आयकर विभागाचे संकेतस्थळ पुन्हा सुरू

    दिनांक : 23-Aug-2021
Total Views |
- सरकारने नोटिस दिल्यानंतर इन्फोसिसची यंत्रणा कामाला
 
नवी दिल्ली : केंद्र सरकारने इन्फोसिस कंपनीच्या प्रमुखाला नोटिस बजावल्यानंतर कंपनीची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आणि शनिवार-रविवार असे दोन दिवस ठप्प असलेले आयकर विभागाचे संकेतस्थळ अखेर आज सोमवारी पुन्हा सुरू झाले. मात्र, तांत्रिक दोष अद्यापही कायम असल्याने आभासी माध्यमातून विवरणपत्र सादर करताना करदात्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
 
ITR-Status_1  H
 
164 कोटी मोजून देखील आयकर विभागाचे संकेतस्थळ करदात्यांसाठी डोकेदुखी वाढविणारे ठरले होते. त्यामुळे केंद्राने संकेतस्थळ विकसित करणार्‍या इन्फोसिस कंपनीच्या प्रमुखाला नोटिस बजावली होती. नव्या संकेतस्थळाविषयी हजारो तक्रारी सरकारला प्राप्त झाल्या आहेत. आयकर विभागाचे हे नवीन संकेतस्थळ इन्फोसिस या नामवंत आयटी सेवा पुरवठादार कंपनीने विकसित केले आहे. मात्र, ऑनर्लाइन सेवा सहज आणि सुलभ होण्याऐवजी ती अधिकच किचकट आणि डोकेदुखी वाढवणारी ठरली. परिणामी आयकर विभागाच्या कार्यपद्धतीवर टीका झाली होती.
 
या सर्व पृष्ठभूमीवर अर्थ मंत्रालायने इन्फोसिसचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांना नोटिस बजावली होती. आयकर संकेतस्थळाबाबत कोणत्या अडचणी आहेत, याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्यासमोर सादर करावी, अशी नोटिस बजावण्यात आली. दोन महिन्यांत या संकेतस्थळामधील अडचणी दूर न झाल्याने अर्थमंत्री सीतारामन् यांनीदेखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी 22 जून रोजी निर्मला सीतारामन् यांनी काही महत्त्वाच्या अधिकार्‍यांबरोबर आयकर संकेतस्थळाबाबतच्या तक्रारींचा आढावा घेतला होता. मात्र, त्यानंतर दोन महिन्यानंतरही यातील दोष दूर न झाल्याने अखेर सरकारने इन्फोसिसच्या प्रमुखांवर नोटिस बजावली. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस बंद राहिल्यानंतर सोमवार, 23 ऑगस्ट रोजी संकेतस्थळ पुन्हा एकदा सुरू झाले असल्याचे इन्फोसिस इंडियाने ट्विटरवर नमूद केले आहे.