मुंबई : 'पांडू' चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांतच तब्बल 1.91 कोटींची कमाई केली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांपासून गावागावांतही अनेक ठिकाणी 'पांडू'चित्रपटामुळे सिनेमागृहाबाहेर हाउसफुल्लचे बोर्ड झळकले आहेत. भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या जोडगोळीचा अफलातून अभिनय सोबतीला सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळीसारख्या गुणी अभिनेत्रीच्या कसदार भूमिका; प्रविण तरडे, आनंद इंगळे यांसारखे कसलेले सहकलाकार, थिरकायला लावणारं संगीत आणि विजू माने यांचं कौशल्यपूर्ण दिग्दर्शन, या सगळ्या दिग्गजांच्या योगदानामुळे 'पांडू' सारखी दर्जेदार कलाकृती तयार झाली आहे.
पहिल्या तीन दिवसांतच दोन कोटीच्या जवळ कमाई केलेला 'पांडू' हिंदी चित्रपटाला टक्कर देणारा ठरला आहे. यासोबतच मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, डोंबिवली, सांगली, कराड कोल्हापूर, सोलापूर, चंद्रपूर, औरंगाबाद याठिकाणी हिंदी सिनेमाचे शोज काढून 'पांडू' शोज् वाढवण्यात आले आहेत. येणाऱ्या दिवसांतही 'पांडू'ची ही घोडदौड अशीच कायम राहिल आणि तो अजून जास्त कमाई करेल, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.