अळूच्या वड्या

09 Oct 2021 13:08:29
पश्चिम महाराष्ट्रात अळू नावाने प्रसिद्ध असलेली धोप्याची पाने असे नामाभिधान असलेल्या चविष्ट पानांचे वडे ! बहुतांश घरांच्या अंगणात किंवा फ्लॅटच्या गॅलरीत अळूच्या पानाचें रोप छान बहरते. अशा या आळूच्या पानांच्या वड्या बनविण्यासाठी सोपी आणि झटपट कृती खालीलप्रमाणे !
 
 
साहित्य :
एक वाटी बेसन
पाव वाटी तांदळाचं पीठ
एक चमचा आलं-हिरव्या मिरचीचा ठेचा
पाव चमचा हळद
चवीनुसार मीठ
तिखट
पाणी
अळूची पाने
चिंच-गुळाचा कोळ
तळणासाठी तेल 

aluvadi_1  H x  
कृती : बेसन आणि तांदळाचे पीठ एकत्र करून घ्या. त्यात तिखट, हळद आणि मीठ घालून मिश्रण तयार करून घ्यावे. आवडीनुसार धणे-जीरेपूडही घालता येईल. चिंचगुळाचा कोळ ३-४ मोठे चमचे या मिश्रणात घालून मिसळून घ्यावा. यामुळे, धोप्याची पानं खाजरी असतील तर ती खाज कमी होऊन वड्यांना छान आंबडगोड चव येईल. आता थोडं-थोडं पाणी टाकून, मिश्रण छान एकजीव करून खूप पातळ किंवा सैलसर करू नये. मिश्रण फेटून बाजूला ठेवावे.
आता धोप्याच्या पानाचे देठ काढून, लाटण्याने पान शक्य तितके सपाट करून घ्यावे. मोठे पान सर्वात आधी घेऊन त्यावर हाताने मिश्रणाचा एक थर लावावा. त्यावर, थोडे लहान दुसरे पान ठेवून पुन्हा मिश्रणाचा थर द्यावा. असा किमान पाच पानांचा थर द्यावा. पानांच्या कोप-यापासून दुमडायला सुरुवात करावी. पानांचा हलक्या हाताने रोल करत न्यावा आणि त्यावर बेसनाचे मिश्रण लावत जावे. खूप घट्ट दाबू नये पण अगदी सैलही सोडू नये. याला वळकुटी असेही म्हणतात.
कुकरमध्ये किंवा इडलीपात्रात हे रोल वाफवायचे आहेत. त्यासाठी कुककरची शिटी काढून घेऊन, साधारण दोन इंच पाणी घालावे. त्यात, एका भांड्यात इंचभर पाणी घालून त्यावर जाळी किंवा छिद्रांची ताटली ठेवावी. या ताटलीला तेल लावून त्यावर आपण तयार केलेले रोल ठेवावेत. १५ मिनिटे वाफवलेले रोल थंड करून घ्यावेत. आता, या रोलच्या चकत्या कापून घ्याव्यात.
बèयाच जणांना वाफवलेल्या अळूच्या वड्याही आवडतात. दुसरी पद्धत म्हणजे या तयार चकत्या खमंग-कुरकुरीत डिप फ्राय किंवा शॅलो फ्राय करून घ्या. त्यावर भाजलेले तीळ भुरकवा आणि टोमॅटो सॉससोबत गरमागरम सर्व्ह करा.
टिप - उकडलेले रोल फ्रिजरमध्ये दोन महिन्यांपर्यंत छान राहतात. अळूवडी खावीशी वाटली की, वळकुटी फ्रिझरमधून बाहेर काढावी आणि चकत्या करून तळून घ्याव्यात.
Powered By Sangraha 9.0