भगवद्गीता आणि स्वामी विवेकानंदांचे कार्य

    दिनांक : 13-Dec-2021
Total Views |
मंगळवार, दि. १४ डिसेंबर रोजी गीता जयंती आहे. भगवद्गीतेचा सखोल अभ्यास स्वामी विवेकानंदांनी केला होता. इतकेच नव्हे तर भगवद्गीतेची शिकवण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. भगवद्गीतेवर शंका घेणार्‍यांनाही त्यांनी चोख उत्तर दिले. गीतेतील चार योग स्वामी विवेकानंदांनी अतिशय सोप्या भाषेत सर्वसामान्यांना समजावून सांगितले. भगवद्गीतेच्या संदर्भात स्वामी विवेकानंदांनी कोणते कार्य केले ते विशद करणारा हा खास लेख.
 

BHAGAVAD GITASWAMI VIVEKA 
 
भगवद्गीता एक अद्वितीय ग्रंथ आहे. भगवद्गीतेचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. भाषांतराच्या बाबतीत ‘बायबल’नंतर दुसरा क्रमांक लागतो तो भगवद्गीतेचा! ‘बायबल’चा प्रसार होण्यामागे ख्रिश्चन मिशनर्‍यांची यंत्रणा आहे. भगवद्गीतेच्या प्रसाराबाबत अशी कोणतीच यंत्रणा नाही. भगवद्गीतेची महती सांगताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आठव्या शतकापर्यंत भगवद्गीतेची माहिती फारशी कोणालाच नव्हती. भगवद्गीतेची माहिती भारतीयांना करून दिली ती अलौकिक बुद्धिमत्ता असलेल्या आद्य शंकराचार्यांनी!
 
महाभारतासारख्या मोठ्या ग्रंथात भगवद्गीता अतिशय संक्षिप्त रूपात होती. महाभारतातून हे भगवद्गीतारुपी रत्न आद्य शंकराचार्यांनी बाहेर काढले. इतकेच नव्हे, तर भगवद्गीतेवर त्यांनी भाष्यही केले. भगवद्गीता सामान्य माणसाला समजेल, इतपत सोपी करण्याचा आणि तिच्यावर टिप्पणी वा भाष्य करण्याचा मार्ग आपल्या नंतरच्या विद्वानांसाठी आद्य शंकराचार्यांनी खुला केला.
 
विवेकानंदांनी केलेले महत्त्वाचे कार्य
 
आद्य शंकराचार्यांनी भगवद्गीतेला अद्वितीय ओळख दिली, तर स्वामी विवेकानंदांनी भगवद्गीतेतला महासागर घुसळला. त्यातून त्यांनी राजयोग, भक्तियोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग या चार योगांचे नवनीत बाहेर काढले. हे चार योग म्हणजे ध्यान, त्याग, कर्म आणि ज्ञान यांच्याकडे नेणारे मार्ग होत. भगवान श्रीकृष्णांनी मोक्षप्राप्तीसाठी योगरूपातल्या याच चार गोष्टींची शिकवण भगवद्गीतेतून दिली आहे. स्वामी विवेकानंदांनी प्रत्येकाचे लक्ष या चार गोष्टींकडे वेधले. एवढेच करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी अतिशय सोप्या भाषेत या प्रत्येक गोष्टीवर व्याख्यानेही दिली. हीच व्याख्याने नंतर पुस्तकरुपात प्रसिद्ध झाली. या पुस्तकांचा अनेक भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला. विवेकानंदांच्या व्याख्यानांवर आधारित ही पुस्तके म्हणजे प्रत्येक साधकासाठी एक प्रकारचा ऊर्जास्रोतच आहे.
 
भगवद्गीतेच्या आणि एकूणच महाभारताच्या अस्तित्वाविषयी आणि ऐतिहासिकतेविषयी अनेक जण प्रश्न उपस्थित करीत असतात. भारतासारख्या प्राचीन देशाकडे जगाला देण्यासारखे काहीही नाहीये, असा दावा करणार्‍यांकडून तर भगवद्गीतेच्या आणि महाभारताच्या अस्सलतेविषयी वारंवार शंका उपस्थित केली जाते. अशा शंकाखोरांना स्वामी विवेकानंदांनी भगवद्गीतेतली तत्त्वे आणि सत्ये सांगून चोख उत्तर दिले आहे. भगवद्गीतेत सांगितलेली तत्त्वे प्रत्यक्षामध्ये सत्य आहेत हे कोणालाही नाकारता येणार नाही. स्वामी विवेकानंदांनी भगवान श्रीकृष्णाची ऐतिहासिकता, हुशारी आणि प्रयोगशीलता ओळखली होती. ते म्हणतात की, एखाद्या गोष्टीविषयी आदर बाळगणे किंवा तिची भक्ती करणे यापेक्षाही श्रेष्ठ आहे तो उदात्त विचारांना जन्म देणारा मेंदू. उदात्त विचार प्रसृत करणारा मेंदू जास्त महत्त्वाचा आहे. उदात्त विचार प्रसृत करणारा असा मेंदू होता भगवान श्रीकृष्णाचा!
 
एकाच ध्येयाकडे नेणारे मार्ग
 
गीतेत सांगितलेली विविध तत्त्वे स्वामी विवेकानंदांनी स्पष्ट केली आहेत. कर्म आणि ज्ञान यांच्यात उघड संघर्ष आहे, असा दावा काहीजण करतात. याबाबतही स्वामी विवेकानंदांनी भाष्य केले आहे. नीट विचार केला, तर आध्यात्मिक जीवनात कर्म आणि ज्ञान यांच्यामध्ये संघर्ष नाही, असेच आपल्याला आढळून येईल. स्वामी विवेकानंदांनी आत्मज्ञानाचा अविश्वसनीय मार्ग दाखवून दिला आहे. शिवाय श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेला, कर्मयोगाकडे नेणारा मार्गही स्वामी विवेकानंदांनी सामान्य माणसाला दाखविला आहे.
 
आध्यात्मिकदृष्ट्या कर्म आणि ज्ञान हे मार्ग वेगवेगळे नाहीत, असे भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. कर्म आणि ज्ञान या दोन मार्गांमध्ये संघर्ष आहे, असा मूर्खपणाचा दावा अज्ञानी लोक अगदी छातीठोकपणे करत असतात. वस्तुस्थिती मात्र तशी नाही! उलट, कर्म आणि ज्ञान आपल्याला एकाच ध्येयाकडे घेऊन जाणारे मार्ग आहेत. स्वामी विवेकानंदांनी हा मुद्दा अधिक स्पष्ट करून सांगितला आहे. विवेकानंद स्पष्टपणे सांगतात की, श्रीकृष्ण जेव्हा कर्मयोगाविषयी बोलतो तेव्हा तो नि:स्वार्थ कर्माविषयी बोलत असतो. एखाद्या फळाची अपेक्षा ठेवून केल्या जाणार्‍या कर्माविषयी श्रीकृष्ण बोलत नसतो. स्वामी विवेकानंदांनी श्रीकृष्णाची ही शिकवण ठळकपणे प्रतिपादित केली आहे.
स्वामी विवेकानंद म्हणतात की, ज्ञानयोग आचरणात आणणारी व्यक्ती, जी स्थिती आणि जाणीव प्राप्त करते, तीच स्थिती आणि जाणीव कर्मयोग आचरणात आणणारी व्यक्ती प्राप्त करते. या जगात कर्मावाचून एक क्षणभरही कोणतीही व्यक्ती मुक्त राहू शकत नाही, हे भगवान श्रीकृष्णांनी अतिशय ठामपणे भगवद्गीतेत सांगितले आहे. स्वामी विवेकानंदांनी, भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. कर्माच्या या विस्तृत व्याख्येत, विचार करण्याच्याही कृतीचा समावेश श्रीकृष्णाने केला आहे. स्वामी विवेकानंदांनी कर्माच्या या विस्तृत व्याख्येवर सखोल विचार केला आहे. त्यावरून त्यांनी, कोणत्याही व्यक्तीला कर्मावाचून अलिप्त राहणे केवळ अशक्य आहे या गोष्टीचा पुनरुच्चार केला आहे.
 
जीवनासाठी मार्गदर्शक ग्रंथ
 
स्वामी विवेकानंदांनी कर्मयोगाची पुनर्स्थापना केली. भगवद्गीता आध्यात्मिक ग्रंथ आहे. स्वामी विवेकानंदांनी या ग्रंथाला, ‘जीवन कसे जगावे’ याविषयी मार्गदर्शन करणारा ग्रंथ बनविले! अनेक लोक भगवद्गीतेला निव्वळ ‘एक धार्मिक ग्रंथ’ एवढेच स्थान देतात. पण ते ही गोष्ट सोयीस्कररित्या विसरतात की, भगवद्गीता एखाद्या मंदिरात किंवा आश्रमात सांगितली गेली नाही तर ती रणांगणावर सांगितली गेली. भगवद्गीतेचा हा महत्त्वाचा पैलू स्वामी विवेकानंदांनी सर्वांच्या निदर्शनास आणून दिला. या अद्वितीय ग्रंथात सांगितलेले संदेश वा तत्वे वा सत्ये आपण आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणू शकतो, नव्हे आणलीच पाहिजेत असेही स्वामी विवेकानंदांनी आग्रहाने सांगितले.
आपण ज्या समस्यांना तोंड देतो त्या प्रत्येक समस्येवर योग्य उत्तर शोधण्यासाठी भगवद्गीतेत सांगितलेल्या संदेशांचा वा तत्त्वांचा वा सत्यांचा वापर आपण केला पाहिजे. आपल्या अस्तित्वाच्या बाहेर जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण आणि उद्दिष्टपूर्ण करण्यासाठी आपण या संदेशांचा, तत्त्वांचा वा सत्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे. अनासक्ती गीतेचा मुख्य गाभा आहे, असे स्वामी विवेकानंदांनी सांगितले आहे. समाजाचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता असण्याच्या काळात भगवद्गीतेतला अनासक्तीचा विचार अतिशय उपयुक्त ठरेल.
 
स्वामी विवेकानंद म्हणतात की, कामासाठी काम हा गीतेच्या मध्यवर्ती संदेशांपैकी एक संदेश आहे. आपण सर्वांनी श्रीकृष्णाने सांगितलेला हा संदेश वा ही शिकवण जर आचरणात आणली, तर आपण अशा व्यक्ती, अशी कुटुंबे, असा समाज आणि अशी राष्ट्रे घडवू शकू की जी परिपूर्ण असतील. मेंदू आणि हृदय यांचे समग्र एकत्रीकरण प्रतिबिंबित करणारे सुसंवादी आणि सामंजस्यपूर्ण व्यक्तिमत्व प्रत्येकाकडे असले पाहिजे, असे स्वामी विवेकानंदांना वाटत असे. स्वामी विवेकानंदांनी हा विचार गीतेतून घेतला होता. स्वामी विवेकानंद म्हणतात की, असे व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तीचे मन अचाट आणि विचारी असते. अशा व्यक्तीकडून जी भाषा वापरली जाते, ती असते अतिशय संतुलित आणि मनोहारी!
 
स्वामी विवेकानंदांनी स्पष्टपणे सांगितले की, गोंधळलेल्या स्थितीत रणांगणावर उभ्या असलेल्या अर्जुनासारखीच आपल्यापैकी अनेक जणांची स्थिती असते. मृत्यूची भीती दूर करून अर्जुनाचा उत्साह वाढविण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी त्याला सांगितले की, आपले शरीर पुन्हा पुन्हा जन्म घेते आणि मरण पावते. जन्म-मरणाच्या फेर्‍यात अडकल्यामुळे अमर आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला हा संदेश स्वामी विवेकानंदांना अतिशय आवडला. परकीय राजवटीच्या बेड्यांमध्ये बद्ध झालेल्या आणि नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या भारतीयांना जागे करण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या याच संदेशाचा वापर केला.
 
स्वामी विवेकानंद म्हणतात की, आजारी व्यक्तीला तिच्या आजाराविषयी सांगण्याची गरज नाही. त्या व्यक्तीला गरज असते ती तिच्या विस्मृतीत गेलेल्या सामर्थ्याविषयी सांगण्याची! कारण, अशा व्यक्तीला आपल्या सामर्थ्याचा विसर पडलेला असतो. निराश झालेल्या व्यक्तीला आणि आपल्या सामर्थ्याचा विसर पडलेल्या व्यक्तीला त्याच्या शक्तीची वा सामर्थ्याची जाणीव करून देणे, हेच स्वामी विवेकानंदांच्या जीवनाचे आणि शिकवणुकीचे सार आहे. श्रीकृष्णाच्या जीवनाचे आणि शिकवणुकीचे सारदेखील हेच आहे. भगवान श्रीकृष्णाने अनेक महान कार्ये केली आहेत. त्या सर्व कार्यांमध्ये भगवद्गीता हे श्रीकृष्णाने केलेल्या महान कार्याचे सर्वात चांगले उदाहरण आहे!
 
आधुनिक शंकराचार्य
 
श्रीकृष्णाने अर्जुनाच्या डोक्यात चाललेला गोंधळ तर दूर केलाच शिवाय शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या जुन्या धार्मिक चालीरीती आणि परंपरा यांच्यातलाही गोंधळ दूर केला. आधुनिक काळात स्वामी विवेकानंदांसाठी हीच कामगिरी शिल्लक होती. ही कामगिरी स्वामी विवेकानंदांनी दोन मार्गांनी केली. पहिला मार्ग म्हणजे त्यांनी अडगळीत पडून धूळ खात बसलेल्या भगवद्गीतेच्या वेगवेगळ्या आवृत्त्यांमधील गोंधळ काढून टाकला. दुसरा मार्ग म्हणजे स्वामी विवेकानंदांनी भगवद्गीतेच्या त्या आवृत्त्या सामान्य माणसाला वाचायला सांगितल्या आणि त्यात असलेली ऊर्जा घेण्यास सांगितले.
स्वावलंबन हा गीतेच्या मुख्य संदेशांपैकी एक संदेश आहे, असे स्वामी विवेकानंदांचे मत होते. ते म्हणतात, स्वतःला असहाय्य मानणे घोडचूक आहे. स्वतःला असहाय्य मानू नका. तसेच कोणाहीकडून मदतीची अपेक्षा करू नका किंवा मदतीची भीक मागू नका. आपणच आपले मदतनीस आहोत. आपण स्वतःला जर मदत करू शकलो नाही, तर आपल्याला कोणीच मदत करणार नाही.
स्वामी विवेकानंदांना ‘आधुनिक शंकराचार्य’ म्हटले पाहिजे! ज्यांना ‘आधुनिक श्रीकृष्ण’ म्हणता येईल, अशा श्रीरामकृष्ण परमहंसांचे विचार आदर्शवत मानून, त्या विचारांप्रमाणेच स्वामी विवेकानंदांनी स्वत:च्या जीवनाची वाटचाल केली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले अनेक स्वातंत्र्यसैनिक स्वामी विवेकानंदांना आदर्श मानत. इंग्रजांच्या राजवटीत पोलिसांना बहुतेक स्वातंत्र्यसैनिकांकडे स्वामी विवेकानंदांच्या शिकवणुकीचे पुस्तक आणि ते ज्या ग्रंथाला जीवनाचा मार्गदर्शक ग्रंथ मानत ती भगवद्गीता आढळून येत असे ती त्यामुळेच!
- संजय पाठक
९४२००७७१५०