बारावीच्या गुणांवर आलेल्या विद्यार्थ्यांचीच एमबीबीएसमध्ये उत्तम कामगिरी

    दिनांक : 28-Jul-2021
Total Views |
- तज्ज्ञांच्या समितीने काढला निष्कर्ष
चेन्नई : बारावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर डॉक्टर व्हायचे असेल, तर राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात् नीट अनिवार्य असते. मात्र, एमबीबीएसमध्ये नीट परीक्षा देऊन प्रवेश घेतलेले विद्यार्थी चांगली कामगिरी करतात की बारावीच्या गुणांवर प्रवेश घेतलेले विद्यार्थी चांगली कामगिरी करतात, हे जाणून घेण्यासाठी तामिळनाडू सरकारने नियुक्त केलेल्या समितीच्या मते, बारावीच्या गुणांवर प्रवेश घेणारे विद्यार्थी नीटच्या माध्यमातून आलेल्यांपेक्षा जास्त चांगले यशस्वी डॉक्टर ठरतात, असा महत्त्वाचा निष्कर्ष काढला आहे.

MBBS_1  H x W:  
 
नीटच्या सामाजिक-आर्थिक परिणामाचा अभ्यास करण्यासाठी तामिळनाडू सरकारने न्या. ए. के. राजन यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन केली होती. समितीचे सदस्य डॉ. जवाहर नेसन यांनी याबाबत खुलासा करताना सांगितले की, नीट आणि पूर्व-नीट आणि नीटनंतरच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे समितीने विश्लेषण केले. त्यानुसार नीट उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची कामगिरी बारावीच्या गुणांच्या आधारे एमबीबीएसमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा खराब असल्याचे दिसून आले आहे.
अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात ज्यांनी बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश घेतले आणि जे नीट उत्तीर्ण करून आले, अशा विद्यार्थ्यांच्या कामगिरीत फार अंतर दिसले नाही. मात्र, दुसर्‍या वर्षापासून नीटच्या गुणांच्या आधारे प्रवेश घेतलेले विद्यार्थी बारावीमधून आलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत खराब कामगिरी करतात, असे डॉ. नेसन यांनी म्हटले आहे. शाळा आपल्याला गंभीर विचार, तर्कशुद्ध तर्क विकसित करण्याची संधी देते, पण कोचिंग सेंटरमध्ये तशी संधी मिळत नसते. म्हणूनच, दुसर्‍या वर्षापासून जेव्हा विद्यार्थ्याला गंभीर विचारसरणीचा उपयोग करावा लागतो, तेव्हा नीटचे विद्यार्थी कमी पडतात, असे डॉक्टर नेसन सांगतात.
 
खाजगी कोचिंगचे मायाजाळ
एकट्या तामिळनाडूतील खाजगी कोचिंग सेंटरची वार्षिक उलाढाल किमान 6000 कोटी रुपयांची आहे. समितीने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, कोचिंग कोचर्स याकडे व्यवसाय म्हणून पाहतात. आम्ही व्यवसायाची जी आकडेवारी दिली, ती फक्त प्राथमिक अंदाज आहे. वास्तविक नीटच्या तयारीसाठी कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्याला वर्षाकाठी दीड ते 5 लाख रुपये खर्च करावे लागतात. याशिवाय, क्रॅश कोर्समध्येही विद्यार्थ्यांकडून अतोनात पैसे घेतले जातात.
जे विद्यार्थी नीटच्या आधारे प्रवेश घेतात, ते प्रामुख्याने शहरी, संपन्न आणि सुशिक्षित कुटुंबातील असतात. आम्हाला असे दिसून आले की, 70 टक्के विद्यार्थी जेव्हा त्यांचा पदव्युत्तरचा अभ्यासक्रम पूर्ण करतात, तेव्हा त्यांनी काम करण्यासाठी खाजगी रुग्णालयांची निवड केली असते, पण बारावीच्या गुणांद्वारे आलेले 70 टक्के विद्यार्थी सरकारी रुग्णालयाची निवड करतात. यावरून नीटपेक्षा बारावीच्या गुणांवर डॉक्टर होणारे विद्यार्थी नीटमधून आलेल्यांच्या तुलनेत अधिक यशस्वी ठरतात, असेही डॉ. नेसन म्हणतात.