विमानतळविरोधी शस्त्राची उड्डाण चाचणी यशस्वी

04 Nov 2021 14:08:43
नवी दिल्ली :  संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात् डीआरडीओ आणि भारतीय वायुदलाने संयुक्त रीत्या घेतलेली विमानतळविरोधी शस्त्राची चाचणी यशस्वी ठरली. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या या शस्त्राच्या दोन उड्डाण चाचण्या राजस्थानातील जैसलमेर येथे घेण्यात आली, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने आज बुधवारी दिली.
 

aroplain_1  H x 
 
उपग्रह दिशादर्शक आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल संवेदक अशा दोन वेगवेगळ्या जुळवण्या असलेल्या या शस्त्राची चाचणी यशस्वी ठरली, असे संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. इलेक्ट्रो-ऑप्टिकलचा माग घेणार्‍या या श्रेणीतील बॉम्बची देशात प्रथमच चाचणी घेण्यात आली. यात वापरण्यात आलेले इलेक्ट्रो-ऑप्टिक संवेदक स्वदेशी तंत्रज्ञानातून विकसित करण्यात आले आहे.
राजस्थानातील जैसलमेर रेंज येथून भारतीय वायुदलाच्या विमानातून हे शस्त्र 28 ऑक्टोबर आणि 3 नोव्हेंबर रोजी डागण्यात आले होते. या दोन्ही चाचण्यांमध्ये विमानतळ विरोधी शस्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेतला, असे संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
 
या यंत्रणेतील इलेक्ट्रो-ऑप्टिकल जुळवणीत इमेजिंग इन्फ्रा-रेडचा माग काढणार्‍या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्यामुळे शस्त्राची लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता वाढली आहे. कमाल 100 किमी परिसरातील लक्ष्य उद्ध्वस्त करण्यासाठी या यंत्रणेचे (शस्त्राचे) प्रारूप तयार करण्यात आले आहे. नव्यानेच समावेश करण्यात आलेल्या प्रक्षेपकाने हे शस्त्र अत्यंत सफाईने डागले, असे या निवेदनात म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0