मुंबई : काही वर्षांपूर्वी महेंद्रसिंह धोनीचा बायोपिक सर्वांनी बघितला आहे. आता भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजचा वाढदिवस शुक्रवारी होता. यानिमित्ताने तिने तिच्या बायोपिकची रिलीज डेट जाहीर केली आहे. 'साबास मिथू' हा बायोपिक पुढील वर्षी 4 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाला उजितावस्था मिळवून देणाऱ्या मिताली राजची कहाणी यामध्ये मांडण्यात आली आहे. मिताली राजच्या आयुष्यातील उतार चढाव, तिला मिळालेले सेटबॅक आणि तिच्या आयुष्यातील आनंदाचे क्षणही यामध्ये बघायला मिळणार आहेत.
तापसी पन्नूवर मिताली राजची भूमिका साकारण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. तापसीने साईना नेहवालच्या बायोपिकमध्येही काम करायचे मान्य केले होते. मात्र नंतर तिने मध्येच हा सिनेमा सोडून दिला होता. परिणिती चोप्राने साईना नेहवालची भूमिका साकारली होती. आता तापसी पन्नूला 'शाबास मिथू'च्या रुपाने आणखीन एक स्पोर्टस बायोपिक मिळाला आहे. 'शाबास मिथू'मध्ये तिच्याशिवाय अन्य मुख्य भूमिकेत विजय राज देखील दिसणार आहे. मिताली राजच्या क्रिकेट प्रवासाला सादर करण्यासाठी 'शाबास मिथू'चे शुटिंग भारतात आणि भारताबाहेरही करण्यात आले आहे. विस्कॉन 18 स्टुडिओद्वारे निर्मिती असलेल्या या सिनेमाचे लेखन प्रिया आवेन यांनी केले आहे.