वाग्देवी नमन

    दिनांक : 28-Jul-2021
Total Views |
नारायणी नमोस्तु ते :
- म. रा. जोशी
 
देवी सरस्वतीचे पूजन आश्विन मासाच्या प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंतच्या पंधरवड्यात ज्या ज्या विविध प्रकारे होते ते केवळ हौस व विविधतेची आवड म्हणून नव्हे, तर त्याचे अधिष्ठानच आपल्या सांस्कृतिक जीवनाच्या प्रजेचे व प्रतिभेस्वरूप स्पष्ट करणारे आहे. प्रतिपदा ते विजयादशमी हा नवरात्राचा महोत्सव व दशमी तिथीला भगवती स्वार होऊन प्रस्थान करते म्हणून दसरा हा दशमीचा तोही विजयादशमीचा प्रस्थान मुहूर्त आहे. भाद्रपद पौर्णिमेला संन्यासांचा चातुर्मास समाप्त होतो तो आश्विन दशमी पराक्रमासाठी सिद्ध झालेली देवता ‘सीमा उल्लंघन’ करून आव्हानात्मक धारणेतून जीवन समस्याशी दोन हात करण्याची तयारी करते. तत्पूर्वी, पंचमीला नवरात्राची ललिता पंचमी आहे. भंडासुराशी युद्ध करून असुरांच्या विरोधात देवीने संघर्षाचा पवित्रा घेतला. पण या ललितेचे माहात्म्य आगळेवेगळेच आहे. ललिता सहस्रनामक स्तोत्र असून त्या भास्कराय यांची नितांत सुंदर टीका आहे. सौंदर्याने हे स्तोत्र ओतप्रोत भरलेले आहे. मुळात ललिता ही लावण्यवती देवी आहे. तिच्या लावण्याचे, सुकुमारतेचे, मार्दवतेचे रम्य वर्णन ललित सहस्रनामकाराने जे सादर केले ते आपल्या हिंदूच्या सौंदर्यशास्त्राचे मूळ आहे.
 

देवी सरस्वती_1   
 
Beauty and aesthetic यांचे मर्म ललिता सहस्रनामातून उकललेले आहे. relating to perecption by the senses याचा मूलत: भाव धर्म कोणता? याचे चिंतन, मनन जे पूर्वसुरींनी केले त्याचे स्वरूप ललिता सहस्रनामकाराने दाखवून दिले आहे. Fashion and beauty ने भारावून जातो. Fashion म्हणजे mode or shape. यांचे बदलते नमुने पॅटर्न रूपाने आपण दर पिढीनुसार पाहत असतो. तेव्हा फॅशन शीर्षकाने आढळणारे नमुने पॅटर्न हे वरवर कमनीय दिसत असले, तरी ते परिवर्तनशील असतात. एकच फॅशन चिरकालीन नसते. विविधतेने रंगलेली कमनीय नाना रूपाने परिवर्तनाने का प्रकटते? क्षणाक्षणाला नावीन्याची निर्मिती हे सौंदर्याचे व्यवच्छेदक लक्षण असून अशा नावीन्याची इच्छा ही ललिता देवी आहे. ती स्वत:च रम्य व आकर्षक असून सौंदर्याची मूर्ती आहे. सौंदर्य हे सुकुमार पण तेजाने रसरसलेले असते, अशी ही ललिता सौंदर्याचा सागर आहे. ती रम्य आहे. सुंदर आहे. कमनीय आहे. mode or shape आणि पॅटर्न यांच्या नानाविध रूपाची ती निर्मिती देवता आहे.
म्हणूनच ललितेचे स्थान हृदय आहे. ‘हृदये तू ललितादेव्याम्’ मानवी जीवनातील भावभावनांची निर्मिती (मन भरून येणे, हृदय हेलावणे) हृदयांत आहे. सौंदर्य व सौंदर्यानुभूतीचा उगम हृदय आहे. हे आपल्या त्रिकालदर्शी पूर्वजांनी नेमके हेरले व सौंदर्य निर्मितीची ललिता देवी हृदयात आहे. सप्तशती या मंत्रात्मक ग्रंथात ललिता देवी हृदयांत वास करते, असे सांगितले. एतद्संबंधी एका ऐतिहासिक घटनेसंबंधी दोन शब्द लिहितो. लोकमान्य टिळकांच्या वेळी पण जरा आगेमागे भट नावाचे एक क़्रांतिकारक होऊन गेले. त्यांचे चरित्र आठवणीवजा रूपाने छापले आहे. भट हे क्रांतिकारक होते व तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना पकडले व त्यांना शिक्षा झाली. तुरुंगात असताना ते गंभीर आजारी झाले. त्यांची बिमारी हृदय रोगाची होती. डॉक्टरांनी तपासले व शेवटी तुरुंग अधिकार्‍याने त्यांची पॅरोलवर काही दिवसांसाठी सुटका केली. योगायोगाने पॅरोलवर असताना त्यांच्या सुदैवाने त्यांची व अक्कलकोट स्वामी (समाधी शके 1800) महाराजांशी भेट झाली असताना स्वामींनी त्यांना ललिता सहस्रनामाचा पाठ करण्यास सांगितले. स्वामींच्या आदेशानुसार त्यांनी पाठ केला व पॅरोल संपून ते जेव्हा तुरुंग अधिकारी व डॉक्टरांसमोर उभे राहिले तेव्हा त्यांचा हृदयरोग नाहीसा झाला होता. ते पाहून डॉक्टर आश्चर्यचकित झाले.
ललिता सुकुमार. लावण्याने लखलखणणारी, सौंदर्याने मन प्रफुल्लित करणारी हृदयस्थ मनमोहक देवता आहे. ती रससेवाधि नवरसाचा साठा असलेली देवता आहे. रस व भाव हे मनाचे, हृदयाचे गुणधर्म असून भावभावना आल्हाद व परमहर्ष ज्या स्फूर्तीने, शक्तीने प्राप्त होतो अशा नवनव उन्मेष शालिनी नवीनता, ललिता, सरस्वती, शारदा जीवाला देत असते. निसर्ग जीवनातील सर्व प्रसन्नता ललिता किंवा सरस्वती देते. ललिता, सरस्वती व शारदा एकाच रूपाने तीन नावाने प्रकटते. हिंदू धर्म व संस्कृती जीवनधारेचे परम् सौंदर्य व आल्हाद ललिता, सरस्वती, शारदा या अभिनवरूपाने प्रकटतो, आविष्कृत होतो म्हणून ही देवी हिंदूंच्या सांस्कृतिक जीवनाच्या सौंदर्यशास्त्राची जननी आहे. ललिता, सरस्वती, शारदा रूपाने सौंदर्यशास्त्राचा उद्भव व उदय झालेला दिसून येतो. याचे दर्शन 64 कलात होते. त्यामध्ये कवित्व संगीत प्रधान आहेत. भोज नावाचा प्रख्यात राजा आजच्या माळव्यात- मध्यप्रदेशात होऊन गेला. त्याने सरस्वती मंदिरच उभारून तेथे सरस्वती देवीची स्थापना केली. या मंदिर स्थानी कविजन जमत व आपले काव्य सादर करीत तर समीक्षक, अभ्यासक, विद्वान पंडित येथे येत व शास्त्रचर्चा करीत. यालाच ‘संगोष्ठी’ म्हणत. कवी व विद्वानांच्या सभेला स्वत: राजा भोज येत असे व चर्चेत भाग घेत असे. या थोर राजाने अनेक ग्रंथ लिहिले. त्यापैकी दोन ग्रंथ सारस्वत पूजकांच्या आवडीचे आहेत. (1) शृंगार प्रकाश (2) सरस्वती कंठाभरण. दोन्ही ग्रंथ साहित्य शास्त्रास्वरूप व विवेचन करणारे आहे. नमूद करण्यासारखी बाब म्हणजे आपल्या ग्रंथांचे नामकरण शृंगार प्रकाश असे केले. शृंगार म्हणजे नटणे, सजणे तसाच शृंगाराचा अर्थ सोने असाही आहे. तेव्हा आपल्या नटण्याची, साजरेपणाची शोभा असते. आपले नटणे, सजणे हे आकर्षक व वेधशक्ती लावणारे असते. तसे माझे ग्रंथ आहेत व माझे साहित्य हे सरस्वती मंदिराचे लेणे आहे, असे भोज राजा आपल्याला सांगत आहे. दुसरा ग्रंथ सरस्वती कंठाभरण आहे. सरस्वतीच्या- देवी सरस्वतीच्या, लावण्याने लखलखणार्‍या सरस्वतीच्या कंठातील अलंकार म्हणजे माझा ग्रंथ असे जेव्हा भोज सांगतो तेव्हा सौंदर्याचा उद्भव व माझी रचना यांचे निकटचे, जिव्हाळ्याचे नातेच भोज स्पष्ट करीत आहे. साहित्य म्हणजे सौंदर्य अलंकरण, शोभायमानता हे तीनही गुणधर्म आल्हाद व प्रसन्नतादायक आहे. सरस्वती देवी ही वाणीशी संबंधित आहे. काव्यनिर्मिती वाणी आहे. मंगलश्लोकात भोजराजा सरस्वती वंदना करताना म्हणतात-
ध्वनि: वर्णा: पदम् वाक्यम्
इति आस्पद चतुष्टयम्
यस्या: सूक्ष्मादि भेदेन
वाग्देवीम् ताम् उपास्म हे
वाणी किंवा वाचा यांचे अधिष्ठान स्वप्रकाश शब्दरूप भारती सरस्वती आहे. ती शब्दब्रह्मरूप आहे. सूक्ष्म, पश्यन्ती, मध्यमा व वैखरी असे वाचेचे चार प्रकार आहेत. येथून वाणी किंवा वाचेच्या गंभीर व मूलभूत विवरणाला भारतीयांनी प्रारंभ केला. तो तीन प्रकारे-
1) वाचा व वाचेचे चार प्रकार.
2) व्याकरणकारांनी सादर केलेला स्फोटाचा सिद्धांत, वाणी ही ध्वनिरूप आहे. या ध्वनीतून वर्णाची निर्मिती क, ख, ग, घ, ङ् हे वर्ण आहे व ते ध्वनिरूप आहेत. यावर 14 सूत्रे आहेत. ती महेश्वर सूत्रे आहेत. ही 14 शिवाच्या 9 डमरूच्या नादातून- ध्वनीतून नामरूपाला आली. ध्वनी- वर्ण हा क्रम येथे आहे. पुढे वर्णांच्या संयोगाने पद (शब्द) निर्माण झाला व पदाच्या साह्याने वाक्य. ध्वनी, वर्ण, पद, वाक्य यांचे मूल रूप वाग्देवतेत आहे. ही वाग्देवता सरस्वती शारदाच आहे.
3) याचेच पर्यवसान साहित्य व साहित्यशास्त्रात झाले. काश्मिरी विद्वान आनंदवर्धन यांचा ध्वन्यालोक नावाचा ग्रंथ असून त्यावर अभिनव गुप्ताची लोचन नावाची टीका आहे. या टीकेच्या प्रारंभीच अभिनव गुप्तांनी परा, पशन्ती, मध्यमा, वैखरी या वाणीच्या चारही प्रकारांचा निर्देश करूनच तो साहित्यशास्त्र विवेचनाकडे वळला. आनंदवर्धन हा परमदेवी भक्त होता तर अभिनवगुप्त शिवभक्त होता. या दोघांनी शिवा आणि शिव यांना वाट पुसत पुसत साहित्यशास्त्र नामरूपाला आणले. हे दोघेही परम् सरस्वती भक्त होते.
4) याचप्रमाणे ज्ञानदेव महाराजांनी ग्रंथरचनेचे शिल्पच सरस्वती, शारदा स्तवनावर उभारले व शब्दब्रह्माला, शारदेला आवाहन करूनच ग्रंथ निर्मितीला सुरुवात केली. कारण वाणी म्हणजे प्रत्यक्ष सरस्वतीच असते व आहे. सरस्वती ही सकल विद्येची संपदा आहे. ती स्फूर्ती, रूप आहे.
मानवाची वाणी, तिचे चार प्रकार- ध्वनी, वर्ण, शब्द व वाक्य असा क्रम. शब्द व वाक्य यांचे परस्पर संबंध, मूर्ध वाक्य हाच आशय कन्टेंट याचे सखोल चिंतन व अध्ययन करून व्याकरणशास्त्र व व्याकरणशास्त्राचे शब्दब्रह्म रूप आणि ध्वनी-वर्ण-शब्दमधून काव्य निर्मिती असे दोन सांस्कृतिक प्रवाह वैदिक परंपरेतून जे निर्माण झाले ते वाग्देवीमय, सरस्वतीरूप, शारदारूप आहे. हा सर्व शक्तीचा विलास आहे, उद्भव आहे. प्रकटीकरण आहे. ही शक्ती स्फूर्तिरूपाने एकाएकी उद्भवते. spontaneous असून सरस्वती कृपेने प्रसन्न होते व शारदेचे गंगेसारखे पावित्र्य अनुभवास देते.
- 9422501194