सत्तेच्या खुर्चीतून बाहेर काढण्यासाठी हे लोक वाट्टेल त्या मार्गाचा अवलंब करायला तयार असतात. मग, देशहित पायदळी तुडविले गेले, लोकशाही मूल्यांचा र्‍हास झाला तरी यांना पर्वा नसते.
 
राहुल गांधी आणि त्याचा काँग्रेस कंपू यांनी एक नवे ‘गोंधळ तंत्र’ स्वीकारले आहे. कोणत्याही विषयाचे निमित्त करून संसदेत आणि संसदेबाहेर गदारोळ करायचा, हाच एककलमी कार्यक्रम हे राबवत असतात. याऐवजी देशातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी यांनी प्रयत्न केलेत, जनहिताचा ठोस कार्यक‘म देशाला दिला तर लोकांचा यांच्यावरील विश्वास वाढेल. पण, यांना लोकशाही मार्गाने काहीही नको आहे. त्यांना ठोकशाहीच हवी आहे, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षभरात दोन-तीन सर्वेक्षणं झालीत. त्याचे जे निष्कर्ष आलेत ना, ते काँग्रेसच्या थोबाडीत मारणारे आहेत. पंतप्रधानपदासाठी आजही मोदींच्या नावालाच सर्वाधिक पसंती असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज जरी निवडणुका झाल्यात तरी मोदींच्या नेतृत्वात भाजपाच जिंकेल आणि पुढले पंतप्रधानही मोदीच होतील, हे समोर दिसत असतानाही राहुल गांधी आणि त्यांचा कंपू सुधरायला तयार नाही. म्हणतात ना, बुडत्याचा पाय खोलात, त्याचीच प्रचिती देश सध्या घेत आहे.