जयपूर : बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेतील अभिनेत्री कॅटरिना कैफ व अभिनेता विक्की कौशलचा विवाह उद्या गुरुवारी सवाई माधोपूरच्या फोर्ट बरवाडा हॉटेल येथे शाही थाटात होणार आहे. या लग्नाच्या तीन दिवसांच्या विविध सोहळ्यांना मंगळवारपासून सुरुवात झाली. या लग्नात सहभागी होण्यासाठी दोघांचे कुटुंबीय व चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते व अभिनेत्री सवाई माधोपूरला आले आहेत. गुरुवारी दोघांचे लग्न होणार असून, 10 डिसेंबरला स्वागतसमारोह होणार आहे. या भव्य लग्नात केवळ 120 जणांना आमंत्रण दिले आहे. यासाठी खास मंडप तयार केला आहे. याची रचना पूर्णपणे राजवाड्यासारखी आहे. या दोघांनाही ओटीटी कंपनीने छायाचित्रांसाठी मोठी ऑफर दिली आहे.
ही ऑफर दोघांनी स्वीकारल्यास लग्नाची छायाचित्रे व व्हिडीओ हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवली जातील. यात त्यांच्या कुटुंबीयांच्या मुलाखतीही असतील. छायाचित्रे कोणालाही मिळू नयेत, म्हणून खास व्यवस्था केली आहे. तसेच एका आंतरराष्ट्रीय मासिकाला छायाचित्र व व्हिडीओचे हक्क दिले आहेत. यासाठी या कंपनीने 100 कोटी रुपयांची ऑफर कॅटरिना व विक्कीला दिली आहे. या लग्नासाठी पाहुण्यांना गोपनीय कोड दिला आहे. हा कोड विवाहाचे आयोजक व पाहुण्यांमध्येच असेल. कोड सांगितल्यावरच पाहुण्यांना प्रवेश मिळेल. दरम्यान, या लग्नाच्या सुरक्षेची जबाबदारी सलमान खानचा बॉडीगार्ड शेराच्या कंपनीने घेतली आहे.