जिल्ह्याचा मृत्यूदर देशाच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न

    दिनांक : 03-Sep-2020
Total Views |
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांचा विश्‍वास
 
dr choun_1  H x
 
जळगाव : जळगाव जिल्ह्यात मधल्या काळात कोरोनामुळे दगावणार्‍या रूग्णांची संख्या शिगेला पोहचली होती. मात्र आरोग्य विभागाने राबविलेल्या यंत्रणा आणि केलेल्या प्रयत्नांमुळे सध्या ती बरीच कमी झाली आहे. मात्र येत्या महिन्यात ती देशाच्या मृत्यू दरासमान आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. एवढेच नव्हे तर जिल्हा लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावा, असाही प्रयत्न असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांनी सांगितले.
 
गुरूवारी ‘तरुण भारत’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीनंतर ते सहकार्‍यांशी दिलखुलास चर्चा करीत होते.
 
सध्या सर्वत्र कोरोनाचीच चर्चा आहे. हे संकट असले तरी त्याचा प्रादुर्भाव नेमका कसा होतो हे ठाऊक नसल्याने प्रारंभी संभ्रमावस्था होती, असे सांगून नंतर मात्र हळूहळू यंत्रणा अधिक सजग झाली. रूग्ण बरे व्हायला लागल्याने डॉक्टरांचाही आत्मविश्‍वास अधिक वाढला. त्यामुळे उपचारार्थ येणार्‍या रूग्णांवर योग्य उपचार करणे सोपे झाले. अमळनेर, यावल, रावेर आणि चोपडा या अन्य जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील लोक इतर भागात गेल्यामुळे तेथे प्रादुर्भाव वाढल्याचे ते म्हणाले.
 
जळगावकरांना ‘दानशूरपणा’ भोवला
लॉकडाऊनमध्ये अन्य जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची जळगावला अनेक संस्थांनी भोजन, पाणी, औषधे, कपडे, आणि परतीची व्यवस्था करताना आपल्या दिलदारपणाचे दर्शन घडवले. हे चांगले काम झाले असले तरी येणार्‍यांपैकी कोण बाधित होते आणि कोण सुदृढ हे पाहण्याची काटेकोर काळजी घेतली न गेल्याने येथून जातांना त्यांनी आपल्याला नक्कीच ‘कोरोनाचा प्रसाद’ दिला असावा. कारण, त्यानंतर बाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ दिसून आली होती. हे अचानक घडले नव्हते तर आपल्या दानशूरपणाचा तो परिणाम होता, असेही डॉ.चव्हाण यांनी हसत हसत सांगितले.
 
रूग्ण शोधून उपचार
कोरोनाच्या दुसर्‍या फेजमध्ये रूग्णांचा शोध घेवून, त्याचा स्वॅब घेत तो बाधित आहे की नाही हे आता लगेच कळू शकणारी यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध झाल्याने रूग्ण शोध, उपचार आणि रोगमुक्ती अशापध्दतीने उपचार केले जातात. त्यासाठी अन्य सेवाभावी संस्था आणि संघटनांचाही मोलाची मदत मिळाली. त्यामुळे वेगवेगळ्या हॉस्पिटलवरील रूग्णांचा ताण कमी झाला. रूग्णांना अधिक चांगले उपचार मिळाल्याने त्यांचाही प्रतिसाद सकारात्मक दिसू लागला. याबाबींचा उपचारावर चांगला परिणाम होत असल्याचा आमचा अनुभव आहे, असे सांगून डॉ. चव्हाण म्हणाले की, अशाच पध्दतीने यंत्रणा कार्यरत राहिली तर यातून लवकर बाहेर पडू. कोरोनाग्रस्तांना त्वरित उपचार मिळण्यासाठी सर्व कोविड रूग्णालये आणि कोविड केअर सेंटरमध्ये आ़ॅक्सिजनयुक्त बेडची उपलब्धता करून देण्यात आल्याचेेही ते म्हणाले.
 

dr chound_1  H  
 
वय नव्हे, इम्युनिटी महत्त्वाची
प्रादुर्भाव झालेल्यांपैकी अनेक तरूण रूग्णांचा कोेरोनाने मृत्यू झाल्याचे दिसते. दुसरीकडे अनेक वयोवृध्द अगदी ९० वर्षे पार केलेल्यांनीही कोरोनावर मात केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमात येत आहेत. ही विसंगती कशी? असे विचारता डॉ. चव्हाण म्हणाले की, कोरोनात वय नव्हे तर इम्युनिटी महत्त्वाची ठरते. रूग्ण तरुण असला आणि त्याची इम्यूनिटी कमी असेल तर तो दगावण्याची शक्यता असते. म्हणून गरज आहे की, आपली इम्युनिटी-रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याची. हेच कारण आहे की, अनेक वृध्द व्यक्ती केवळ याच बळावर कोरोनाला पछाडत बरे झाले आहेत. ही इम्युनिटी तात्कालिक औषधे घेवून वाढणार नाही तर आपली जीवनशैलीच तशी असली पाहिजे. त्याचा उपयोग कुठल्याही आजाराशी लढताना नक्कीच होऊ शकतो.
 
दैनंदिन जीवनशैली बदला
कोरोना होण्यासाठी प्रत्येकाची प्रतिकारशक्ती कारणीभूत ठरते. कोणाचीही प्रतिकारशक्ती कमी पडल्यास कोरोनाचा त्या व्यक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे दैनंदिन जीवनशैलीत व्यायाम, योगासने महत्त्वाची आहे. तसेच सुंदर, निरोगी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने या सवयींचा स्वीकार केला पाहिजे, असेही ते म्हणाले. प्रारंभी खासगी डॉक्टर्स कोरोनापासून दूर राहत होते. परंतु, कोरोना या आजाराला घाबरुन घरी न बसता त्याला हरविण्याची गरज आहे. सध्या प्रशासनाच्या आवाहनावर आता अनेक डॉक्टर्स पुढे येत असून कोरोनाबाधितांवर उपचार करीत आहेत. त्यामुळे नक्कीच शासकीय यंत्रणेवरील ताण कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.
 
स्वतःची काळजी घ्या
जिल्ह्यात शासनातर्फे अर्सेनिक अल्बल गोळ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच आयुर्वेदीक काढा पिण्यास सांगण्यात आले. त्यानुसार अनेकांनी तसे केले. परंतु, त्यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली. या प्रश्‍नावर डॉ.चव्हाण म्हणाले की, कोरोनावर आतापर्यंत कुठलेही प्रभावी औषध आले नाही. त्यामुळे कोरोना होणारच नाही असे समजणे चुकीचे आहे. तसेच कोरोनामुक्त व्यक्तीलासुद्धा थकवा, ताप, श्‍वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसून आली आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीने तीन महिने आपल्या शरीराची काळजी घेत श्‍वसनाचे योग करावते, असेही ते म्हणाले. प्रत्येकाची भूतकाळातील जीवनशैली प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते.
 
नागरिकांनो घाबरु नका
नागरिकांनो घाबरुन जावू नका. कारण, कोरोना हा आजार जसा आला आहे तसा तो जाणारच. तोपर्यंत प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहनही डॉ.चव्हाण यांनी शेवटी केले. प्रारंभी ‘तरुण भारत’चे निवासी संपादक दिनेश दगडकर यांनी ‘दिवाळी विशेषांक’ आणि ‘सेवाभावे उजळो जीवन’ हे पुस्तक देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी ‘तरुण भारत’ परिवारातील सहकारी उपस्थित होते.