आता महाविद्यालयात शिकवणार रामायण, महाभारत

मध्यप्रदेश सरकारचा निर्णय

    दिनांक : 13-Sep-2021
Total Views |
भोपाळ : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मध्यप्रदेश सरकारने नव्या शिक्षण धोरणाचा अंगिकार करत नवीन महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केला आहे. नवीन अभ्यासक्रमाअंतर्गत बीएच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना महाभारत, रामचरितमानस, योग आणि ध्यान यासंदर्भात शिकवले जाणार आहे.
mp_1  H x W: 0
 
मध्यप्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री मोहन यादव यांनी या विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आयुष्यातील मुल्यांबद्दल शिकवण देण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी याचा फायदा होईल, असेही सांगितले जात आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार ‘श्री रामचरितमानस अप्लाइड फिलॉसॉफी’ हा पर्यायी विषय म्हणून ठेवण्यात आला. इंग्रजीच्या फाऊंडेशन कोर्समध्ये पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना सी. राजगोपालचारी यांनी लिहिलेली महाभारताची प्रस्तावना शिकवली जाणार आहे. राज्याच्या शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी इंग्रजी आणि हिंदीबरोबरच योग आणि ध्यान या दोन विषयांना तिसर्‍या फाऊंडेशन कोर्सच्या स्वरूपात शिकवले जाणार आहे.
 
श्री रामचरितमानसअंतर्गत असणार्‍या धड्यांमध्ये भारतीय संस्कृतीचे मूळ या क्षेत्राशी संबंधित विषयांमध्ये अध्यात्मिकता आणि धर्म यासारख्या विषयांचा समावेश असणार आहे. ‘वेद, उपनिषद आणि पुराणांचे चार युग’, ‘रामायण आणि श्री रामचरितमानसमधील फरक’ आणि ‘दिव्य अस्तित्वाचा अवतार’ हे विषयही शिकवले जाणार आहेत. नवीन अभ्यासक्रमानुसार हे विषय व्यक्तिमत्व विचार आणि चारित्र्य अधिक सक्षम बनवण्यासाठी शिकवण्यात येणार आहेत. प्रभू रामचंद्र त्यांच्या वडिलांच्या किती आज्ञेत होते, यासंदर्भातही विद्यार्थ्यांना शिकवले जाणार असल्याचे एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
 
विद्यार्थ्यांना श्रीरामचंद्र हे किती कुशल अभियंता होते, याचेही शिक्षण दिले जाणार आहे. ‘राम सेतूची निर्मिती’ या विषयाअंतर्गत विद्यार्थ्यांना भगवान रामाकडे असणार्‍या अभियांत्रिक ज्ञानाची माहिती करून दिली जाणार आहे. श्री रामचरितमानसबरोबर 24 पर्यायी विषय देण्यात आले असून, यात मध्यप्रदेशातील उर्दू गाणी आणि उर्दू भाषा यांचाही समावेश आहे.