चाळीसगाव तालुक्यात धुव्वाधारपाऊस, बंधार्‍यात एक जण बुडाला

    दिनांक : 18-Sep-2020
Total Views |
तितूर नदीला पूर : वाघळी, पातोंडा परिसरात कपाशी पीकाचे नुकसान
चाळीसगाव : तालुक्यात शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहरासह वाघळी, पातोंडा, बोरखेडा, हिंगोणे खु., हिरापूर, परिसरात तासभर वादळी वार्‍यासह धुव्वाधार पाऊस झाला. त्यामुळे कपाशी, केळी, ज्वारी, मका पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दीड तास बरसणार्‍या जोरदार पावसामुळे तितूर नदीला पूर आला आहे. आठवडाभरात तालुक्यातील तितूर नदीला दुसर्‍यांदा पूर आला.
 
वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे पीके जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे. परिणामी परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. चाळीसगाव तालुक्यात निसर्गाच्या लहरीपणाचा फटाका शेतकर्‍यांना बसला आहे. १८ रोजी झालेल्या पावसाने शेतकरी हताश झाला आहे. तालुक्यात सर्व बंधारे, धरणे ओव्हरफ्लो झाले आहे. मात्र सध्या झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांचे आतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस सुरूवातीपासून चाळीसगाव तालुक्यात झाला आहे. त्यामुळे कपाशी पीकाचे पुर्णत: नुकसान झाल्याने बळीराजाच्या पदरी पुन्हा गतवर्षांप्रमाणे नैराश्य आले आहे.
वाघळीच्या बंधार्‍यात एक जण बुडाला
वाघळी येथील तितूर नदीवरील हिंगोणा परिसरातील बंधार्‍यात अचानक नदीला आलेल्या पुरामुळे एक जण बुडाल्याचे समजते. परिसरातील एक जण बंधार्‍यात बुडल्याची चर्चा होती. रात्री उशिरापर्यंत या बंधार्‍यात व्यक्तीचा शोध घेणे सुरू होते. मात्र याबाबत चाळीसगाव पोलिसात कुठलीही नोंद झालेली नव्हती.