मानवी जीवन एक संघर्ष !

01 Oct 2021 13:14:05
प्राचार्य प्र. श्री. डोरले
 
बट्र्रेंड रसेल हे एक जगप्रसिद्ध इंग्रज तत्त्वज्ञ आहेत. त्यांनी ‘न्यू होपस् फॉर द चेंजिंग वल्र्ड' म्हणजे ‘बदलत्या दुनियेला नवा दिलासा' हे एक चांगले पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी मानवी जीवनाचे सखोल चिंतन मांडले आहे. ते मांडीत असताना त्यातील तीन प्रमुख संघर्षांची चर्चा केली आहे. ते तीन संघर्ष म्हणजे-
 
* मानव आणि निसर्ग (मॅन अ‍ॅण्ड नेचर)
* व्यक्ती-मानव आणि समाज (मॅन अ‍ॅण्ड सोसायटी)
* ‘तो'- स्वत:च (मॅन अ‍ॅण्ड हिमसेल्फ)
 
manavi jivan_1   
 
 
त्यांचे म्हणणे वरील तिहेरी स्वरूपाचा संघर्ष मानवी जीवनात कमी-अधिक प्रमाणात पण अखंडपणे चालतच असतो.
 
वरील संघर्षांच्या अवस्थांचा विचार केला तर आपल्या असे लक्षात येते की, यांचा क्रम स्थूलाकडून सूक्ष्माकडे वळला आहे. त्याला आपण ‘बाह्य सृष्टी ते आंतरसृष्टी' असेही म्हणू शकतो. भारतीय तत्त्वज्ञानात यांचे वर्गीकरण आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक अशा श्रेणींमध्ये केले आहे. संघर्ष म्हणजे ताप, त्रास, दु:ख, संताप; म्हणून सर्व संतांनी यांना ‘त्रिविध ताप' म्हणून संबोधिले आहे. शिवाय या त्रिविध तापांनी भरपूर पोळल्याशिवाय म्हणजे त्रस्त झाल्याशिवाय मानवी जीवनाचे खरे स्वरूप, जे फसवे आहे, बेगडी स्वरूपाचे आहे, अनिश्चित आहे, क्षणभंगूर आहे, अस्थिर आहे, सतत बदलणारे आहे, तत्त्वज्ञानातील सर्वांना परिचित असलेला शब्द म्हणजे मृगजळासारखे आहे, हे लक्षातच येत नाही आणि ते ख-या अर्थाने लक्षात आल्याशिवाय स्वत:च्या अनुभवाने- त्याच्यावरची आसक्ती कमी होत नाही.
 
मानवी जीवनाचे हे सत्य स्वरूप, विविध रंगाने, अंगाने, विनटलेल्या त्याच्या विविध स्वरूपाचे चिंतन आणि वर्णन, जगातील यच्चयावत् तत्त्वज्ञानी, विचारवंत, साहित्यिक, कवी, नाटककार, प्रवचनकार, कीर्तनकार, सर्व संत त्यांनी त्यांच्या पद्धतीने विशद केले आहे. एका दृष्टीने त्यांनी बट्र्रेंड रसेल यांच्याच चिंतनाचे विशदीकरण केले आहे. त्यामुळे मानवी जीवनाचे स्वरूप लक्षात येण्यास, समजण्यास मदत होईल. स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या ज्ञानयोगावरील प्रवचनात मानवी जीवनाच्या या फसव्या, बेगडी स्वरूपाचे अतिशय मर्मग्राही, विदारक वर्णन केले आहे. ते म्हणतात- प्रत्येक बालक बघावे- जन्मजात आशावादी मधुर सुखस्वप्नांमध्ये दंग. त्याच्या उमलत्या दृष्टीसमोर सारखी सोनेरी स्वप्ने तरळत असतात. यौवनाचा वसंत अवतरतो, त्या उन्मादात त्याचा आशावाद आणखीनच बहरतो. मृत्यू म्हणून, पराभव म्हणून, अध:पतन म्हणून काही या दुनियेत आहे, यावर कुणाही युवकाचा विश्वास बसणे कठीण... आणि वार्धक्य येते. जीवन एक उद्ध्वस्त अवशेषांचा खच ठरते. सोनेरी स्वप्ने सारी शून्यात विरून गेलेली असतात. ऐन यौवनांच्या उमेदीत आशेने मुसमुसणारा तोच युवक आज वृद्ध होऊन घरातील एका कोप-यात (आजच्या परिभाषेत ‘डस्टबीन') घोर निराशेने ग्रस्त होऊन पडलेला असतो. जीवनाने, आशावादाने त्याला दाखविलेल्या सा-या स्वप्नांचा चुराडा, पालापाचोळा झालेला असतो. त्याचे मन अखंडपणे आक्रोशत असते. त्या आक्रोशाचे धृवपद एकच असते. ‘... जीवनाने मला फसविले... दाखविले खूप, पण प्रत्यक्षात दिले मात्र काहीच नाही...' या प्रकारे प्रत्येक मानव धारेला लागून या जीवन सरितेच्या स्रोतामध्ये वाहतो आहे. अविरत परिवर्तन-विराम नाही की विश्राम नाही. कुठे? कुणीकडे? कुणास ठाऊक!
 
(स्वामी विवेकानंद ग्रंथावली खण्ड ३ रा. पृ. क्र. १३८, १३९)
 
मानवी जीवन सुख-दु:खाचे मिश्रण
 
जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमध्ये मानवी जीवनाचा प्रवाह सतत चालत असतो. आपल्याला वाटते मृत्यूनंतर हा प्रवाह खंडत असेल, पण तसे नाही. भारतीय तत्त्वज्ञानात, जीवन धारणेत- ‘पुनरपि जननं, पुनरपि मरणं, पुनरपि जननी, जठरे शयननम्' हा क्रम अखंडपणे सृष्टिचक्राप्रमाणे चालतच असतो, ही धारणा आहे. श्रद्धा आहे. त्यावर उपनिषद काळापासून सखोल चिंतन झाले आहे. ‘कठोपनिषद' हे दश उपनिषदांमधील ज्यांवर आद्य श्री शंकराचार्यांनी भाष्य केले आहे, एक प्रमुख आणि अतिशय महत्त्वाचे उपनिषद आहे. या उपनिषदात नचिकेत्याने प्रत्यक्ष यमराजांना मानवी जीवनासंबंधी एक अतिशय महत्त्वाचा आणि मूलभूत स्वरूपाचा प्रश्न विचारला आहे. नचिकेता म्हणतो- हे यमधर्मा! मनुष्य मृत्यू पावल्यानंतर तो असतो असे काही लोक म्हणतात. तर इतर काही लोक तो नसतो असे म्हणतात. मृत्यूनंतर माणसाच्या अस्तित्वाबद्दलची ही जी संशयास्पद स्थिती आहे, त्या बाबतीत मला प्रत्यक्ष तुझ्याकडून समजावून घ्यायचे आहे. थोडक्यात मृत्यूनंतर जीव असतो किंवा नसतो? हा जो संशय सर्व जीवांस असतो, त्याचे निराकरण म्हणजे स्वरूपज्ञान देणारी आत्मविद्या तू मला या तृतीय वराद्वारे (कारण यमाने नचिकेत्याला तीन वर मागून घेण्याविषयी सांगितले होते.) प्रदान कर. ‘वराणां एष: तृतीय वर:'
 
मानवी जीवनाचा आणि मृत्यूचा असा अतूट संबंध आहे. जीवन आणि मृत्यू या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेथे जीवन आहे तेथे मृत्यू आहेच. हा अटळ, शाश्वत सिद्धांत आहे. जीवनातील या सत्यावर अनेक विचारवंतांनी आपले चिंतन मांडले आहे. प्रातिनिधिक स्वरूपात डॉ. अर्नाल्ड मॅक्गील हा विचारवंत काय म्हणतो ते पाहू- Life is a journey from the cradle to the grave, grave and beyond, and back to the cradle; And from life to life. Life is coming to from, and death is coming in to the 'Formless' Life is not separate from the death. Death is not seprate from life. It is one phenomenon''
(Trasury of spiritual wisdom- page no 212)
 
एक धागा सुखाचा...
 
‘जगाच्या पाठीवर' हा राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आपल्याला आठवत असेल. त्यातील गीतरचना आधुनिक युगातील वाल्मीकि म्हणून ज्यांना गौरविले जाते, त्या ग. दि. माडगुळकरांची आहे. या चित्रपटातील प्रत्येक गीत म्हणजे मानवी जीवनावरील सुरेल भाष्य आहे. या चित्रपटातील एका लोकप्रिय गीतात ते म्हणतात- ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे। जरतारी हे वस्त्र मानवा, तुझिया आयुष्याचे!' या काव्यपंक्तीत सुखाचा धागा एकच आहे, पण दु:खाचे असलेले धागे मात्र शंभर आहेत. हे मानवी जीवनाचे खरे स्वरूप आहे. त्यातील सुखाचे आणि दु:खाचे प्रमाण (प्रपोर्शन) व्यस्त आहे. श्री संत तुकोबांनी देखील हेच सांगितले आहे की- ‘सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वता एवढे।' खोट्या आशेने, सुखाच्या भ्रामक कल्पनेने धावपळ करणा-या मानवाच्या अनुभवाला ज्यावेळी हे ‘व्यस्त' प्रमाण लक्षात येते, ‘डोंगर पोखरून साधा उंदीरही मिळाला नाही' याची तीव्र अनुभूती त्याला ज्यावेळी येते, त्यावेळी त्याच्या अंतर्मुखतेचा प्रवास प्रारंभ होतो. ख-या जीवन जिज्ञासेचा उगम होतो. आपले जीवन कसे आहे? तर जन्म-मृत्यूच्या दोन खांबांना कायम बांधलेले. या दरम्यान तीन अवस्थांमध्ये म्हणजे बालपण, तरुणपण आणि वृद्धपण यात त्याची वाटचाल होते. विविध वस्त्र प्रावरणांनी आयुष्यभर नटणा-या या मानवाचे ‘येताना' आणि ‘जाताना'चे स्वरूप मात्र ‘नागवे'च असते. कवी म्हणतात- ‘पांघरशी जरी असला कपडा- येशी ‘उघडा', जाशी ‘उघडा।' कपड्यासाठी नाटक करिशी- तीन प्रवेशांचे' असे हे तीन प्रवेशांचे ‘जीवन नाट्य' आहे. रावापासून तो रंकापर्यंत यातील प्रवेश म्हणजे एन्ट्री आणि मृत्यूमुळे होणारी ‘एक्झिट' म्हणजे जीवन नाट्याच्या स्टेजवरून निघून जाणे- यात काही फरक नाही. मजुरी करणा-या सामान्य व्यक्तीपासून तर लक्षावधी रुपयांची उलाढाल करणा-या श्रीमान व्यक्तीपर्यंत जीवनाचा अंतिम खर्च, ‘हिशेब' सारखाच. कोणता? ‘दोन बांबूंची तिरडी, प्रेत बांधण्यासाठी आवश्यक असलेली शंभर ग्रॅम सुतळी, अग्निसंस्कार करणा-या वारसदाराच्या हाती असलेले पेटत्या शेणगोव-यांचे लहान मडके, स्मशानात आधी नेऊन टाकलेली १० मण लाकडे, अंतिम पाणी देण्यासाठी आवश्यक मातीची घरडी' बस् इतकेच! रोजची मजुरी करणारा असो, भारी पगाराचे पॅकेजवाला असो की करोडपती असो, अंतिम हिशेब एकच. ही वस्तुस्थिती आहे. अंतिम सत्य तेच आहे. ते सर्वदेशीय, सर्वकालिक आहे. ज्युलियन पी. जॉन्सन या लेखकाने हे जीवनाचे सत्य अधोरेखित करताना वरील सत्यालाच दुजोरा दिला आहे. तो म्हणतो- ''Naked and empty handed you come here. Emply handed and naked you depart. Results? ... Simple treading the wheel...'' (From 'Human Life' Pa. No. 36)
 
जन्माला आल्यापासून तो मरेपर्यंत प्रपंच म्हणून, संसार म्हणून घाण्याला जुंपलेल्या एखाद्या बैलाप्रमाणे ते चाक फिरवीत राहणे, थकणे, दमणे आणि शेवटी निघून जाणे. हीच अधिकांश मानवी जीवनाची इतिश्री आपण अनुभवतो. श्री संत तुकोबारायांनी अतिशय परखड शब्दात हे सत्य प्रकट करताना म्हटले आहे- ‘जन्माला आला रेडा (हेला) पाणी वाहता वाहता मेला.'
 
हे सर्वसामान्यपणे आपल्याला दिसणारे मानवी जीवनाचे वरपांगी असलेले स्वरूप आहे. लौकिक जीवनाची ही चौकट आपल्या सर्वांना विदित आहे. त्याची अखंड जाणीव ठेवणे, चिंतन करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा ‘नकारात्मक भाव' (निगेटिव्ह आस्पेक्ट) म्हणून न स्वीकारता वस्तुस्थिती निदर्शक म्हणून स्वीकारणे हे फायद्याचे आहे. कारण परमेश्वराच्या सृृष्टीत एकमेव मानव जन्म, नरदेह हा दुर्लभ आहे. परमेश्वराचा साक्षात्कार करून घेण्याची पूर्ण क्षमता याच जीवनात आहे. कवीने आधी म्हटल्याप्रमाणे ‘एक धागा सुखाचा आणि शंभर धागे दु:खाचे असलेत तरी हे वस्त्र ‘जरतारी' आहे. ‘महावस्त्र' आहे. ते कसे विणायचे आणि परमेश्वराच्या चरणी अर्पण करायचे, याची संपूर्ण रचना भारतीय जीवन पद्धतीत, तत्त्वज्ञानात, आचारसंहितेत आहे. कारण अनादि काळापासून वानराचा नर आणि नराचा नारायण करण्याचा ‘विकासक्रम' भारतीय संस्कृतीने विकसित केला आहे. म्हणूनच याच संस्कृतीत ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरतपणे भूमंडळी निर्माण करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. त्याचमुळे भारतभूमी ही संत-महंतांची जन्मदात्री म्हणून जगात ओळखली जाते. त्याचमुळे ती ‘पूण्यभूमी' या अभिवादनास पात्र ठरली आहे.
Powered By Sangraha 9.0