गिरीश प्रभुणे
अमंत्रम् अक्षरम् नास्ति...
नास्ति मूलं औषधम्...!
मनाच्या असंख्य सुक्ष्म खिडक्या उघडणारा हा मंत्र... जगातल्या प्रत्येक गोष्टीचा, वस्तूचा उपयोग आहे. कोणतीच गोष्ट टाकावू नाही. अयोग्य: पुरुषो नास्ति... आणि कोणीही पुरुष अयोग्य नाही. कमी फक्त जाणणा-याची आहे. कमी-जास्त गुण हा प्रत्येकात असतोच. कमी आहे ती रत्नाची पारख करण्या-याची. पारख तर दूरच, पण एक नवीच पद्धत आम्ही मेकॉलेकडून स्वीकारली, पास आणि नापासाची. तशी ती आमच्यात मुरत आली होतीच. आम्ही विविध प्रकारची बंधनं लादून घेतली होतीच. नाकारण्याची अनेक कारणं, युक्त्या आम्ही शोधून काढल्या होत्याच; तसं धर्मराजाला सर्वांमध्ये काही ना काही चांगला गुण दिसला. दुर्योधनाला प्रत्येकाच्यात असणारे दुर्गुणच दिसले. मनाच्या या दोन अवस्था. त्या ओळखता यायला हव्यात. असा शिक्षक-आचार्य-गुरू की जो प्रत्येकाला आकार देईल. व्यक्तिमत्त्वातील अनावश्यक अयोग्य भागाच्या विकासाऐवजी योग्य भागाचा विकास. आता हे योग्य-अयोग्य हे ठरवणार कसं? त्यासाठी विवेकाची गरज ही नीर-क्षीर विवेकबुद्धी. हंस फक्त दूधच शोषून घेतो. पाणी जागेवरच राहतं. शिक्षण ज्ञानार्जनाने या दुधातील पाण्याची वाफ बनून जाईल आणि दुधाचे रूपांतर लोणी-तूप-खव्यात किंवा ताकात होते. अधिक टिकावू उपयुक्त रूप दुधाला प्राप्त होतं. शिक्षणानं बालकाचं व्यक्तिमत्त्व आपोआपच खुलायला- फुलायला हवं. विद्यार्थ्यांचा वावर ज्या परिसरात असेल, तिथला कोपरा न् कोपरा प्रकाशमान हवा. यासाठी शिक्षक हा सक्षम हवा. आचार्य बनविण्याची, निर्माण होण्याची व्यवस्थाच नष्ट करण्यात आली. सर्टिफिकेट कोर्स, एक वा दोन वर्षाचा डी.एड., बी.एड. हा शिक्षक कसा बनू शकतो? त्यासाठी सुरुवातीपासूनच शिक्षणात रचना करायला हवी. आजच्या पद्धतीचा अभ्यास केला तर लक्षात येईल, शिक्षण क्षेत्रात केवळ अन्य क्षेत्रात प्रवेश न मिळाल्यामुळे येणा-यांचे प्रमाण मोठे आहे. शिक्षण क्षेत्राची आवड, अभ्यास करून येणारे फारच अल्प आहेत. बारावीचा निकाल लागल्यानंतर सर्व दारं बंद झाल्यावर शिक्षण क्षेत्रात येणारेच अधिक. त्यामुळे आचार्य शिक्षक होण्यास पात्र असणारे फारच अल्प इकडे येतात. त्यामुळे भावी पिढीची पायाभरणीच कच्च्या- अपु-या ज्ञानावर होतेय. हे अक्षम्यच. यामुळे ‘गुरुकुलम'च्या सुरुवातीस या भीषण वास्तवाचा विचार करून अभ्यासक्रमाची रचना करावी लागली.
कोणत्या क्षमता अपेक्षित आहेत? त्या कशा आणि कोणत्या वयात विकसित व्हायला हव्यात यासाठी अनेक अनुभवी लोकांबरोबर चर्चा केली. डॉ. देवदत्त दाभोळकर, डॉ. स. ह. देशपांडे, डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. गंगाधर पानतावणे, दिलीप केळकर, इंदुमतीताई काटदरे, राजेंद्रसिंहजी, सुदर्शनजी, हो. वे. शेषाद्रीजी, उपेन्द्र शेणॉयजी, डॉ. वा. ना. अभ्यंकर, विवेक पोंक्षे, डॉ. कलबाग, यशवंतराव लेले, अण्णा हजारे, डॉ. मोहनजी भागवत आणि भय्याजी जोशी, देवेंद्र स्वरूपजी, नानाजी देशमुख ही त्यातली ठळक नावे. देवदत्त दाभोळकर आणि रवींद्र शर्मा गुरुजी यांनी यात विशेष रस घेऊन अनेक वार बैठका घेतल्या. वेळ दिला. प्रत्यक्ष कृती आराखडा राबवताना त्यांच्याशी झालेल्या चर्चांचा सुखद अनुभव हा आजही मनाला उभारी देतो. दाभोळकर साता-यात, त्यांच्याकडे त्यांच्या वयोमानाप्रमाणे विचार करून जावे लागे. ते मात्र न थकता चर्चा करीत. खूप संदर्भ देत. महात्मा गांधी-विनोबाजी, जे. पी. नाईक यांचे अनुभव सांगत. त्यांच्याकडे एक वर्षभर महिन्यातून एक-दोनदा आम्ही म्हणजे पूनम गुजर आणि मी, पूनमचा नवरा सुरज असे जात असू. मी चर्चा करी. प्रश्न विचारी. दाभोळकरजी बोलत आणि पूनम लिहून घेई. मध्येच देवदत्तजी तिला विचारीत, ‘हं काय लिहिलंय बघू.' ते वाचत आणि दुरुस्ती सुचवीत. देवदत्तजी हे सहज बोलणारे. वागण्यात-बोलण्यात कृत्रिमता बिलकूल नसे. वयाचं अंतर क्षणात संपून जाई. हिंदुत्वाचे अनेक अदृश्य पैलू त्यांच्या बोलण्यातून उलगडले जात. सौम्य स्वभाव. अनाग्रही वृत्ती. दुस-याच्या मताचा आदर करीत चूक असेल तर स्पष्ट सांगत.
‘पूर्वीचे आचार्य कसे होते? याचं जे चित्रण मिळतंं ते वाचल्यावर लक्षात येतं. एक भारतीय मिश्रप्रवाह त्यांच्यातून वहात होता. हा प्रवाह बौद्ध-जैन-वैष्णव-सनातन-चार्वाक अशा एकमेकांपासून पूर्ण वेगळे असणारे, परंतु प्रवाहातून वेगळे न काढता येणारे अशा विचारांचा प्रवाह होता. यालाच भारतीय म्हणता येईल. एकमेकांचा आदर करणे, समान भूमिकेची कार्यवाही, आचार्य आणि संतांची शिकवण यांच्या मिश्रणातून आपल्या पाठशाळा चालत.' डॉ. दाभोळकरांच्याकडे अभ्यासक्रम कसा असावा. काय काय येणं गरजेचं आहे आणि परंपरेतील कोणत्या कौशल्यांचा समावेश करावा हे उकलत गेलं तर रवींद्र शर्मा गुरुजींच्याकडे आदिलाबादला आम्ही अनेकदा गेलो. तेही गुरुकुलात सात आठ वेळा दोन-तीन दिवस मुक्कामी राहिले. गुरुजींचे विचार अगदी स्पष्ट असत. ‘‘शास्त्री पंडित कारिगरों की संख्या कम रहती है. एक गाव में एक पंडित या शास्त्री है. तो कुंभार-लोहार-सुतार-गवंडी ऐसे कारिगर एक एक घर होता था. लेकिन खेती करनेवाले किसानों की संख्या जादा है. तेली-बुनकर गाय को चरानेवाले भी एक एकही रहते थे. गावकी जितनी जरुरत उतनेही गाव में रहते थे; जादा होते है वो जिस गावमें नहीं है कहाँ जाते थे. ये संतुलन रखते थे. जिनके पास उद्योग कौशल्य है. उनके पास जमीन नहीं. जिनके पास जमीन है उनके उपर कारिगरोंको तथा उद्योगीयोंको अनाज देने की जिम्मेदारी थी। ये पुरे भारतवर्ष में ऐसा था। गाव अपने आप आत्मनिर्भर निकोप व्यवस्थासे भरा था।''
‘‘उसकी आपूर्ती के लिये जितनी शिक्षा चाहिये थी उतनी लेते थे. कौशल्य की शिक्षा घरसेही मिलती थी. अभी आपको गुरुकुल शुरु करना है तो आजके उद्योग-व्यवसाय का भी विचार करना पडेगा. लेकिन अध्ययन में उसके साथ-साथ रामायण-महाभारत-कबीर-तुलसीदास-बौद्ध तथा जैन मत ये सारे आना चाहिये. ये कोई एक धर्म के विषय नहीं है। भारत में सामान्य रुपसे संघर्ष नहीं रहा. बाहर से आक्रमक आये तो संघर्ष होना शुरु हुआ. ग्राम व्यवस्था और शिक्षा व्यवस्था स्थिरतासे चली थी।'' इंग्रजांनी स्वतंत्र व्यवस्था आणीपर्यंत लोकाश्रयावरच हजारो वर्षे चाललेल्या पाठशाळा हळूहळू बंद पडत गेल्या.
गुरुजींनी कौशल्यावर भर देण्याच्या दृष्टीने एक प्रयोग दाखविला. त्या भागातील इंद्रजीत उईके यांचं सर्व घर वस्ती. धातू गाळण्यापासून ते वेगवेगळ्या जीवनावश्यक वस्तू बनविण्यार्पंत सर्व गोष्टी एक आदिवासीच्या घराच्या अंगणातच बनतात हे आश्चर्य. गुरुकुलाची संकल्पना प्रत्यक्ष समोर उभी ठाकली. शिक्षक आचार्य बनविण्याची क्रिया वयाच्या दुस-या-तिस-या वयापासूनच करायला हवी. रवींद्र शर्मा गुरुजींनी एक एक विषय उलगडत समोर उभा केला. आयुर्वेद अभियांत्रिकी विविध कला आत्मसात करण्याचे वय १२ वर्षाच्या आतच हवं. गुरुजींनी पूनमला विचारलं, ‘‘हं क्या लिखा है. पढो जरा.'' गुजरबाईंनी सर्व तपशिलासह वाचन केलं आणि गुरुजी खूष झाले. ‘‘प्रभुणेजी, आप को ये अच्छी शिक्षिका मिली है. इसे तैयार करना चाहिये. दस साल में आपको कई शिक्षक बनाके देगी.''
गुरुकुलची रचना उभी राहिली. धम्मपद, उपनिषद, आयुर्वेद, अभियांत्रिकी, गायन, वादन, नृत्य या पारंपरिक विषयांची मांडणी गुरुजींनी तीन दिवसात केली. एक अद्भुत भारतीय प्रणालीचं दर्शन होत गेलं. शिक्षणाचा तपशील, बारीकसारीक विषय इंदूच्या सर्व कुटुंबीयांमथून नुसता ओसंडत होता. ज्ञानाचा सुखद पाझरणारा हा झरा म्हणजे भारतीय ज्ञान परंपरेचं एक परिपूर्ण दर्शनच होय. गुरुजींचा शब्दन्शब्द अनेक बैठकांमधून टिपून एक पूर्वरचना तयार झाली. कबीर मला खरा समजला गुरुजींमुळे. मित्र सखा मार्गदर्शक अस्सल भारतीय जीवनदर्शन कबीरांच्या दोह्यांमधून व्यक्त होत होतं. क्रांतिवीर चापेकर बंधूचा वाडा. इतिहास आणि त्यांनी केलेला संकल्प मनात आकार घेत होता. ‘इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचं दूध नसून ते पुतना मावशीचं मायावी विष आहे. त्याला पूर्ण दूर ठेवायला हवं.' एक पाऊलवाट सापडली होती. अवघड असली तरी सापडली होती. चालायला सुरुवात झाली होती.