मुंबई : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची ‘शक्ती कायद्या’बाबतची घोषणा आणि महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर “परप्रांतीयांची नोंद ठेवावी लागेल” मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “शक्ती कायद्याला सर्वांनीच पाठिंबा दिला पाहिजे. पण, यापूर्वी कोरोना काळात शक्ती कायद्यावर बैठक करायला सरकारला बंदी होती का?” त्याचसोबत मुख्यमंत्र्यांच्या सूचनांवर बोलताना ते म्हणाले की, “परप्रांतीयच अशा प्रकारचे गुन्हे करतात का? महाराष्ट्रातील माणूस करत नाही का?”
चंद्रकांत पाटील म्हणाले की, सरकारसाठी माझा एकच प्रश्न आहे. कोरोनाच्या काळात शक्ती कायद्यावर बैठक करायला तर बंदी नव्हती ना? जर तुम्ही एकत्र बैठक करायला घाबरत होतात तर व्हर्च्युअल बैठक करायची होती”, त्याचप्रमाणे, “शक्ती कायदा हा आता खूपच ऐरणीवर आलेला विषय आहे. महाराष्ट्राला महिला आयोगाचा अध्यक्ष असायला पाहिजे हा देखील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे”, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी गृहविभागाच्या बैठकीत राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर “परप्रांतीयांची नोंद ठेवावी लागेल” असे वक्तव्य केले. यावर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “परप्रांतीयच अशा प्रकारचे गुन्हे करतात का? महाराष्ट्रातील माणूस करत नाही का? असं एखाद्या समाजाला टार्गेट करण्यात अर्थ नाही. तसा गुन्ह्यांचा अभ्यास करायला गेलो तर खूपच वेगळं सत्य बाहेर येईल. त्याचं काय करणार तुम्ही? त्याच्याही नोंदी ठेवणार का?” असं सूचक विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.