धुळ्यात संपकरी एसटी कर्मचाऱ्याचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

17 Dec 2021 18:02:02
धुळे :- एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या 39 दिवसांपासून कर्मचारी आंदोलन करत आहे. धुळ्यात संपकरी एसटी बस कर्मचाऱ्याचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
 

samp_1  H x W:  
 
 
धुळ्यात एसटी कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहे. अनेक कर्मचारी अजूनही कामावर पोहचले नाही, अशातच आज संजय सोनवणे या वाहकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. संजय सोनवणे हे संपात सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. संजय सोनवणे यांच्या निधनामुळे एकच खळबळ उडाली. संतप्त कर्मचार्‍यांनी मृत कर्मचाऱ्याचा मृतदेह विभागीय नियंत्रण कार्यालयात आणला आहे. मृत सोनवणे यांचे नातेवाईक व आंदोलक कर्मचारी आक्रमक झाले होते. पंरुतु, पोलिसांनी कर्मचाऱ्यांची समजूत काढली. गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी व नातेवाईकांनी मृतदेह परत नेला.
संजय सोनवणे यांना विभागीय कार्यालयातून फोन आला होता, त्यानंतर त्यांचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला असा आरोप, मृत सोनवणे यांच्या पत्नीने केला आहे.
परिवहन मंत्री अनिल परब, शेखर चन्ने, विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळ, आगार व्यवस्थापक स्वाती पाटील, अनुजा दुसाने यांच्यासह कर्मचाऱ्याला फोन लावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, गेल्या 39 दिवसांपासून एसटी बस कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ सुद्धा दिली आहे. तसंच विलीनीकरणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. राज्य सरकारने मेस्माअंतर्गत कारवाई करण्याचा इशारा देऊनही कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहे.
Powered By Sangraha 9.0