अवैध गर्भपात करणार्‍या एका डॉक्टरसह बोगस डॉक्टरला अटक

19 Aug 2021 17:56:19
- आरोग्य विभाग व शहर पोलिसांची संयुक्त कारवाई
 
वाशीम : शहरातील रमेश टॉकीज परिसरातील एका दवाखान्यात अवैधरित्या गर्भपात सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. त्यावरुन एका दवाखान्यावर आरोग्य विभागाच्या पथकाने व शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत डॉ. एस. एम. सारसकर व बोगस डॉक्टर विलास ठाकरे यांना ताब्यात घेतले. ही कारवाई 18 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा केली. वाशीम शहरातील क्रांती चौक रमेश टॉकीज परिसरातील एस. एम. सारसकर यांच्या दवाखान्यात एका महिलेचा अवैध गर्भपात करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांकावर मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे आरोग्य विभाग व पोलिसांनी सापळा रचून छापा मारला व दवाखान्याची झडती घेतली असता त्यामध्ये गर्भपात करण्याचा औषधीसाठा आणि अन्य साहित्य मिळून आले.
vashim_1  H x W
 
सदर साहित्य जप्त करून आरोपी डॉ. सारसकरसह विलास ठाकरे या बोगस डॉक्टरला वाशीम शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध विविध कलमा अन्वये वाशीम शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गर्भपात करण्यासाठी आलेल्या महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भरती करण्यात आले असून, सध्या त्या महिलेची प्रकृति बरी असल्याची माहिती जिल्हा शल्य चिक्तिसक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. अवैधरित्या गर्भपात करणे कायद्याने गुन्हा आहे. शासनाने पिसीपीएनडीटी कायद्यातर्गंत अशी तपासणी करुन गर्भपात करणे गुन्हा ठरविला असून, असे गर्भपात रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत केली आहे. आरोग्य विभागातर्फे टोल फ्री क्रमांक दिला असून, या क्रमांकावर रितसर तक्रार दाखल करता येते. शहरातील डॉ. सारसकर यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
Powered By Sangraha 9.0