डॉ. बाबासाहेबांच्या आंबडवे गावात पहिल्यांदाच येणार राष्ट्रपती

26 Nov 2021 18:25:30
रत्नागिरी : भारताच्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या मूळ गावाला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद भेट देणार आहेत. 6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनादिवशी ही स्मारक भेट होणार असल्याची माहिती हाती आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी पद्धतीने आंबडवे आणि पंचतीर्थ घोषित अन्य ठिकाणच्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या दृष्टीने प्रशासनाकडून जोरदार चाचपणी व तयारी असल्याचे तयारी सुरू असल्याचे चित्र आहे.
 
 
baba_1  H x W:
 
 
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आंबडवे या गावी प्रथमच राष्ट्रपती येणार आहेत. राष्ट्रपतींचा तीन दिवसीय महाराष्ट्र दौरा नियोजित असून, यात किल्ले रायगड भेटीचाही समावेश आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनाशी निगडित असणार्‍या स्थळांना पंचतीर्थ म्हणून घोषित केले. यात त्यांचे मूळ गाव आंबडवे, जन्मस्थळ महू, मुंबईतील इंदू मिल, लंडन येथील निवासस्थान आणि दिल्लीतील 26 अलिपूर रोड यांचा समावेश आहे.
 
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेले आंबडवे गाव विकासापासून दूरच आहे. स्थानिक नेत्यांपासून राज्य, देशपातळीवरील मंत्री, नेते, अधिकार्‍यांनी भेटी देत आदर्श संसद ग्राम, पंचतीर्थ, शिल्पसृष्टी, पर्यटन भवन, डिजिटल गाव, राष्ट्रीय महामार्ग अशा कोटींच्या विकास कामांची आश्वासने दिली; मात्र ही आश्वासने हवेतच विरली आहेत. आदर्श संसद ग्राम योजनेअंतर्गत आंबडवे हे गाव दत्तक घेण्यात आले होते. मात्र, त्यातून या परिसराचा किती विकास झाला, हा शोधाचा विषय ठरला आहे. अत्यंत गाजावाजा करून पंचतीर्थ घोषित झालेले आंबडवे आजही सोयीसुविधा, विकासापासून कोसो दूर आहेत. ही एक प्रकारे सविधानकारांचीही उपेक्षाच केल्याच्या भावना येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0