अपहरण झालेल्या मुलीचा २४ तासात शोध; नंदुरबार पोलिसांना यश

07 Dec 2021 17:42:45
नंदुरबार : तालुक्यातील व्याहुर येथून अपहरण करुन पळवुन नेलेल्या अल्पवयीन मुलीची कन्नड ता. औरंगाबाद येथुन अवघ्या २४ तासात नंदुरबार पोलीसांकडुन सुटका केल्याची घटना आज घडली.
 
Nandurbar_1  H
 
गोरखनाथ भग्या नाईक रा. व्याहुर ता.जि. नंदुरबार यांची अल्पवयीन मुलगी ६ डिसेंबर रोजी सकाळी ०७.३० वा. सुमारास जी.टी.पी. कॉलेजमध्ये गेली असता ती दुपार पर्यंत घरी आली नाही म्हणून गोरखनाथ नाईक यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु अल्पवयीन पिडीत मुलगी मिळुन आली नाही. त्याच वेळेस त्यांच्या भावाच्या मुलाकडुन गोरखनाथ नाईक यांना समजले की, त्यांच्या अल्पवयीन मुलीस नांदरखेडा ता.जि. नंदुरबार येथील महेश रसाल राठोड याने लग्नाचे अमिष दाखवुन मोटार सायकलने पळवुन नेले आहे म्हणून गोरखनाथ भग्या नाईक रा. व्याहुर ता.जि. नंदुरबार यांनी तात्काळ नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे जावून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
 
घटनेची माहिती मिळ्ताच पोलीस निरीक्षक खेडकर यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तात्काळ पथकास धुळे, चाळीसगांव, औरंगाबाद येथे रवाना केले. समाज माध्यमांवर देखील आरोपीचा फोटो व त्याबाबतची माहिती प्रसारीत करण्यात आली होती. ६ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास मुलीच्या वडिलांना अनोळखी मोबाईल नंबरवरुन मॅसेजद्वारे समजले की, त्यांच्या मुलीस तिच्या इच्छे विरुध्द् महेश राठोड याने औरंगाबाद जवळील एका ठिकाणी नेलले आहे. सदरची माहिती गोरखनाथ नाईक यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना कळविल्याने तपास पथकाने कन्नड येथे गुन्ह्यातील पिडीत मुलगी व आरोपीताचा शोध घेतला परंतु ते सापडले नाही. आरोपी वारंवार आपले लपण्याचे ठिकाण बदलवत होता त्यामुळे तपास पथकास अल्पवयीन मुलगी व आरोपीताचा शोध घेण्यास अडचणी निर्माण होत होत्या. तपास पथकाने कन्नड शहरामध्ये आरोपीचे कोणी नातेवाईक राहतात का? याबाबत माहिती घेवुन ७ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास कन्नड शहरातील औरंगजेब नगर येथुन आरोपीच्या नातेवाईकाच्या घरातुन अपहरण झालेल्या मुलीची सुटका केली व आरोपी महेश रसाल राठोड (२१) रा. नांदरखेडा ता.जि. नंदुरबार यास ताब्यात घेतले.
 
नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे पी.आर.पाटील, पोलीस अधीक्षक, नंदुरबार यांनी अभिनंदन करुन पथकास विशेष रोख बक्षीस जाहीर केले तसेच अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांनी त्यांच्या मुलीची अवघ्या २४ तासाच्या आत आरोपीच्या ताब्यातुन सुखरुप सुटका केल्याबद्दल नंदुरबार पोलीसांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहे.
 
हि कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस उप-निरीक्षक सागर आहेर, पोलीस नाईक स्वप्नील गोसावी, पोलीस अमंलदार दिनेश चव्हाण, महिला पोलीस अमंलदार शुभांगी पाटील, पोलीस नाईक मोहन ढमढेरे यांच्या पथकाने केली आहे.
Powered By Sangraha 9.0