नाथाभाऊ : खंबीर अन् कार्यशील नेतृत्व |

    दिनांक : 02-Sep-2020
Total Views |
 
nathabahu_1  H
 
 
केवळ राजकीयच नव्हे तर, सामाजिक आणि सहकाराच्या क्षेत्रातही आपल्या कार्यशैलीने आपली अमिट प्रतिमा आणि नवी वाट निर्माण करणारे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अनेकांचे मार्गदर्शक मा.एकनाथराव खडसे म्हणजेच - सर्वांचे ’नाथाभाऊ ’आज आपला ६४ वा वाढदिवस साजरा करीत आहेत.
 
गेली सहा दशके महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथराव खडसे हे नाव सतत एक कार्यशील नेते आणि झुंझार व्यक्तिमत्त्व म्हणूनच घेतले जात आहे. खरे तर, कोथळी सारख्या एका लहानशा गावातून सरपंच म्हणून आपला राजकीय प्रवास सुरू करीत मा.नाथाभाऊंनी आजवर केलेली वाटचाल जेवढी स्तिमित करणारी, तेवढीच त्यांच्या परिश्रमाची व्यापकता दर्शविणारीही आहे.
 
विधिमंडळात नाथाभाऊ आपला एखादा प्रस्ताव वा विषय मांडतांना जे निवेदन करायचे अथवा त्या विषयाचे गांभीर्य समजावून सांगायचे तेव्हा ते इतके तर्कशुध्द असते की, त्याला फारसा विरोध न होता, ते मंजूर करण्यात येत असे. हा केवळ त्यांच्या अभ्यासाचाच नव्हे तर, त्यांच्या पारदर्शी व सडेतोड मांडणीचा प्रभाव आहे.
 
महाराष्ट्राच्या राजकारणात एक अभ्यासू नेते एवढीच त्यांची ओळख नसून कार्यकर्त्यांचे सक्षम जाळे निर्माण करून , त्यांना जबाबदारी सोपवून ती यशस्वी करण्यासाठी त्यांना सतत प्रेरणाही ते देतात. म्हणूनच त्यांच्याकडे कार्यकर्ते सदैव ’ दीपस्तंभ ’ समान भूमिकेतून पाहतात. नाथाभाऊसुद्धा कार्यकर्त्यांच्या हाकेला लगेच धावून जातात , असे त्यांचे नाते आहे.
 
नाथाभाऊ आमदार म्हणून सर्वप्रथम विजयी झाले ते कॉंग्रेसचे वर्चस्व असलेल्या तत्कालीन एदलाबाद मतदारसंघातून.पुढे तो त्यांच्याच प्रयत्नांनी मुक्ताईनगर असा घोषित करण्यात आला होता, हा इतिहासही फार जुना नाही.
 
विविध मंत्रालयाचा कार्यभार सांभाळताना त्यांच्यातील कर्तव्यकठोर प्रशासक दिसून येतो. अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांना धडकी भरावी असे त्यांचे एक रूप अनेकांनी पाहिले आहे.दुसरीकडे त्यांचे आणखी एक रूप आहे - ते आहे कौटुंबिक. त्यांचा हा कौटुंबिक चेहराही अत्यंत लोभस आणि इतरांना सहज लळा लावणारा आहे.
 
असे हे विलक्षण व्यक्तिमत्त्व लाभलेले नाथाभाऊ ...
६४ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन करताना परमेश्वराकडे एकच मागणे आहे की , नाथाभाऊंना उत्तम, आरोग्यपूर्ण आणि निरामय जीवन लाभो|
जीवेत शरद: शतम् ॥
- ‘तरुण भारत’ परिवार,
जळगाव.