गर्दीत हरवला ‘माणूस'

    दिनांक : 07-Aug-2021
Total Views |
रवींद्र देशपांडे
 
एके ठिकाणी मुलांच्या करीअरविषयी गप्पा सुरू होत्या. सर्वत्र सध्या कशी स्पर्धा आहे, यावरही चर्चा झाली. प्राथमिक शाळेतील एक छोटा मुलगा हे बोलणे ऐकत होता. त्याने आजोबांना सहज प्रश्न विचारला, ‘‘आजोबा, मी मोठा झाल्यावर काय बनू?'' आजोबा गमतीने म्हणाले, ‘‘बेटा, मोठा झाल्यावर तू ‘चांगला माणूस' बन. या क्षेत्रात मुळीच स्पर्धा नाही.'' या विनोदावर सारेच हसले. त्या बालकाला त्याचा अर्थही कळला नसेल. पण, अंतर्मुख करणारा तो विनोद होता हे नक्की! खरे तर याचा अर्थ ‘चांगला माणूस' दुर्मिळ होत चालला आहे, असा होतो. सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याच्या वडिलांनीही सचिनला नेमका हाच सल्ला दिला होता. त्याच्या आत्मचरित्रात सचिननेच वडिलांविषयी ही आठवण नोंदवून ठेवली आहे.
 
Men in Croud_1    
 
सचिन तेंडूलकरला अगदी सुरुवातीपासूनच यश मिळाले. तो फार लवकरच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. त्याचवेळी त्याच्या वडिलांनी त्याला फार मोलाचा सल्ला दिला. विशेष म्हणजे सचिनने तो कायमचा मनावर कोरून ठेवला. त्याचे वडील रमेश तेंडूलकर हे साहित्यिक होते. एकदा त्यांनी सचिनला सांगितले, ‘‘क्रिकेट खेळून तू यश मिळवतो आहेस, हे आनंदाचंच आहे. पण विचार कर, किती वर्ष क्रिकेट खेळशील? १५ वर्ष... जास्तीत जास्त २० वर्ष. आणि ‘माणूस' म्हणून जगशील अंदाजे ७० वर्ष. याचा अर्थ क्रिकेट खेळणे हा जीवनातील एक छोटा काळ आहे. तेव्हा यशानं माजू नकोस आणि अपयशानं खचू नकोस. माणूस म्हणून चांगला वाग. स्वभाव चांगला ठेव. अखेर लोकांनी तुला चांगल्या स्वभावाचा माणूस म्हणून लक्षात ठेवलं तर ते जास्त मोलाचं आहे.'' सचिनच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाकडे पाहिलं तर त्याच्यातला ‘चांगला माणूस' आपल्याला कायम दिसत राहतो. त्याला कधीही अहंकाराची बाधा झाली नाही. त्याच्या वागण्यात कायम नम्रपणा असतो. त्याने कधीही आक्रस्ताळेपणा केला नाही. बॅट आपटली नाही. कोणत्याही खेळाडूचा अपमान केला नाही. अपशब्द बोलला नाही. पंचांवर आगपाखड केली नाही. त्याच्यावर झालेल्या टीकेला उत्तर दिले नाही. सर्व प्रसंगात त्याचे वागणे संयमित राहिले आहे. त्याने वागण्यातील सभ्यपणा आणि सुसंस्कृतपणा कधीही सोडला नाही. एक महान खेळाडू माणूस म्हणूनही चांगला आहे आणि हेच त्याचे खरे मोठेपण आहे.
एका वाहिनीवर झालेल्या एका कार्यक्रमात अनिल अवचट आले होते. त्या मुलाखतीत त्यांना एक प्रश्न विचारला होता- ‘‘लेखक, डॉक्टर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत अशा अनेक ओळखी असताना त्यापैकी कोणती ओळख जास्त भावते?'' त्यावर ते म्हणाले होते, ‘‘मला एक चांगला माणूस म्हणून लोकांनी ओळखावं.'' अनिल अवचटांचा हा आग्रह सहज दुर्लक्ष करावा, असा नाही. खरे तर पालक, शिक्षक, कार्यकर्ता, नेता, व्यापारी किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करणारा आधी चांगला माणूस असला पाहिजे, ही किमान अपेक्षा असते. शिखरावर जाताना, कर्तृत्व गाजवताना, मोठ्या पदावर काम करताना, पैसा मिळवताना, कोणत्याही प्रकारचे कौशल्य किंवा ज्ञान मिळवताना त्याच्यातील माणूसपण संपता कामा नये. माणूस म्हणून आवश्यक असलेल्या चांगूलपणाचे पोषण झाले पाहिजे. पण अनेकदा विपरीत अनुभव येतात आणि सहजच चांगूलपणाचे अनेक पदर डोळ्यासमोर येतात. आदर्श माणूस कोणी होऊ शकतो का; हे मला माहीत नाही, पण चांगला माणूस मात्र होऊ शकतो. आदर्श माणूस मी तरी अद्याप पाहिलेला नाही, पण चांगली माणसं मात्र सुदैवाने खूप पाहिली आहेत. जवळून अनुभवली आहेत.
 
भर्तृहरीच्या नीतिशतकामध्ये एक फार मार्मिक सुभाषित आहे.
एके सत्पुरुषा: परार्थघटका: स्वार्थं परित्यज्य ये
सामान्यास्तु परार्थमुद्यमभृत: स्वार्थाऽ विरोधेन ये।
तेऽमी मानुषराक्षसा: परहितं स्वार्थाय निघ्नन्ति ये
ये तु घ्नन्ति निरर्थकं परहितं ते के न जानीमहे।।
 
यात भर्तृहरी म्हणतो की, तीन प्रकारच्या माणसांचे नामकरण मी सहजपणे करू शकतो. पण चौथ्या प्रकाराला काय म्हणावे, हे मला कळत नाही. जे दुस-यांच्या हिताकरिता स्वत:च्या स्वार्थाचा त्याग करतात, त्यांना सत्पुरुष म्हणतात. असे लोक कमीच असतात. दुस-या प्रकारचे लोक दुस-यांच्या हिताचा बळी न देता आपला स्वार्थ किंवा आपले हित पाहतात. त्यांना ‘सामान्य माणूस' म्हणतात. स्वार्थ आणि परमार्थ यांच्यात ताळमेळ बसवतात. तिस-या प्रकारचे लोक फक्त स्वत:च्या स्वार्थाचा विचार करतात. त्याकरिता दुस-याचे अहित, नुकसान, तोटा किंवा दुस-याला दु:ख झाले, तरी ते त्याची फिकीर करत नाहीत. त्यांना भर्तृहरी ‘मनुष्यराक्षस' म्हणतो. शेवटच्या ओळीत भर्तृहरी म्हणतो, ‘ये तु घ्नन्ति निरर्थकं परहितं ते के न जानीमहे' पण चौथ्या प्रकारच्या लोकांना दुस-याचे अहित करणे, त्रास व दु:ख देणे यातच आनंद मिळतो. त्यामुळे त्यांचा काही स्वार्थ पूर्ण होतो, असेही नसते. त्यांना काय म्हणावे, हा प्रश्न भर्तृहरीला पडला आहे.
 
सत्पुरुष होता आले नाही तरी दुस-या प्रकारचा सामान्य माणूस होणे सर्वांना सहज शक्य आहे. स्वार्थ शब्दाला आपण उगीचंच बदनाम केलं आहे. तसा विचार केला तर प्रत्येक माणूसच स्वार्थी असतो. स्वत:च्या हिताचा विचार करण्यात गैर काय? फक्त दुस-याचे अहित होणार नाही, याची चिंता केली पाहिजे आणि असा दुस-याचा विचार करण्यातच माणूसपण दडलेले असते. स्वार्थासाठी माणूस जेव्हा कोणत्याही थराला जातो, त्यावेळी त्याचा प्रवास ‘मनुष्यराक्षसा'कडे सुरू होतो. क्वचित दुस-याचे दु:ख, अडचणी पाहून मनात कुठेतरी बरं वाटणारे, आनंद होणारेही कमी नाहीत. म्हणूनच दिलखुलासपणे दुस-याच्या आनंदात त्यांना सहभागी होता येत नाही. त्यांचे किंतु-परंतु सुरू होते. भर्तृहरी वेगळ्या भाषेत चांगल्या माणसांच्या वैशिष्ट्यांवरच प्रकाश टाकतो.
 
माणूस निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती आहे, असे आपण म्हणतो. पण त्याचे कारण काय? सृष्टीतील सर्वच सजीवांना संवेदना असते. या संवेदनेचा परिपूर्ण, प्रगल्भ आणि सर्वांगसुंदर आविष्कार म्हणजे मानवी संवेदना होय. ही संवेदनशीलताच माणसाचे सर्वात मोठे वैशिष्ट्यपूर्ण सामथ्र्य आहे. हे सामथ्र्यच माणसाला ‘चांगला माणूस' घडविण्यासाठी पायाभूत ठरते. मनाच्या संवेदनशीलतेतूनच कला, धर्म, व्यवस्था, सेवा, समाजकार्य, संघटना अशा सर्वच गोष्टींचा जन्म होतो आणि त्यातूनच सांस्कृतिक समृद्धीचे संवर्धन होत असते. संवेदना बोथट झाल्या की, माणुसकी कमी होत जाते. फक्त माझा स्वार्थ, केवळ माझेच सुख, अहंकार, व्यवहारी वृत्ती, पदलोलुपता, विचारधारांची कट्टरता, अधिकारशाही, सत्ताकांक्षा, अपार स्पर्धा, चंगळवाद, संकुचित दृष्टिकोन, आदेशवाद अशा गोष्टींची अंतिम पायरी संवेदनशीलता बोथट होण्यातच होते. त्याचे प्रतिबिंब माणसाच्या वागण्यात पडलेले दिसते.
 
साधा दुस-याशी बोलण्याचा विषय घ्या. खरे तर बोलणं आपल्या हातात असतं. त्याकरिता पैसे मोजावे लागत नाहीत. तरीही मधुर शब्द बोलताना आपण कंजुषी, दारिद्र्य का दाखवतो, असा प्रश्न पडतो. ‘वचने कि दरिद्रता' हे वचन प्रसिद्धच आहे. दुसराही आपल्यासारखा माणूसच आहे. त्यालाही आत्मसन्मान आहे. मग भलेही तो अगदी सेवक पदावर असेल, गरीब असेल, अज्ञानी असेल, दुबळा असेल, त्याच्याशीही सन्मानाने बोलता आलेच पाहिजे. पण माणसं जेव्हा तुच्छतेने, मोठ्या आवाजात, आक्रमकपणे, अपमानास्पद बोलतात, त्यावेळी चांगूलपणावर प्रश्नचिन्ह निर्माण होतेच. मोलकरणींशी आपण कसे वागतो, हे सहज पडताळून पाहायला हरकत नाही. मतभिन्नता तर अनेक माणसं सहन करूच शकत नाहीत. दुस-याचे म्हणणे समजून घेणे, योग्य असेल तर मान्य करणे, आपला दुराग्रह सोडणे, हा पराभव नसतो. माणूस आपल्याकरिता बहुमूल्य आहे, असा त्याचा अर्थ असतो. चांगल्या गोष्टींचे मनापासून कौतुक करता आले पाहिजे. दुस-याचे कौतुक करण्यासाठीही मनाचा मोठेपणा, निर्मळपणा लागतो. अगदी संघटन करायला निघालेल्यांच्या तोंडूनही कधी चांगला शब्द निघत नाही, तेव्हा आश्चर्य वाटते. त्यांनी बोलावं, काहीतरी प्रतिक्रिया द्यावी, अशी अपेक्षा असते, पण ते धूर्तपणे मौन बाळगतात. अशा वेळी ते अलिप्त आणि निर्विकार असतात. याच्या मुळाशी असतो अहंकार. अहंकार माणसाला ‘चांगला' बनूच देत नाही. माणसांना स्वत:विषयी किती अवास्तव अभिमान असतो. ते स्वत:ला कायम श्रेष्ठ समजत असतात. त्यालाही आपली हरकत असण्याचे कारण नाही. पण तेवढ्याने त्यांचे समाधान होत नाही. दुस-याला ते तुच्छ समजतात. दुस-याला कमी लेखून माणूस मोठा कसा होऊ शकतो? असा माणूस चांगला कसा असू शकेल? ‘चला माणूस बांधू या' या अप्रतिम लेखात प्रवीण दवणे लिहितात, ‘‘माणूसपणाचं पोषण होण्यासाठी हवाय् संवाद! संवाद हा माणूसपणाचा पायाभूत धर्म आहे. आज या धर्मावर धर्मसंकट आल्यानं, माणसं माणसासारखी वागत नाहीत, असं दिसतं. त्यांना अधिक अधिक हव्यासाचा, कुठे थांबायचे हे न कळण्याचा, एकाकी पथच जीवनपथ वाटत आहे.''
 
चांगला माणूस खोटारडा, ढोंगी नसतो. तो प्रामाणिक असतो. तो फसवेगिरी करीत नाही. प्रामाणिकपणा, इंटिग्रिटी हे महत्त्वाचे मानवी मूल्य आहे. त्यातूनच विश्वासार्हता, बांधिलकी निर्माण होते. कुटुंबव्यवस्थेसह सर्व व्यवस्थांचा तो पाया आहे. ताणरहीत आनंदी जीवनाचा तो मार्ग आहे. हातून चूक होणे आणि बदमाशी करणे यात फरक आहे. शेवटी आपण माणसं आहोत. सगळेच चुकत असतात. परिपूर्ण कुणीच नसतो. चुकीतूनच माणूस शिकत असतो. म्हणूनच चुकलं तर मोठ्या मनाने माफी मागणे, चूक दुरुस्त करणे आणि दुस-यालाही माफ करणे, हाच चांगल्या माणसाचा स्वभाव गुण असतो. हिशेबी वृत्तीने काही माणसं चांगलं वागतात. अनेकदा फायदा मिळावा म्हणून केलेली ती गुंतवणूक असते. काम झाले किंवा गरज सरली की त्यांचा चांगूलपणाही संपून जातो. तो त्याचा स्वभाव नसतो. आपल्या फायद्याचा विचार करावा, कमाईचा विचार करावा. पैशाचा खळखळाट असायला हरकत नाही, पण त्या मागे अनेकांचा तळतळाट नसावा. दुस-याची फसवणूक नसावी. माणसांचा तरी ‘युज अ‍ॅण्ड थ्रो' असा विचार करू नये. दुर्दैवाने आज पैसा, वस्तू, सोनं, पदं या गोष्टी सत्य आणि माणूस मिथ्या झाला आहे. प्रत्येकाला एकमेकांची गरज असतेच. दुस-याला मदत करण्याचा चांगल्या माणसांचा स्वभाव असलाच पाहिजे. असे असले तरी आपलं चांगलं असणं किंवा वाईट असणं लोकांच्या मतांवर अवलंबून नाही. लोकांना गरज असेपर्यंत तुम्ही चांगले असता आणि गरज संपली की तुम्ही वाईट होता. म्हणूनच चांगली माणसं कृतज्ञ असतात. आपल्याला अनेकांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत झालेली असते. याची जाणीव ठेवणे, ती आपल्या वागण्यातून व्यक्त होणे, हे सर्वांनाचा समाधान देणारे असते. आचार्य अत्रे एकदा म्हणाले होते, ‘‘कुणी माझी समाधी बांधलीच तर त्यावर एकच वाक्य लिहा, हा माणूस मूर्ख असेल, अविचारी असेल, कृतघ्न मात्र कधीही नव्हता.'' स्वत:चे स्तोम माजवण्याच्या वृत्तीमुळे आज झपाट्याने कृतज्ञतेचा भाव कमी होत आहे. अनेक संस्था, संघटना मोठ्या होण्याकरिता अनेकांनी प्रचंड त्याग आणि परिश्रम केलेले असतात. त्याची जाणीव दिसत नाही. किंबहुना त्यांना उपेक्षित आणि दुर्लक्षित ठेवले जाते.
 
संवेदनशीलता माणसाला जबाबदार बनवते. त्यामुळे चांगला माणूस कधी बेदरकार, निष्काळजी, बेफिकीर वागू शकत नाही. स्वत:वर थोडंतरी नियंत्रण ठेवता आलंच पाहिजे. सहज प्रेरणांच्या, इन्स्टिंक्ट्सच्या आहारी जाणे, हा पशुत्वाचा वारसा आहे. व्यसनांच्या आहारी न जाण्याइतके नियंत्रण नसले तर त्याचे परिणाम वाईटच होतात. मग त्यांना चांगला माणूस कसे म्हणावे?
‘चांगले' आणि ‘वाईट' या दोन जाणिवा माणसामध्ये जन्मजात असतातच. योग्य काय आणि अयोग्य काय याची उपजत जाणीवही माणसाला असतेच. फक्त गर्दीत हरवून न जाता हृदयाची हाक ऐकता आली पाहिजे इतकेच.
 
८८८८८०३४११