महाविकासआघाडी विरोधात उद्या राज्यभर आंदोलन

14 Sep 2021 19:33:11
मुंबई : “ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे उद्या (१५ सप्टेंबर) राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.”, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार संजय कुटे आणि भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी दिली. तसेच, आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे व शरद पवार यांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत कुटे व टिळेकर बोलत होते. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते.
BJP1_1  H x W:
 
संजय कुटे व योगेश टिळेकर यांनी सांगितले की, “गेली सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्याने सांगितले आहे. मात्र आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत काहीच हालचाली केल्या नाहीत. इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय पाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यात झाला आहे."
 
“सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यावयाच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात वकिलच उभा केला नाही असे सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणतो आहे. विधी व न्याय खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी व आघाडी सरकारचे पालक म्हणविणाऱ्या शरद पवार यांनी नाना पटोले यांच्या आरोपावर खुलासा करावा," असेही त्यांनी सांगितले.
 
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकविण्यासाठी काहीच हालचाल केली नाही. ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे उद्या १५ सप्टेंबर रोजी तालुका पातळीपर्यंत आंदोलन केले जाईल, असेही कुटे व टिळेकर यांनी नमूद केले.
Powered By Sangraha 9.0