ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक : संभाजी ब्रिगेडचे कृत्य

05 Dec 2021 17:16:17
नाशिक : येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक, चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी म्हटले. दरम्यान, गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा विविध स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे
 
 
shai_1  H x W:
 .
'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर हे आज साहित्य संमेलनात एका परिसंवादात सहभागी होणार होते. या परिसंवादात सहभागी होण्याआधीच त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या घटनेमुळे साहित्य संमेलनात मोठी खळबळ उडाली. सकाळीच साहित्य संमेलनामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भेट दिली होती. त्यांनी संमेलन परिसरात फेरफटका मारत साहित्यिकांशी देखील संवाद साधला होता. संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी पवारांचं स्वागत केलं होतं. मात्र, संभाजी ब्रिगेडने केलेल्या या कृत्यामुळे गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावरून सुरू असलेला वाद आता आणखी पेटण्याची शक्यता आहे.
ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावरून वाद सुरू होता. या पुस्तकातील मजकूराबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात छत्रपती संभाजीराजे यांची बदनामी करण्यात आला असल्याचा आरोप याआधीच संभाजी ब्रिगेडने केला होता. या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत होती.
वाद आणि नाशिकचं साहित्य संमेलन
साहित्यिकांसाठी पर्वणी असलेल्या साहित्य संमेलनाची प्रतीक्षा वाचक, रसिकांनाही तितकीच असते. मात्र साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण आता सर्वांच्या परिचयाचे झाले आहे. यंदा नाशिकमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबतदेखील सुरुवातीपासून वाद सुरु आहेत. सुरुवातीला अपेक्षेप्रमाणे मानापमान नाट्य रंगलं. साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार यांची नावं नसल्यानं महापौर सतिश कुलकर्णी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर फडणवीसांच्या नावाचा समावेश पत्रिकेत केला असून ते संमेलनात सहभागी होणार असल्याचं स्वागताध्यक्ष छगन भुजबळांनी सांगितलं आणि या वादावर पडदा पडला.मात्र फडणवीस यांनी संमेलनास येण्यास नकार दिला. त्याआधी संमेलन गीतात सावरकरांचे नाव नसल्यानं मनसेनं उठवला आवाज होता. मनसेच्या इशारानंतर सावरकरांच्या नावाचा गीतामध्ये समावेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता विरोध
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावर याआधी नाराजी व्यक्त केली होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवा यांची तुलना करून काय साध्य करायचं होतं असा प्रश्न आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला होता. पुस्तकाची शहानिशा व्हावी अशीही त्यांनी मागणी केली होती. तर, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या पुस्तकातील वादग्रस्त मजकूर वगळण्याची मागणी केली होती.
Powered By Sangraha 9.0